पाऊस थांबायचे नाव घेईना; शेतकरी अडचणीत

आमच्या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतातील सोयाबीनच्या गंजी पाण्यात वाहून गेल्या. उशिरा पेरणी झाल्यामुळे ७० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी झालेली नाही. शेतातील उभ्या पिकांचे भिजून नुकसान होत आहे. - तिरुपती कनकंटे, शहापूर, जि. नांदेड
पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान
पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान

पुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच असल्याने पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. उजनी धरणातून ५० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोल्हापुरात नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बुलडाण्यातही नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून, पावसाने मराठवाड्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. बुधवारी (ता. २३) सकाळपर्यंच्या २४ तासांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडला. पुणे जिल्ह्यातील किकवी (ता. भोर) येथे १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाळ्यात अभूतपूर्व पूर आला. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त भागात पावसाची ओढ होती. जोरदार पाऊस आणि पुरातून वाचलेल्या तसेच दुष्काळग्रस्त भागात कशाबशा जगलेल्या पिकांना आता मॉन्सूनोत्तर पावसाने दणका दिल्याने हातातोंडशी आलेला घास हिरवणार असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भरच पडत आहे. 

नाशिक जिल्ह्यात पावसाने जोर धरल्याने द्राक्ष शेतीवर संकट कोसळले आहे. द्राक्ष पट्ट्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने द्राक्ष उत्पादकांची धावपळ उडाली आहे. पूर्वहंगामी द्राक्ष बागा अडचणीत आल्या असून, कोट्यवधी रुपयांचा खर्च वाढण्यासह मोठ्या प्रमाणावर एकरी उत्पादन घटण्याचा धोका आहे. दिंडोरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे चिंचखेड, तिसगाव, जोपूळ, वडनेर भैरव, कारसुळ, निफाड, नाशिक तालुक्यात जोरदार पाऊस झाला. फुलोरा अवस्थेतील बागांमध्ये घडकुज ही समस्या वाढली आहे तसेच डाऊनी व करपा मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. पूर्वहंगामी द्राक्षांना तडे गेल्याने मोठ्या प्रमाणावर माल खराब झाला. त्यामुळे मण्यांची प्रतवारी ढासळली आहे. 

पुणे जिल्ह्यात पावसामुळे खरीप पिकांचे आणि नुकत्याच लागवड झालेल्या कांदा, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. बुधवारी सकाळपर्यंत भोर तालुक्यातील किकवी येथे सर्वाधिक १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नीरा नदीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने भाटघर धरणातून ५८००, वीर धरणातून ४६३७, नाझरे धरणातून ४ हजार क्युसेक वेगाने, तर घोड धरणातून सुमारे ९ हजार क्युसेक, उजनी धरणातून तब्बल ५० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने परिपक्व झालेल्या भातावर कीड - रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. पावसामुळे कापणी होऊ शकलेला नाही अशा भाताला कोंब फुटू लागले आहेत. सिंधुदुर्गातील भातशेती परिपक्व होऊन आता पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लोटला आहे. भातांच्या लोंब्याचा खच मळ्यांमध्ये पडत आहे, तर दुसरीकडे सतत पडत असलेल्या पावसामुळे तयार झालेला, पण पावसामुळे कापणी होऊ शकलेली नाही. 

कोल्हापूर जिल्ह्यातील पावसामुळे नऊ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणे, प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, व शिरोळ हे ७ बंधारे पाण्याखाली आहेत. तर दूधगंगा नदीवरील सुळकूड हा बंधारा, भोगावती नदीवरील हळदी बंधाराही पाण्याखाली गेला आहे.

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी, तसेच मॉन्सूनोत्तर पावसाने शेतकरी हवादिल झाले आहेत. पावसाने काढणीस आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. काढणी झालेली पिके पावसाने भिजून कुजली आहेत, तर आणि काही ठिकाणी त्यांना मोड आले आहेत. पावसाचा फटका सर्वाधिक सोयाबीन, भात, बाजरी, द्राक्ष, डाळिंब, स्ट्रॉबेरी या पिकांना बसला आहे. पावसाने शेतात पाणी साचून सोयाबीन, भुईमूग पीक कुजले आहेत. भातपीकही जमीनदोस्त झाले आहे. काढणी झालेली पिके मोड येऊन वाया गेली. फलटण, माण, खटाव तालुक्यांतील द्राक्ष व डाळिंब पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. महाबळेश्‍वर, जावळीतील लागवड झालेल्या स्ट्रॉबेरीच्या वाढीवर परिणाम झाला. 

सांगली जिल्ह्यात सलग गेले चार दिवसांपासून पडणाऱ्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे सोयाबीन, मक्यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शिराळा तालुक्यात भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या पावसाने नदी काठावरील भागासह दुष्काळग्रस्त भागातही पिके पुन्हा पाण्याखाली आहेत. सध्या सोयाबीन, मका, बाजरी, भात या पिकांची काढणी सुरू आहे. परंतु शेतात पाणी साचल्याने कामे थांबली आहेत. बाजरीची कणसे भिजली आहेत. चारापिके पाण्याखाली आहेत. झेंडू, शेवंती, गुलाब या फुलांचे व भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने भुईमूग कुजण्याची शक्यता आहे.

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील हलका ते मध्यम पाऊस झाला. अनेक मंडळांमध्ये जोरदार सरी पडल्या. पावसात अजिबात खंड पडत नसल्याने खरिपाच्या पिकांची नासाडी होत आहे. कुरुळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कापणी केलेले सोयाबीन, ज्वारी आदी पिकांचे भिजून मोठे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांना देखील मोड फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. ओलावा, तसेच दमट वातावरणामुळे गंजी लावून ठेवलेल्या सोयाबीनवर बुरशीची वाढ होऊन शेंगा व ज्वारीची कणसे काळवंडली आहेत. शेतामधील बोंडातून फुटलेल्या कापसाला तसेच सोयाबीनला मोड फुटले आहेत. नदीकाठाच्या शेतांतील सोयाबीन पाण्यात वाहून गेले. 

पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तसेच खडकपूर्णा धरणातून विसर्ग सुरू असल्याने पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे परभणीतील येलदरी धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होत आहे. बुधवारी (ता. २३) सकाळी आठ वाजता येलदरी धरणामध्ये १५.७९ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा होता. गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पाच्या धरणात ९९ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला. निम्न दुधना तसेच सिद्धेश्‍वर धरणामध्ये पाणीसाठा उणे पातळीत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपू्र्णा धरण ९९ टक्के भरले असल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

अकोला जिल्ह्यात सततच्या पावसाचा ज्वारी पिकाला मोठा फटका बसला आहे. सध्या ज्वारीचे पीक कणीस परिपक्व होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. परिपक्व झालेले दाणे काळे होत आहेत. विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या देऊळगाव राजा तालुक्यात या मोसमात सर्वांत कमी पाऊस पडला होता. मंगळवारी झालेल्या पावसामुळे काही भागात नदी नाले दुथडी भरून वाहिले. अशी आहे स्थिती

  • पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीत पूरस्थिती
  • उजनी धरणातून ५० हजार क्युसेकने विसर्ग
  • कोल्हापुरात ९ बंधारे पाण्याखाली
  • मराठवाड्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ
  • द्राक्षे, डाळिंब, स्ट्रॉबेरी संकटात
  • भातावर कीड - रोगांचा प्रादुर्भाव
  • ज्वारी, सोयाबीन, बाजरीला मोठा फटका
  • दाणे कुजले, कणसे, शेंगांमधून मोड बाहेर
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com