agriculture news in marathi Farmers agitation goes on in delhi, tommorow hunger strike will be done | Agrowon

शेतकरी नेत्यांचे उद्या उपोषणास्त्र; आंदोलनाची धग कायम

टीम अॅग्रोवन
रविवार, 13 डिसेंबर 2020

तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीवर ठाम असलेले शेतकरी संघटनांचे नेते येत्या १४ डिसेंबरपासून (सोमवार) बेमुदत उपोषण आंदोलन करतील असे शनिवारी (ता.12) जाहीर करण्यात आले.

नवी दिल्ली : तीन कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीवर ठाम असलेले शेतकरी संघटनांचे नेते येत्या १४ डिसेंबरपासून (सोमवार) बेमुदत उपोषण आंदोलन करतील असे शनिवारी (ता.12) जाहीर करण्यात आले. आंदोलन तीव्र करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. उद्या जयपूर-दिल्ली, अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले जातील असेही जाहीर केले गेले.

हरियानातील खट्टर सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा देणारे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांनी आज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट घेऊन दीर्घ चर्चा केली. त्यानंतर त्यांनी,"सरकार व शेतकरी नेत्यांमध्ये पुन्हा संवाद सुरू होऊन येत्या २४ ते ४८ तासांत अत्यंत सकारात्मक बातमी येईल'' असा ठाम विश्‍वास व्यक्त केला. 

अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीने आंदोलन तीव्र करण्याचे जाहीर केल्यानंतर पंजाबातील शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीकडे निघाल्याचे आज सांगण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री व भाजप खासदार महेश शर्मा यांना नोएडा येथे शेतकऱ्यांनी घेराव घातला. दुसरीकडे दिल्ली-जयपूर व अमृतसर दिल्ली महामार्ग रोखण्याचे आंदोलन आजच्याऐवजी उद्या (ता. १३) करण्यात येईल असे शेतकरी नेत्यांनी जाहीर केले.

गुरू गोविंदसिंगांच्या हुतात्मा दिनापासून (ता. १४) बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल. सरकारची ताठर भूमिका पाहता हे आंदोलन तीव्र करण्यावर संघर्ष समितीतील एकजूट कायम आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सरकारच्या ताठर भूमिकेच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन केले.

दुसरीकडे पंजाब-हरियानातील अनेक टोल नाके आज शेतकऱ्यांनी खुले केले. मात्र आंदोलनाची धग पाहता दिल्ली-एनसीआर व उत्तर प्रदेशातील अनेक नाक्‍यांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नोएडा व दिल्लीच्या काही सीमांवरील वाहतूकही आज अधूनमधून सुरू करण्यात आली होती. पंजाब, हरियाना, राजस्थान, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात सोमवारी धरणे आंदोलन केले जाईल. याच वेळी दिल्लीच्या सीमांवरील हजारो आंदोलक शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारे शेतकरी नेते त्याच दिवशी एक दिवसाचे उपोषण करतील असे जाहीर करण्यात आले. 

समन्वय समितीचे महत्त्वाचे नेते सरदार व्ही.एम.सिंग यांनी आज सांगितले की हमीभावाच्या (एमएसपी) मुद्यावर आम्हाला सरकारकडून लेखी आश्‍वासन व कायदा करण्याचा शब्द मिळाला पाहिजे. बाकी सारे चर्चेत पाहिले जाईल. त्यांचे हे विधान चर्चा पुन्हा सुरू होऊन कोंडी फुटण्यासाठी विलक्षण सूचक असल्याचे सरकारच्या गोटातून सांगितले जाते.

बुराडीच्या निरंकारी मैदानात आंदोलन करणाऱ्या अखिल भारतीय किसान महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रेम सिंग गहेलावत म्हणाले की दिल्ली-पलवल व दिल्ली-जयपूर महामार्ग शेतकरी ठप्प पाडतील. अंबानी व अदानींचा माल पंजाब-हरियानात जेथून येतो तो अडविला जाईल. जिओ सीम व जिओ फोनचा बहिष्कार करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील नेते डुंगर सिंह म्हणाले की केवळ गहूच नव्हे तर बटाटा, भाजीपाला. ऊस व दुधासह साऱ्या शेतीमालासाठी एमएसपी कायदा केंद्राने केला पाहिजे ही आमची ठळक मागणी असून केवळ लेखी आश्‍वासनाने भागणार नाही. 

