मेटगुताड परिसरात रानगव्यांकडून स्ट्रॉबेरी पीक उद्ध्वस्त

लांबलेल्या पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवड उशिरा झाली. त्यात लगेच उघडिपीनंतर ढगाळ हवामानामुळे स्ट्रॉबेरीवर करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे फवारणी करून पीक वाचवण्यासाठी धडपड चालू असताना रानगव्यांच्या अस्मानी संकटाने मोठे आर्थिक नुकसान झाले. नुकसानीची दखल घेऊन भरपाई मिळावी. - सुरेश बावळेकर, शेतकरी.
स्ट्राॅबेरी पिकाचे रानगव्यांनी केले नुकसान
स्ट्राॅबेरी पिकाचे रानगव्यांनी केले नुकसान

भिलार, जि. सातारा  : लांबलेल्या पावसाने स्ट्रॉबेरी उत्पादक अडचणीत आले असतानाच आता वन्यप्राण्यांनी मेटगुताड परिसरातील स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान केले आहे. या संकटाने शेतकरी अधिकच हवालदिल झाले आहेत.

मेटगुताड (ता.महाबळेश्वर) परिसर स्ट्रॉबेरीचे माहेरघर समजले जाते. या परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक पावसाने हैराण झाले असून, स्ट्रॉबेरी पिकावरील रोगनियंत्रणासाठी फवारणीकरिता वारेमाप खर्च करीत आहेत. तो खर्च निघेल की नाही, याची काळजी न करता केवळ पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. असे असताना या परिसरात वन्य प्राण्यांचे कळपच्या कळप पिकाचे नुकसान करीत आहेत. रविवारी रात्री मेटगुताड, लिंगमळा या परिसरातील सुरेश रामचंद्र बावळेकर, संजय श्रीपती कोंढाळकर, संतोष बावळेकर, मारुती धोंडिबा बावळेकर यांच्या सुमारे दोन एकर क्षेत्रावरील स्ट्रॉबेरी शेतात रानगव्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला.

या ठिकाणी या शेतकऱ्यांनी जवळपास ५० हजार रोपांची लागवड केली आहे. मल्चिंगसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. या शेतीत रानगव्यांनी धुमाकूळ घातल्याने लागवड केलेली लाखो रुपये किमतीची सर्व रोपे वाया गेली असून, मल्चिंगसाठी केलेला खर्चही पाण्यात गेला आहे.  स्ट्रॉबेरीबरोबरच या ठिकाणी या शेतकऱ्यांनी लावलेली फराशी, झुकेनिया या पिकांचेही नुकसान केले आहे. दरवर्षी या रानगव्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सोसावा लागतो. परंतु, वन विभाग मात्र याकडे लक्ष देत नसल्याने महाबळेश्वर तालुक्‍यातील शेतकरी वन विभागावर नाराज आहे. वन विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शासकीय पातळीवरून या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी मेटगुताड येथील शेतकऱ्यांनी केली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com