नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र होणार
केंद्र आपले कायदे मागे घेण्यास तयार नाही, असे निरीक्षण संघटनांच्या प्रतिनिधींनी नोंदविले. यानंतर आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले.
नवी दिल्ली : केंद्र सरकारचे तीन मंत्री आणि शेतकरी प्रतिनिधींमध्ये मंगळवारी (ता. १) विज्ञान भवनात झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर बुधवारी दुपारी सिंघू सीमेवर विविध ३२ शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. गुरुवारी (ता. ३) केंद्र सरकार सोबत होणाऱ्या बैठकीबाबत रणनीती ठरविण्यासाठी ही बैठक झाली. यावेळी केंद्र आपले कायदे मागे घेण्यास तयार नाही, असे निरीक्षण संघटनांच्या प्रतिनिधींनी नोंदविले. यानंतर आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले.
मंगळवारी शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, संघटनांनी हा प्रस्ताव नाकारला होता. तर संघटनांकडून तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी सरकारने फेटाळली होती. गुरुवारी बैठक होण्यापूर्वी केंद्राच्या कृषी कायद्यांबाबत नेमक्या काय तक्रारी आहेत, याची यादी बैठकीपूर्वी देण्याची सूचना सरकारकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सिंघू सीमेवर चर्चा झाली.
आंदोलनाचा सातवा दिवस
दिल्लीतील सीमेवर आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा बुधवारी (ता. २) सातवा दिवस होता. सरकार बरोबर झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर आखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने म्हटले आहे, ‘‘सरकारचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. संघटनांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने एक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, सरकार हा प्रस्ताव देऊन आमच्या फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आम्ही एकत्रितपणेच सरकार समोर चर्चेला जाणार आहोत.’’
दरम्यान, शेतकऱ्यांनी दिल्ली- नोएडा सीमा बंद केल्यामुळे दिल्ली पोलिसांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलिस बंदोबस्त आणखी वाढविला आहे, सुरक्षा आणखी कडेकोट केली आहे. गुडगाव आणि झज्जर-बहादूरगढला जोडणाऱ्या आणखी दोन सीमा पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बंद केल्याने दिल्लीत बुधवारी पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे.
खेळाडूंचा आंदोलनाला पाठिंबा
पंजाबमधील खेळाडू समर्थनासाठी पुढे आलेत. आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू सज्जन सिंग चीमा, हॉकी खेळाडू गुरमेल सिंग, हॉकी गोल्डन गर्ल राजबीर कौर यांनी शेतकऱ्यांना समर्थन देऊन आपले अर्जुन ॲवॉर्ड माघारी देण्याचा इशारा दिला आहे.
- 1 of 657
- ››