शेतकऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार; राज्यात ठिकठिकाणी बंद

शेतकऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार; राज्यात ठिकठिकाणी बंद
शेतकऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार; राज्यात ठिकठिकाणी बंद

पुणे : शेतीमालाला दीडपट भाव द्यावा, सातबारा कोरा करावा, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक अशा देशव्यापी दहा दिवसीय संपाला पहिल्याच दिवशी राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला. संप असतानाही शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या अनेक जिल्ह्यांमध्ये अडवून संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर माल फेकला तर काही भागांमध्ये दुधाचे टॅंकर अडवून दूध ओतून देण्यात आले. या संपात देशातील १३० संघटना उतरल्या आहेत.  दरम्यान, किसान सभेतर्फे राज्यात तहसील कार्यालयावर जनावरे सोडो आंदोलन आणि मोर्चांचे आयोजन करण्यात आले. लाखगंगा या दूध आंदोलकांच्या गावातूनही वैजापूर तहसील कार्यालयात जनावरे सोडण्यात अाली. तर, अकोले (जि. नगर) येथे किसान सभेतर्फे शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात आला. तर, गेल्या वर्षी शेतकरी संपाची हाक देणाऱ्या नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे सरकारच्या निषेर्धात श्राद्ध घालण्यात आले. काळे कपडे, काळ्या टोप्या आणि काळी गुढी उभारून निषेद व्यक्त करण्यात अाला.   राज्यात दुधाचे टॅंकर अडवून दूध ओतून देण्याच्या ४० घटना घडल्या असून २० भाजीपाल्याची वाहने अडून माल फेकून देण्यात आला. आंदोलनकर्त्यांकडून गनिमी काव्याचे तंत्र अवलंबले जात असल्यामुळे पोलिस पहिल्याच दिवशी हैराण झाले. महासंघाचे प्रवक्ते संदीप गिड्डे म्हणाले की, शेतकरीपुत्र गनिमी काव्याने लढत आहेत. आम्ही आंदोलनाचे मुख्यालय नाशिक असल्याचे घोषित केले मात्र आंदोलन प्रत्यक्षात संगमनेर, पुणे, सांगली, सातारा या पट्ट्यात झाले. विदर्भातही आम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे.  राष्ट्रीय किसान महासंघाने एक जून ते दहा जून या दरम्यान देशव्यापी संपाची हाक दिली आहे. देशातील शेतकरी लढ्याच्या इतिहासात १०० पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दीर्घ मुदतीचा संप करीत सरकारला धक्का देण्याचा प्रयत्न प्रथमच होत आहे. महासंघाचे सर्व पदाधिकारी राज्याच्या विविध भागांत शुक्रवारी मध्यरात्रीपासून विखरले होते. प्रमुख मार्गांवरील शेतमाल रोखून धरण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी विविध जिल्ह्यांमध्ये फिरत होते. संप कालावधीत शेतकऱ्यांनी आपला माल फक्त गावातच विकावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.  नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई या शहराची शेतमालाची रसद तोडण्यावर संपकरी शेतकऱ्यांनी भर दिला आहे. दूध, भाजीपाला, अन्नधान्य विविध भागांमध्ये पोचू न देता सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न संपकरी करीत आहेत. मात्र, संपाच्या पहिल्या दिवशी राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये माल आला होता. दुधाची वाहतूकदेखील बहुतेक भागात सुरळीत होती.  आज (ता. २) संपाच्या दुसऱ्या दिवशी विविध ठिकाणी रास्ता रोको केला जाणार आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांचा शेतमालाचा व दुधाचा स्टॉक असल्यामुळे पुढील दोन दिवसांत मुंबईत टंचाई जाणवण्यास सुरवात होईल, असे महासंघाने म्हटले आहे.   संगमनेरच्या वडगाव पान भागात संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रक अडवून रस्त्यावर माल फेकून दिला. तसेच, समनापूर भागात दुधाचे टॅंकरचे कॉक सुरू करून रस्त्यावर दूध ओतण्यात आले.  पुढील दोन दिवसांनंतर दुधाचा एक थेंबही शहराकडे जाणार नाही अशी आमची भूमिका राहील. सरकारला वठणीवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महासंघाने दिला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com