शेतकरी संघटनेचा ठिय्या;  ३५ रोहित्रांची जोडली वीज 

पातूर तालुक्यातील सस्ती परिसरातील शेतकऱ्यांकडून थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कुठलीही पूर्वसूचना न देता थेट ३५ रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडीत केल्याने एकच खळबळ उडाली होती.
Farmers' Association; Connected power of 35 Rohitras
Farmers' Association; Connected power of 35 Rohitras

अकोला ः पातूर तालुक्यातील सस्ती परिसरातील शेतकऱ्यांकडून थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणने कुठलीही पूर्वसूचना न देता थेट ३५ रोहित्रांवरील वीजपुरवठा खंडीत केल्याने एकच खळबळ उडाली होती. रब्बी व इतर पिकांचे सिंचन कसे करावे, हा प्रश्‍न निर्माण झाला होता. या बाबत शेतकरी संघटनेने अनेक तासांपर्यंत ठिय्या आंदोलन केल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तोडगा काढत रोहित्रांची वीज जोडून दिली.  पातूर तालुक्यातील सस्ती परिसरात महावितरणने शेतकऱ्यांना कुठली पूर्वसूचना न देता गावातील ३५ रोहित्रांची वीज तोडली होती. या वेळी कांदा बियाणे, हरभरा, गहू या पिकांची उगवण सुरू असतानाच वीजपुरवठा खंडित केल्यामुळे शेतकरी हताश झाले होते. सस्ती गावातील शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशमुख यांनी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर यांच्याशी संपर्क साधून रविवारी (ता. ५) गावात शेतकरी संघटनेच्या सभेचे आयोजन केले होते. या सभेत सोमवारी (ता. ६) वीज वितरण कार्यालयावर धरणे आंदोलन देण्याचे ठरले. या मुद्यावर त्या दिवशी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व महावितरण कर्मचाऱ्यांमधील चर्चा फिसकटली.  बाळापूरचे उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर गिरी यांनी सुद्धा मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. पण महावितरणने त्यांना दाद दिली नाही. शेतकरी संघटनेचे कार्यकर्तेसुद्धा एक रुपयाचेही बील भरणार नसल्याची भूमिका घेतली. आधी आमचे बिल दुरुस्त करून द्या. नंतर कसे भरायचे ते बघू ही भूमिका संघटनेचे अध्यक्ष ललित बाहाळे यांनी घेतली. त्यामुळे ठिय्या आंदोलन चिघळत केले. कुठलाही तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी दीड दिवस ठिय्या आंदोलन करीत तेथेच बसले. या वेळी शेतकऱ्यांनी महावितरणच्या परिसरातच स्वयंपाक करून भंडारा केला. रात्रीचा मुक्काम ठोकला. मंगळवारी (ता. ७) दुपारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बाहाळे, सतीश देशमुख, राजाभाऊ देशमुख, भालचंद्र फोकमारे यांच्याशी महावितरणचे अधीक्षक अभियंता कचोट, उपकार्यकारी अभियंता संतोष खुमकर, पोलिस निरीक्षक राहुल वाघ, आमदार नितीन देशमुख यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या दरम्यान आधी दहा हजार नंतर पाच हजार व नंतर दोन हजार, अशी वीजबिलाची मागणी महावितरणतर्फे करण्यात आली. परंतु वीजबिल दुरुस्त झाल्याशिवाय कुठलेही बिल भरणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेने शेवटपर्यंत घेतली. अखेर शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे महावितरणला शेतकऱ्यांची तोडलेली वीज जोडून देण्याचा निर्णय घ्यावा लागला. या वेळी श्याम देशमुख, नीलेश नेमाडे, दिनेश गिर्हे, आकाश देऊळकार, महिला आघाडी ज्योत्स्ना बाहाळे यांच्यासोबत सस्ती गावातील महिला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com