कोण काय म्हणाले ः 
- शेतकऱ्यांसमोर राजकीय पद माझ्यासाठी काहीच नाही. कृषीमंत्री तोमर यांच्याशी माझी सकारात्मक चर्चा झाली. येत्या २४ ते ४८तासात अतिशय चांगली घोषणा होईल असा विश्‍वास मला आहे.
- दुष्यंत चौताला, हरियानाचे उपमुख्यमंत्री. 
- शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचे कारस्थान सरकारकडून होणे व शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणणे अतिशय दुःखद आहे. आंदोलक शेतकऱ्यांचा धर्माशी संबंध नसून ते सारे अन्नदाते आहेत हे सरकारने समजून घ्यावे
- अकाली दलाचे नेते सुखबीर बादल. 
- कायदा दुरुस्ती आम्हाला बिलकूल मान्य नाही. तिन्ही कायदे मागेच घेतले पाहिजेत
- भारतीय किसान संघटनेचे नेते राकेश टिकैत 

अजून किती शेतकऱ्यांचे बलिदान द्यावे लागेल?
केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यासाठी आणखी किती शेतकऱ्यांना आपले बलिदान द्यावे लागेल, असा सवाल राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. गेल्या १७ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान आत्तापर्यंत ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर राहुल यांनी ट्विटकरून केंद्र सरकारला धारेवर धरले.

‘खलिस्तानी म्हणणाऱ्या मंत्र्याने माफी मागावी’
अमृतसर, पंजाब : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात शेतकऱ्यांना खलिस्तानवादी आणि राष्ट्रविरोधी लोक आहेत, असे म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्याने जाहीररीत्या माफी मागावी, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी केली आहे. केंद्र सरकार आंदोलकांना खलिस्तानवादी म्हणून बदनाम करत आहेत. जो कोणी विरोध करतो, त्यांना दुदैवाने राष्ट्रविरोधी म्हटले जाते. जे मंत्री अशा प्रकारचे वक्तव्य करतात त्यांनी जाहीररीत्या माफी मागावी. आम्ही अशा वक्तव्यांचा आणि भूमिकेचा निषेध करतो, असे बादल म्हणाले.

‘आरएलपी’चा शेतकऱ्यांना पाठिंबा 
नागौर, राजस्थान : राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते आणि खासदार हनुमान बेनिवाल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे मोर्चा रवाना झाला. कोटपुटली येथे शेकडो शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला आणि त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली, असे बेनिवाल यांनी पत्रकारांना सांगितले. सध्याची स्थिती करो या मरो अशीच आहे. राजस्थानचे शेतकरी देशातील शेतकऱ्यांबरोबर खंबीरपणे उभे आहेत, असेही ते म्हणाले. केंद्रातील एनडीए सरकारने स्वामिनाथन समितीच्या अहवालावर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली


इतर अॅग्रो विशेष
तुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५...कोल्हापूर : जिल्ह्यातील तुळशी (ता.राधानगरी)...
टीका, आरोपांचा समाचार; दुसऱ्या दिवशीही...नवी दिल्ली : संयुक्त किसान मोर्चाने आयोजित शेतकरी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
ढगफुटीने हाहाकारपुणे : पश्‍चिम महाराष्ट्रात मॉन्सूनच्या पावसाने...
सांगलीत नदीकाठच्या नागरिकांचे स्थलांतर सांगली ः चांदोली धरणक्षेत्रात अतिवृष्टी सुरू...
पीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान...पुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने...
कोल्हापुरात पावसाचे थैमान, पुराचा विळखा कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार शुक्रवारीही...
तेवीस वर्षीय युवकाची पोल्ट्रीत दमदार...शिवपूर (जि. अकोला) येथील शुभम महल्ले या तरुणाने...
शेतीसह डाळी, बेसन पीठ प्रक्रिया ठरली...करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुधीर...
शेतकऱ्यांच्या प्रश्नी संसद दणाणली;...नवी दिल्ली ः संसदेत गुरुवारी (ता.२२) शेतकरी...
‘शेतकरी संसदे’त कृषी कायद्यांवर हल्लाबोलनवी दिल्ली  : जंतर-मंतर येथे संयुक्त किसान...
महाबळेश्वरात ४८० मिलिमीटर पाऊस !!!सातारा ः महाबळेश्वरात मुसळधार पाऊस सुरू आहे....
रत्नागिरीत पावसाचे थैमानरत्नागिरी ः जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारख्या...
‘मुळशी’च्या पाणलोट क्षेत्रात ३७०...पुणे ः जिल्ह्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीरसिंधुदुर्गनगरी ः जिल्हयात मध्यरात्रीपासून...
मराठवाड्यात तब्बल ७७ मंडलात अतिवृष्टी औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता.२२)...
सोमवारपर्यंत ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा...पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकणासह, मध्य...
राज्यात अतिवृष्टीने दाणादाण पुणे : कोकणातील सर्वंच जिल्ह्यांसह राज्यातील काही...
राज्याची कृषी विधेयके लोकाभिप्रायासाठी...पुणे ः महाविकास आघाडी सरकारने नव्या कृषी...
लॉन’ शेतीत मिळवली चांदे गावाने ओळखपुणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या प्रसिद्ध...