जळगावात यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचा शेतकऱ्यांना फटका  

जळगाव ः शासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आणि रोजचे नवे आदेश यामुळे बाजार समितीचे कामकाज, लिलाव, दूध वितरण, शहरांमधील थेट शेतमाल विक्री याबाबत सूसूत्रता दिसत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, ग्राहकांनाही चढ्या दरात खरेदी करावी लागत आहे.
Farmers are shocked there is no coordination between systems in Jalgaon
Farmers are shocked there is no coordination between systems in Jalgaon

जळगाव ः शासकीय यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आणि रोजचे नवे आदेश यामुळे बाजार समितीचे कामकाज, लिलाव, दूध वितरण, शहरांमधील थेट शेतमाल विक्री याबाबत सूसूत्रता दिसत नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, ग्राहकांनाही चढ्या दरात खरेदी करावी लागत आहे.  

बाजार समितीबाबत मागील १८ ते २० दिवसांत अनेकदा नवे नियम, आदेश लागू झाले आहेत. तर दोनदा भाजीपाला मार्केटमधील लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे गोंधळ आणखीच वाढून दरातील चढउतार कायम राहीले व शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सुरवातीला धान्य मार्केट यार्डात अडतदारांना जाण्यापासून पोलिस रोखत होते. यानंतर हमाल, कामगारांना अडवून पोलिसांनी मारहाण केली. हा विषय जिल्हा प्रशासनापर्यंत पोचला. 

तक्रारी झाल्यानंतर हमाल, अडतदारांना पास देण्यास सुरवात झाली. भाजीपाला मार्केट यार्डात गर्दी वाढून सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखले जात नसल्याचे कारण देत लिलाव बंद करण्यात आले. ‘कोरोना’च्या भीतीने बाजार समितीचे कर्मचारी भाजीपाला मार्केट यार्डात जात नव्हते. बाजार समिती प्रशासनानेदेखील हतबलता दाखविली. बाजार समिती प्रशासनाने पोलिस बळाची मदत मागितली. तर ती देण्यास पोलिस विभागाने नकार दिला. 

नंतर बाजार समिती तीन दिवस बंद झाली. पुन्हा शासनाच्या आदेशानंतर बाजार समिती सुरू करण्यात आली. परंतु सामाजिक अंतर राखले जात नसल्याच्या कारणावरून पाच अडतदारांचे परवाने भाजीपाला मार्केट यार्डात निलंबित करण्यात आले. खरेदीदार गर्दी करीत होते, तेच गोंधळ घालत होते. परंतु नुकसान शेतकरी व अडतदारांचे झाले. ही गर्दी वाढतच असल्याने नंतर रविवार (ता. १२) ते मंगळवार (ता. १४) बाजार समिती बंद झाली. खरेदीदारांना प्रवेशपत्र बंधनकारक केले. परंतु प्रवेशपत्रांची सक्ती करूनही बाजार समितीमधील भाजीपाला मार्केट यार्डातील गर्दी कमी होत नसल्याची स्थिती आहे. 

पोलिस यंत्रणा असली तर मोठी मदत होईल, गर्दीवर नियंत्रण राहू शकते, असे बाजार समिती प्रशासनाचे म्हणणे आहे. तर जिल्हा प्रशासन बाजार समितीचे लिलाव, व्यवहार सुरळीत ठेवण्याचे काम बाजार समिती प्रशासनाचे आहे, असे सांगून हात वर करीत आहे. 

जळगाव व इतर शहरांमध्ये शेतकरी बाजार भरविण्यासाठी शेतकरी गट सतत पाठपुरावा करीत होते. जळगाव शहरातील शेतकरी बाजारासंबंधी आसोदे (ता.जळगाव) येथील नवनिर्मिती शेतकरी गटाने प्रशासनाकडे जागा मागितली होती. परंतु ही मागणी सतत दुर्लक्षित राहीली. हा बाजार सुरू झाला असता तर सध्याच्या अडचणीच्या काळात जळगाव व लगतच्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची विक्री या बाजारात झाली असती. परंतु या बाजाराकडे कृषी विभाग व पालिकेने सतत दुर्लक्ष केल्याचा मुद्दा शेतकरी आता उपस्थित करीत आहेत. 

पालिका-कृषी विभागात समन्वय नाही  मागील आठवड्यात शहरात थेट कलिंगड विक्रीसाठी आलेल्या उमाळे (ता. जळगाव) येथील शेतकऱ्यांचे ट्रॅक्‍टर जळगाव पालिकेने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दंड वसुलीची कार्यवाही सुरू केली. या शेतकऱ्यांकडे थेट शेतमाल विक्री व वाहन शहरात फिरविण्याचा परवाना होता. तो कृषी विभागाने जारी केलेला होता. परंतु पालिकेचे अधिकारी हा परवाना, मान्यता यांची दखल घेत नव्हते. शेवटी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पालिकेत यावे लागले. शाब्दिक चकमकी झाल्या व शेवटी हा मुद्दा मार्गी लागला. 

दूध विक्रेत्यांची पोलिस यंत्रणेकडून अडवणूक  दूध विक्रीसाठी जळगाव व इतर शहरात जाणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना सायंकाळी अडविले जाते. सायंकाळी सातनंतर शहरात थांबू नका, असा दम पोलिस यंत्रणा भरते. मध्यंतरी वडनगरी (ता.जळगाव) येथील किरकोळ विक्रेत्यांच्या दुचाकी अडवून त्यांना मारहाण झाली. यामुळे दूध विक्रेतेदेखील संभ्रमात आहेत. दूध विक्री सकाळी ११ ते सायंकाळी पाचदरम्यान करण्याचा फतवाही प्रशासनाने काढला होता. परंतु तो मागे घेण्यात आला व पहाटेपासून रात्रीपर्यंत दूध विक्री सुरू करण्यास प्रशासनाने नवा आदेश काढून मुभा दिली. 

थेट शेतमाल विक्रीबाबत कृषी विभागाने परवाने शेतकऱ्यांना दिले. परंतु जळगाव शहरात काही शेतकऱ्यांची अडवणूक झाली. पालिका कृषी विभागाचे परवाने, मान्यता यांची दखल घेत नव्हती. बाजार समितीदेखील कधी सुरू तर कधी बंद असते. विस्कळीतपणाच वाढत आहे. हा समन्वयाचा अभाव शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहे.  - किशोर चौधरी, अध्यक्ष, नवनिर्मिती शेतकरी गट, आसोदे, ता. जळगाव 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com