पावसामुळे मका पिकात साठलेले पाणी
पावसामुळे मका पिकात साठलेले पाणी

`पीक गेल्यानं सगळेच चिंतेत; कसली आलीय दिवाळी`

औरंगाबाद  : सततच्या पावसाने यंदा हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास गमावला. कुणी पंचनामेही करत नाही अन विमा कंपनीचे लोक पीकं पाहायला येत नाहीत. सोळा एकरांतून अजून पिकाचा एक दाणाही घरात आला नाही. त्यामुळं उत्पादन खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळं आमच्या परिसरात हातची पीक गेल्यानं सगळेच चिंतेत आहेत, त्यामुळे कसली आलीय दिवाळी, असा सवाल शेतकरी विष्णू मगर यांनी केला.

सोयगाव तालुक्यातील तिडका येथील विष्णू मगर सततच्या पावसाने यंदा खरिपाचे नुकसान झाल्याने दिवाळीच्या दिवशी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत होते. मगर म्हणाले, की आमच्या कुटुंबात आई-वडील, दोन मुले, दोन मुली व आम्ही पती-पत्नी मिळून आठ लोक. या सर्वांचा उदरनिर्वाह सोळा एकर शेतीवरच अवलंबून. यंदा सोळा एकरात आठ एकर कपाशी, सहा एकर मका, एक एकर सोयाबीन शिवाय एक एकरात उडीद, मूग पेरला होता. निसर्गाचा भरवसा नसल्याने या सर्वच पिकाचा विमाही उतरवला. आधी पावसाने दडी मारली त्यामुळे पीक संकटात सापडली होती. पुन्हा पिकांना पोषक पाऊस झाल्याने पीक हाती येतील असे वाटलं. परंतु मका, सोयाबीन काढणीला व कपाशी वेचणीला आली असतानाच गत पंधरवड्यापासून पाऊस लागून राहिला. तो थांबायचे नावच घेईना, त्यामुळे सोंगून ठेवलेल्या मकाला कोंब फुटले. सोयाबीन तर कापणी करायची गरजच पडली नाही. एवढेच नाही तर वेचणीला आलेल्या कपाशीच्या बोंडाना हि कोंब फुटले.

यंदा खरिपाच्या पिकासाठी जवळपास दोन लाख रुपयांचा खर्च झाला. अजून ना कापसाचे बोंड घरात आले ना मका सोयाबीनचा दाणा. मकाचा चाराही हातचा गेला. विम्याचा परतावा मिळावा म्हणून झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केला तर तो फोन कोणी उचलतच नाही. इकडून तिकडून माहिती घेऊन विमा कंपनीच्या प्रतिनिधींना कळविले तर ते कृषी आणि महसूलने. पण शेतकऱ्यांनी स्वतः ऑनलाईन नुकसानीची तक्रार दिल्यानंतर पाहणीला येऊ. जोवर आम्ही पंचनामा करत नाही तोपर्यंत नुकसान झालेला माल शेतातून उचलू नका असं सांगतात. पावसाने उघडीप दिली तर पाच-दहा टक्के माल वाचवणं शक्य होईल, पण ही आशाही आता संपून जात आहे. केवळ पाहणी करून उपयोग नाही, झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून विमा कंपन्यांना नुकसानभरपाई तात्काळ देण्यासाठी आदेश देण्याची गरज आहे. 

‘दिवाळी विसरून गेलोय’ तिडका येथीलच गजानन पाटील म्हणाले, की कुटुंबाकडे साडेपाच एकर शेती त्यात दोन एकर कापूस, दोन एकर मका आणि उर्वरित क्षेत्रात उडीद, मूग, भुईमूग अशी पिकं पेरली होती. पण पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंधरवड्यापासून सारखा पाऊस पडतोय. पिकाचा विमा उतरवलाय पण विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक कोणी उचलत नाही. ई-मेलने २६ ऑक्टोबरला विमा कंपनीकडे तक्रार दिली. आता ते पाहणी करायला कधी येतात कोणास ठाऊक. पिकांसाठी खर्च झालाय अन हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास गेल्याने निर्माण झालेल्या विवंचनेत आम्ही दिवाळी आहे हेसुद्धा विसरून गेलोय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com