मूग उत्पादकांना कोट्यवधीचा फटका

शासनाची हमीभाव खरेदी केंद्रे उशिरा सुरू होतात. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळेल याची शासनाने गांभीर्याने काळजी घ्यायला पाहिजे. दुर्दैवाने सध्या तसे होताना दिसत नाही. त्यामुळे बाजारात शेतकऱ्यांना क्विंटलला १५०० रुपयांपर्यंत कमी दर मिळत आहे. शासनच मुळात हमीदर मिळण्यासंदर्भात गांभीर्याने घेत नाही. - दिलीप मुठे, शेतकरी, मुठेवडगाव, ता. श्रीरामपूर जि. नगर
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर / अकोला   ः नगर जिल्ह्यामध्ये हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्याबाबत बाजार समित्या, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. नगरमध्ये गेल्या महिनाभरात सुमारे पंधरा हजार क्विंटल मुगाची सरासरी ५५०० ते ६५०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी झाली आहे. जिल्ह्यातील चौदाही बाजार समित्यांमध्ये हाच दर मिळत आहे. फक्त नगर बाजार समितीतील मूग विक्रीचा विचार करता शेतकऱ्यांना ८२ लाख ते सव्वादोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे. अकोला बाजार समितीत मुगाला ३८०० ते ५६०० रुपये तर सरासरी ४५०० रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. 

शासनाने मुगाला जाहीर केलेल्या ७०५० रुपये या हमीभावापेक्षा सुमारे अडीच हजार रुपये कमी दराने त्याची विक्री होत आहे. सोयाबीन, उडदाचीही स्थिती अशीच आहे. उत्पादन खर्च वाढत असल्याने शेती परवडत नाही. त्यामुळे शेतीमालाला हमीदर मिळावा, यासाठी शासनाने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हमी केंद्रे सुरू केली. यंदा नगर जिल्ह्यात सात ठिकाणी ही केंद्रे सुरू केली जाणार आहेत. मात्र, ही केंद्रे सुरू व्हायला अजून अवधी आहे. सध्या फक्त नाव नोंदणी केली जात आहे. बाजारात मात्र गेल्या महिनाभरापासून खरिपातील मूग, उडदाची आवक सुरू झाली आहे. हमीदराने शेतीमालाची खरेदी होणे गरजेचे असताना, त्याकडे मात्र नेहमीप्रमाणे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे. 

नगर बाजार समितीत गेल्या महिनाभरात मुगाची सुमारे १५ हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक झाली आहे. उडदाचीही साधारण दोन हजार क्विंटलची आवक झाली. मात्र, हमीदराने खरेदी करण्यासाठी लागणारा दर्जा नसल्याचे कारण सांगत उडीद, मुगाची सर्रासपणे हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी केली जात आहे. हमीदरापेक्षा कमी दराने खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याचा नियम आहे. त्यासाठी तालुका उपनिबंधक व बाजार समितीचे सचिव यांची हमीदराने खरेदी करण्यात येत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती आहे. मात्र, समितीसह प्रशासनाकडूनही अजून तरी कारवाईबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. 

शासनाने ठरवून दिल्यानुसार यंदा मुगाला ७०५० रुपये, उडदाला ५७०० रुपये, तर सोयाबीनला ३७१० रुपये हमीदर निश्चित केलेला आहे. मात्र सध्या बाजारात मुगाची ५५०० ते ६५००, उडदाची ५५०० पर्यंतच्या दराने खरेदी होत आहे. सोयाबीन, हरभऱ्याची सध्या फारसी आवक होत नसली तरी, हरभऱ्याची ४३०० रुपये व सोयाबीनची ३००० ते ३५०० रुपयांपर्यंत खरेदी केली जात आहे. मालाला दर्जा नाही, एवढेच नेहमीचे कारण पुढे केले जात आहे. 

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान अकोला जिल्ह्यात जूनमध्ये लागवड झालेला मूग, तसेच उडदाची अनेक ठिकाणी काढणी आटोपली. काही भागात सततच्या पावसामुळे काढणी लांबलेली आहे. प्रामुख्याने तयार झालेला नवीन मूग बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी दाखल झालेला आहे. प्रत्येक बाजार समितीत गेल्या १५ दिवसांत मुगाच्या आवकेत वाढ झालेली दिसून येते. शेतकऱ्यांच्या घरात हा शेतीमाल आलेला असताना बाजारातील दर सातत्याने कमी होत आहेत. 

मंगळवारी (ता. २४) अकोला बाजार समितीत मूग अवघा ३८०० ते ५६०० रुपये क्विंटल या दराने विकला गेला. उडदाचीही विक्री ३४०० ते ५५०० रुपये क्विंटलदरम्यान झाली. मुळात केंद्राने या हंगामासाठी मुगाचा हमीभाव ७०५० रुपये, तर उडदाचा ५७०० रुपये दर जाहीर केला आहे. या दोन्ही पिकांना हमीभावाच्या तुलनेत कमी दर मिळत  असल्याने शेतकऱ्यांचे हंगामाच्या तोंडावरच नुकसान होत आहे. मुगाचे प्रतिक्विंटल २५०० रुपये आणि उडदाचे १२०० रुपयांनी नुकसान होत आहे. 

ओलसरपणा ठरतोय मारक मूग, उडदाचे दर कमी असल्याबाबत विचारणा केली असता या दोन्ही धान्यांमध्ये ओलसरपणा अधिक असल्याने ३८०० रुपयांपासून विक्री होत आहे. चांगल्या दर्जाचा मूग ५६०० रुपयांपर्यंत विक्री झाला. परंतु, सध्या अकोला बाजारात येत असलेल्या बहुतांश मालात आर्द्रता असल्याने दरांवर परिणाम झाल्याचे सांगण्यात आले. सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण असल्याने तयार झालेला मूग, उडीद वाळविण्यासाठी पुरेशे ऊन मिळत नसल्याने मोठी अडचण झाली आहे. शेतीमालाची हमीदराने खरेदी करणे बंधनकारक आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका उपनिबंधक व बाजार समितीचे सचिव यांची समिती आहे. तक्रार आली तर त्याबाबत गांभीर्याने दखल घेतली जाते, असे नगर जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com