दिल्लीत ८० रुपये केळी विक्री, जळगावमधून दोन रुपयाने खरेदी 

आम्ही केळीप्रश्‍नी नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्डाशी चर्चा केली. मागण्यांचे पत्र शेतकऱ्यांनी दिले. परंतु या स्थितीत कोरोनाशी लढा महत्त्वाचा आहे, असे तेथील अधिकारी सांगतात. वाहतुकीसाठी हॉर्टीकल्चर ट्रेन उपलब्ध करून देण्याचे त्यांनी म्हटले. परंतु या ट्रेनसाठी हवी तेवढी केळी, वाहतूक भाडे, असे मुद्देही आहेत. केळीचा बाजारात व्यापारी केंद्रीत झाला आहे. हमीभाव, शासकीय खरेदी नसल्याने अडचणी अधिक आहेत. - भागवत विश्‍वनाथ पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय केळी उत्पादक महासंघ
banana
banana

जळगाव ः जळगाव जिल्ह्यातून केळीची दोन ते तीन रुपये प्रतिकिलो या दरात खरेदी करून तिची विक्री दिल्लीत ८० रुपये प्रतिकिलो दरात ग्राहकाला केली जात आहे. तर उत्तर प्रदेश, राजस्थानच्या ग्राहकांनाही किमान ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दरात केळी घ्यावी लागत आहे. खरेदीदार, मध्यस्थ लॉकडाऊनचे कारण रेटून केळी उत्पादकांची बेफाम लूट करीत आहेत.  जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर, नंदुरबारमधील तळोदा, अक्कलकुवा व शहादा भागात केळीची काढणी सुरू आहे. निर्यातक्षम, दर्जेदार केळी काढणीसाठी उपलब्ध आहे. सध्या प्रशासन परवाने देत असल्याने वाहतूक बऱ्यापैकी सुकर झाली आहे. सध्या रोज जळगाव जिल्ह्यातून ५० ते ५५ टन केळीची पाठवणूक उत्तर प्रदेश, दिल्ली, जम्मू-काश्‍मिर व राजस्थानात सुरू आहे. मागील हंगामात एप्रिलमध्ये रोज १०० टनांपेक्षा अधिकची पाठवणूक परराज्यासह राज्यातील बाजारात केली जात होती. जिल्ह्यात उत्तरेकडील खरेदीदारांचे मध्यस्थ पिलबाग केळीची २०० रुपये प्रतिक्विंटल या दरात तर नवती केळीची पावणेतीनशे ते तीनशे रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी करीत आहेत. 

हमीभाव नसल्याने अडचण  केळीला हमीभाव नाहीत. जळगाव जिल्ह्यात ९५ टक्के केळीची विक्री शिवार खरेदीत केली जाते. ही खरेदी अनेक वर्षांपासून उत्तरेकडील खरेदीदार मध्यस्थांतर्फे करून गेत आहेत. सध्याची स्थिती लक्षात घेवून केळी उत्पादक, महासंघाने केळीला किमान ७५० रुपये प्रतिक्विंटलचा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्डाकडे केली आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात नाफेडने केळीची खरेदी करावी, अशी मागणी केळी उत्पादक महासंघ व शेतकऱ्यांनी केंद्राकडे केली आहे. 

बऱ्हाणपूरचा बाजार ठप्प, खरेदीरांची चांदी  जळगावमधील रावेर, मुक्ताईनगर या केळी उत्पादनासाठी अग्रेसर असलेल्या भागाच्या सिमांलगतच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजार आहे. हा बाजार केळीसाठी मध्य भारतात प्रसिद्ध असून, तेथे एप्रिल ते जूनदरम्यान रोज २५० ते २८० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीचे लिलाव होतात. पारदर्शकता, सूसूत्रता यासाठी या बाजाराची मोठी चर्चा असते. परंतु हा बाजार लॉकडाऊनमुळे विस्कळीत, ठप्प असल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांची लूट वाढली आहे. 

उत्पादन खर्च निघेना, २०१५-१६ नंतर नीचांकी दर  केळीचा एकरी खर्च ५० हजार रुपयांपासून सव्वालाख रुपयांपर्यंत आहे. रावेर, मुक्ताईनगर, यावल भागात बहुसंख्य केळी उत्पादक केळीसाठी फर्टीगेशन, उतिसंवर्धित रोपे, फ्रूटकेअर तंत्र याचा अवलंब करू लागले आहेत. त्यांचा खर्च मोठा असून, निर्यातक्षम केळी उत्पादन आहे. परंतु सध्या उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. खानदेशात २०१५-१६ नंतर केळीचे दर नीचांकी स्थितीत पोचल्याचे शेतकरी विकास महाजन (ऐनपूर, जि.जळगाव) म्हणाले. 

लॉकडाऊनचा बहाणा, कारणांचा रतीब  केळीचे कमी दर यासंबंधी काही दिवसांपूर्वी रावेर बाजार समितीने खरेदीदार, व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात लॉकडाऊनमुळे वाहनभाडे लाखभर रुपये झाले आहे, उत्तर भारतात कोल्डस्टोरेजची अडचण असते, दिल्ली, उत्तर प्रदेशातील अनेक बाजारांमध्ये दोनच तास शेतमाल, भाजीपाला विक्रीची मुभा असते, अशात केळी पडून राहण्याची भिती आहे, वाहने एका बाजूने भरून जातात व तेथून येताना रिकामी येतात. याचा फटका बसतो. वाहनभाडे महागले आहे, अशा कारणांचा रतीब खरेदीदार देत आहेत. पुन्हा एक बैठक रावेर बाजार समितीने घेतली, त्यात व्यापारी, खरेदीदारांनी अनुपस्थित राहून कुठलीही भूमिका नंतर सांगितली नाही. दुसरीकडे कवडीमोल दरात केळीची खरेदी सुरूच असून, केळी नाशवंत असल्याने शेतकऱ्यांना विक्री करावीच लागत आहे. 

उत्तरेकडे घाऊक दर वाढले  उत्तर भारतातील दिल्लीच्या बाजारात केळीचे घाऊक दर २८०० रुपये प्रतिक्विंटलपुढे आहेत. उत्तर प्रदेशातील विशालपूल, कानपूर, लखनऊ येथे प्रतिक्विंटल २४०० रुपयांवर दर आहेत. तर राजस्थानमधील धौलपूरच्या बाजारातही २४०० रुपयांवर दर आहेत. तेथे लॉकडाऊनमध्ये केळीच्या घाऊक दरात २५ ते ३० टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याची माहिती जाणकारांनी दिली.  शरद पवारांनी केंद्राशी चर्चा करावीः उत्पादकांचे साकडे  केळीचे कमी दर व विस्कळीत बाजार यासंदर्भात माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकार, नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्ड यांच्याशी चर्चा करावी, अशी अपेक्षा केळी उत्पादक, केळी उत्पादक महासंघाने व्यक्त केली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com