‘महाबीज’च्या सभेवरून रणकंदण 

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची (महाबीज) मंगळवारी (ता.२२) आयोजित केलेल्या ऑनलाइन सभा आधी ‘ऑफलाइन’ गाजली. सकाळीच काही भागधारक मुख्यालयात जाण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना अडविले.
mahabeez
mahabeez

अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची (महाबीज) मंगळवारी (ता.२२) आयोजित केलेल्या ऑनलाइन सभा आधी ‘ऑफलाइन’ गाजली. सकाळीच काही भागधारक मुख्यालयात जाण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यांना अडविले. यामुळे मुख्यालयासमोर प्रशासनाविरोधात एकच रोष व्यक्त करीत भागधारकांनी काही काळ ठिय्या दिला. ‘महाबीज’ प्रशासनाला भागधारकांच्या रोषाला बळी पडावे लागणार असल्याची आधीच कुणकूण लागल्याने दंगाकाबू पथकासह तगडा बंदोबस्त मुख्यालयात लावण्यात आला होता. 

‘महाबीज’ची सर्वसाधारण सभा कोरोनामुळे यंदा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या सभेत सहभागी होण्यासाठी भागधारकांना लिंक देण्यात आली होती. एक वाजता ही सभा नियोजित होती. तत्पूर्वी काही भागधारक या ठिकाणी जमा झाले. त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु ‘महाबीज’ प्रशासनाने या ठिकाणी दोन्ही गेटवर पोलिसांसह दंगाकाबू पथक तैनात केले होते. हा बंदोबस्त पाहून भागधारकांनी तीव्र शब्दात ‘महाबीज’विरुद्ध माध्यम प्रतिनिधींजवळ प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष  सातवा वेतन आयोग व इतर मागण्यांवरून ‘महाबीज’चे कर्मचारी संपावर गेलेले आहेत. आंदोलन सुरु होऊन बरेच दिवस लोटले. परंतु त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला, तोडगा काढायला कुणीही पुढे आलेले नाही. नफ्यात असलेल्या या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी शासनाच्या एक रुपयाचीही गरज नसताना वेतन आयोग लागू करण्यास टाळाटाळ करण्यात आलेली आहे. याविरुद्ध कर्मचारी संपावर आहेत. मंगळवारी सर्वसाधारण सभा असताना कर्मचारी मुख्यालयासमोर आपल्या मागण्या सुटतील या अपेक्षेने थांबलेले होते. कुणीही लक्ष देत नसल्याने या आंदोलनाचा तोडगा कधी व कसा निघेल याबाबत कर्मचारीही साशंक आहेत.  सभेची केवळ औपचारीकता  ‘महाबीज’ची मंगळवारी झालेली सर्वसाधारण सभा औपचारीक ठरली. यामध्ये प्रभारी व्यवस्थापकीय संचालक वगळता कुठलाही वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाला नव्हता. भागधारकांचे प्रश्‍न तितक्या तळमळीने मांडण्यास वाव नव्हता. किती मुद्यांवर गांभिर्याने दखल घेतली जाईल याबाबत साशंकता आहे. दरवर्षी होणाऱ्या सभेत घमासान चर्चा होते. भागधारकांच्या प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढल्या जात असतो. यंदाची ही सभा केवळ औपचारिकता म्हणून घेण्यात आल्याचे एका ज्येष्ठ भागधारकाचे म्हणणे होते.  प्रतिक्रीया मी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालो होतो. तेथे ८० हजार शेतकरी असूनही शासनाने दंगाकाबू पथक ठेवले नव्हते. ‘महाबीज’ प्रशासनाने दंगाकाबू पथक उभे करण्याचे कारण काय? भागधारक घाबरणार नाहीत.  - गजानन तात्या कृपाळ, भागधारक, ‘महाबीज’, जानेफळ, जि. बुलडाणा 

वर्षातून एकदा सर्वसाधारण सभा होते. यंदा ही बैठक ऑनलाइन ठेवली. वास्तविक कास्तकारांना याबाबत काय समजते. अधिकारी बाहेरून बियाणे आणतात. ते बियाणे निकृष्ट निघते. तुम्‍ही स्थानिक शेतकऱ्यांकडून बियाणे घ्या ना. बाहेरच्या बियाण्याला उगवणशक्तीच नसते. अशा व्यवहाराचा भागधारकांना काहीच फायदा होत नाही. याबाबत आम्ही बोललो असतो. परंतु त्यांनी सभाच ऑनलाइन ठेवली. हा प्रकार योग्य नाही.  - जुगल पाटील, शेतकरी तथा भागधारक, ‘महाबीज’   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com