'किसान सन्मान'चा निधी शेतकऱ्यांना मिळेना

'किसान सन्मान'चा निधी शेतकऱ्यांना मिळेना
'किसान सन्मान'चा निधी शेतकऱ्यांना मिळेना

जळगाव : खानदेशात सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीतून वर्षाकाठी सहा हजार रुपये मिळणे अपेक्षित आहे. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात दोन हजार रुपये मागील २४ फेब्रुवारी रोजी जमा झाले, परंतु हे पैसे त्यांना बॅंकेकडून दिले जात नसल्याची माहिती आहे. 

अनेक ठिकाणी हे पैसे जमा झाले. त्याचे संदेश शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईलवर आले. पैसे घेण्यास शेतकरी गेले. त्या वेळी त्यांना बॅंकेकडून नकारघंटा ऐकायला मिळाली. शेतकरी या निधीसंबंधी प्रतीक्षा करीत आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे बॅंक खाते तलाठी, ग्रामसेवक मंडळीने चुकविली आहेत. नावांच्या चुका अनेक भागांत आहेत. या त्रुटी, चुका दूर करण्याची कार्यवाही प्रशासन करीत आहे. अपवाद वगळता हा निधी कुठेही वितरित झाला नाही. 

बॅंक खात्यासंबंधीच्या चुका जवळपास १४ हजार शेतकऱ्यांबाबत खानदेशात झाल्या आहेत. सव्वादोन लाख शेतकरी या योजनेत पात्र आहेत. तरीही १०० टक्के पात्र शेतकऱ्यांची माहिती तलाठी व ग्रामसेवकांनी संकलित केलेली नाही. खाते उतारे तपासणी अजून पूर्ण झालेली नाही. कारण एकाच शेतकऱ्याच्या नावे संबंधित गावासह इतर गावांमध्येही जमीन असल्याची शक्‍यता प्रशासनाने व्यक्त केली. ज्यांच्याकडे दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र आहे, त्यांनाच लाभ मिळावा, यासाठी पडताळणी, तपासणी व छाननीची प्रक्रिया प्रशासन राबवित असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या योजनेतून लाभ मिळण्यासंबंधी आणखी १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. तांत्रिक घोळ व चुका दूर करण्याचे काम बॅंका व प्रशासनाला मिळून करावे लागत असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com