बुलडाण्यातील शेतकरी पिकवतोय स्ट्रॉबेरीचे पीक

स्ट्रॉबेरी म्हटली की प्रामुख्याने महाबळेश्‍वरचा संदर्भ समोर येतो. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात सावत्रा (ता. मेहकर) येथील अजय दत्तात्रय निकस या शेतकऱ्याने चार गुंठ्यात यंदा स्ट्रॉबेरीची लागवड केली असून पीक जुळून आले आहे.
Farmers in Buldana grow strawberries
Farmers in Buldana grow strawberries

बुलडाणा ः स्ट्रॉबेरी म्हटली की थंड वातावरणात येणारे पीक, असे सांगितले जाते. प्रामुख्याने महाबळेश्‍वरचा संदर्भ समोर येतो. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात सावत्रा (ता. मेहकर) येथील अजय दत्तात्रय निकस या शेतकऱ्याने चार गुंठ्यात यंदा स्ट्रॉबेरीची लागवड केली असून पीक जुळून आले आहे. सध्या यातून माल विक्रीसाठी निघू लागला आहे. त्यांना १५० ते १७५ रुपये प्रतिकिलोचा दरसुद्धा या भागात मिळत आहे. 

जिल्ह्यात पेरू, सीताफळ, संत्रा अशा फळबागा मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. पण स्ट्रॉबेरीसारखे पीक अद्याप फारसे घेतल्या जात नाही. सावत्रा येथील अजय निकस यांच्याकडे १५ एकर शेती असून त्यात पारंपरिक पिके घेतात. जिल्ह्यातील वातावरण फारसे थंड प्रकारात मोडत नाही. असे असतानाही त्यांनी यंदा प्रथमच स्ट्रॉबेरी लागवड करण्याचे धाडस केले. ही लागवड करण्यापूर्वी माहितीची जुळवाजुळव केली. स्ट्रॉबेरीच्या काही जाती आता थंड प्रदेशाशिवाय इतर भागातही येऊ शकतात, हे समजल्यानंतर त्यांनी ४ नोव्हेंबर २०२१ ला चार गुंठ्यात लागवड केली. 

यासाठी बेड, मल्चिंगपेपर, ठिबक, पिकाच्या संरक्षणासाठी जाळी अशा विविध बाबींचे व्यवस्थापन केले. पुण्यातील एका नर्सरीतून एक हजार रोपे आणली. रोपांसाठीच वाहतुकीसह जवळपास ११ हजार रुपये खर्च लागला. इतर कामांसाठी सहा ते सात हजार खर्च करावे लागले. असा चार गुंठ्यासाठी १६ ते १७ हजार रुपये खर्च लागला आहे. 

या भागात स्ट्रॉबेरी येईल की नाही, या बाबत शंका होत्या. मात्र, निकस यांच्या शेतात स्ट्रॉबेरीची रोपे चांगल्या दर्जाची तयार झाली. २० डिसेंबरला फळांची पहिली तोडणी केली. सुरुवातीला कमी प्रमाणात माल निघाला. आतापर्यंत ११ हजार रुपयांपेक्षा अधिक विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले. गावातच नागरिकांची अधिक मागणी येत आहे. बाजारातही किलोला १५० ते १७५ रुपयांचा दर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. नव्याने लागवड केल्याने व्यवस्थापनात थोड्या चुका झाल्या. तरीही पीक चांगले जुळून आले आहे. पुढील हंगामात आणखी क्षेत्रावर लागवड करणार असल्याचे अजय म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com