साताऱ्यातील पूर्व भागात पिके सुकू लागली तर पश्चिमकडे अतिपावसाने कुजली

कोयना नदीला आलेल्या पुराचे पाणी गावातील अनेक शेतांत गेले होते. पूर ओसरण्यास उशीर झाल्यामुळे पिके वाया गेली आहेत. - संजय डुबल, आडूळ, ता. पाटण.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा   ः जिल्ह्याच्या सर्वच भागातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत आले आहेत. पूर्व भागातील पिके पाण्याविना सुकू लागली आहेत, तर पश्चिमेकडील पिके अतिपाण्यामुळे कुजू लागल्याने खरीप हंगामासह नगदी पिके वाया जाणार आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी यंदाचे वर्ष सुरू झाल्यापासून या ना त्या कारणामुळे अडचणीत आले आहेत. उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागला. पश्चिम भागात विजेच्या लंपडावावर मात करत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करीत शेतकऱ्यांनी पिके जगवली. जून सुरवातीस पाऊस सुरू होईल आणि पिके जगतील या एकमेव आशेवर शेतकरी होते.

मात्र, जून सुरवातीस पावसाने उशिरा हजेरी लावल्याने पेरण्या रखडल्या. जुलैमध्ये कमी अधिक प्रमाणत पावसाचे हजेरी लावल्याने पिकांच्या पेरण्या करून पिके जगवली. मात्र आॅगस्टच्या सुरवातीस पश्चिम भागात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने होत्याचे नव्हते. धरणांतील पाण्याच्या विसर्गामुळे अनेक गावांमध्ये पूर आला. परिणामी हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली.

काही ठिकाणी आठ ते दहा दिवस पिके पाण्याखाली गेल्याने ती कुजून नुकसान झाले. दुसऱ्या बाजूला सप्टेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत १०२ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. पिण्याच्या पाण्याची ही अवस्था असेल तर पिकांसाठी पाणी कोठून मिळणार. यामुळे पेरणी केलेली पिके सुकून गेली आहेत. चारा, पाण्यासाठी अनेक जनावरे गेल्या चार ते पाच महिन्यांपासून छावणीत दाखल आहेत. जिल्ह्यात शंभरवर चारा छावणीत ५२ हजारांवर जनावरे दाखल आहेत. यामुळे जिल्ह्याच्या सर्वच भागातील शेतकरी अडचणीत आले आहेत. 

सध्या शेतकऱ्यांच्या नुकसानीला पाणीच जबाबदार ठरत आहे. पश्चिमेकडे अतिपाण्याने हातातोंडाला आलेली पिके कुजून वाया गेली आहेत. त्यातून काही प्रमाणात पिके वाचली असली तरी उत्पादनावर परिणाम होणार आहे. याउलट पूर्व भागात तीव्र पाणीटंचाईमुळे पिके सुकू लागली आहेत. पूर्व भागातील मोठे क्षेत्र पावसाअभावी अजून नापेर राहिले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com