पीकविम्या वरून शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाला धरले धारेवर

वनमाला डोंगरे यांच्याकडून सोयाबीनविषयी माहिती जाणून घेताना आर. पी. सिंह.
वनमाला डोंगरे यांच्याकडून सोयाबीनविषयी माहिती जाणून घेताना आर. पी. सिंह.

अमरावती  ः पीकविमा हप्ता भरायची जशी सक्‍ती करता, तशी कंपन्यांना भरपाईसाठी सक्‍ती का करत नाही, या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकांतील अधिकाऱ्यांसह सदस्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘‘विमा कंपन्यांच्या प्रतिनिधी ले देखील सोबत आमची परिस्थिती पहाले ठेवा लागत होतं,’’ अशी मागणीदेखील या वेळी शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांच्या या मागणीमुळे वातावरण चांगलेच तापले होते. 

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आर. पी. सिंग यांच्या नेतृत्वातील पथकाने शुक्रवारी (ता. २२) अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतशिवारांची पाहणी केली. या वेळी या पथकाला शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाचा सामना ठिकठिकाणी करावा लागला. पीक नुकसानीच्या मदतीऐवजी पीकविमा कंपन्यांनी पुकारलेल्या असहकाराच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. विमा भरपाई रक्कम जर मिळत नसेल, तर मग विमा संरक्षणाची सक्‍ती करून शेतकऱ्यांना शक्‍य नसतानाही त्यांच्याकडून विमा हप्ता का भरून घेता, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारत संबंधित पथकाला निरुत्तर केले.

विशेष म्हणजे, अनेक शेतकऱ्यांनी थोड्याफार वाचलेल्या सोयाबीनची कापणी, मळणी करून ते विकूनही टाकले आहे. त्यामुळे आता तुमच्या दौऱ्यातून काय साध्य होणार आणि आम्हाला कशी भरपाई मिळणार, असा जाबही अनेक ठिकाणी पथकाला विचारण्यात आला. सोयाबीन काढलेल्या अनेक शेतकऱ्यांनी आता रब्बी गहू, हरभऱ्यासाठी शेत तयार केले आहे, त्यामुळे शेतात नुकसानीचा अंशच उरला नाही, त्यामुळे ही पाहणी केवळ दिल्लीतील अधिकाऱ्यांसाठी एक सहल असल्याचे देखील उघडपणे अधिकाऱ्यांसमोर बोलले जात होते. त्यामुळे या पथकाच्या संरक्षणासाठी असलेल्या पोलिसांनाच वेळोवेळी हस्तक्षेप करावा लागला. आम्ही कोणताही वाद घालत नसून आमचा हा वैताग झालेल्या नुकसानीपोटी असल्याचे शेतकरी उपस्थित पोलिसांना सांगत होते.

अमरावती जिल्ह्यातील दाभा, जळू, जसापूर, माहुली चोर, धानोरा गुरव; तर यवतमाळ जिल्ह्यातील वटफळी, लोणी, मोझर, घारफळ, सातेफळ या गावांतील पीक स्थितीचा आढावा पथकाने घेतला. त्यापूर्वी विभागीय आयुक्‍त पीयूष सिंह यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्‍त कार्यालयातील बैठकीत पाच जिल्ह्यांतील पीकपरिस्थितीचा आढावा घेण्यात आला. विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन केंद्राचे तज्ज्ञ या वेळी उपस्थित होते. अमरावती, यवतमाळचा दौरा करून हे पथक शनिवारपासून (ता. २३) अकोला, वाशीम जिल्ह्यातील पीकपरिस्थितीची पाहणी करणार आहे. 

‘खर्च बी निगाला नाई बघा’ पथक नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील माहुली चोर गावावरून जात होते. या वेळी एका घरासमोर सोयाबीन वाळत घालणारी महिला बघून पथक थांबले. या वेळी आर. पी. सिंग यांनी कुजलेले सोयाबीन बघत वनमाला बाबूराव डोंगरे या शेतकरी महिलेकडे उत्पादनाविषयी विचारणा केली. त्या वेळी ‘सायेब, लागवणीचा खर्च बी निगाला नाई बगा’, असे सांगत भरीव मदतीची मागणी केली. ‘पाणी इतकं झालं की सोयाबीनची पत खालावली, या सोयाबीनला बाजारात हजार रुपये क्‍विंटलचाबी भाव नाही. आमच्या चार एकरांतील उत्पन्नावरच सारं वरीस भागवतो; आता काय करावं, असा प्रश्‍न वनमाला डोंगरे यांनी उपस्थित केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com