पणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी संघटनांची मान्यता

पणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी संघटनांची मान्यता
पणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी संघटनांची मान्यता

मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) (तिसरी सुधारणा) विधेयक २०१८ मधील प्रस्तावित सुधारणेच्या दुरुस्तीला शेतकरी संघटनांनी मान्यता दिली. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम खरेदीदाराने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, ही दुरुस्ती मागे घेण्यास शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी मान्यता दर्शवली आहे. 

शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेल्या दोन लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या शेतीमालाच्या संदर्भात विक्रेत्यांच्या वतीने कोणतीही रक्कम स्वीकारण्यास अथवा स्वत:च्या खात्यातून शेतकऱ्यांना रक्कम अदा करण्यास अडते, व्यापाऱ्यांना विधेयकाद्वारे मनाई करण्यात आली होती. याविरोधात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी, अडते आणि माथाडी संघटनांनी बेमुदत संप पुकारून विरोध दर्शवला होता. त्यामुळे राज्य शासनाने हे विधेयक मागे घेतले आहे. 

त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात नुकतीच शेतकरी संघटना, व्यापारी संघटना व हमाल मापाडी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. विधेयकातील दुरुस्त्यांवर चर्चा करण्यासाठी शासनाने या संघटनांची बैठक आयोजित केली होती. या वेळी महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात दुरुस्ती करून शेतीमाल नियंत्रणमुक्त करण्यासाठी सादर केलेल्या विधानसभा विधेयकाचे शेतकरी संघटनेने स्वागत केले. 

बैठकीत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, अभिमन्यू शेलार, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरली. दोन लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम खरेदीदाराने थेट शेतकऱ्यांच्‍या खात्यावर जमा करावी ही दुरुस्ती मागे घेण्यास शेतकरी संघटनेने मान्यता दिली. मात्र, सर्व शेतीमालाचे व्यापार बाजार समितीच्या आवारा बाहेर करण्यास कायद्याचे बंधन राहणार नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांना कुठेही शेतमाल खरेदी करण्यास परवानगी असेल, हमाल माथाडी कायदा बाजार समिती आवारा पुरताच मर्यादित असावा, एक टक्का मार्केट सेस रद्द करावा, या मागण्यांवर शेतकरी संघटना ठाम राहिली. 

महसूलमंत्री चंत्रकांत पाटील व ग्राहक संरक्षणमंत्री प्रकाश मेहता यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली होती. विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख आणि कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com