शेतकऱ्यांनो कमी पाणी, कालावधीतील पिके निवडा : बसवराज बिराजदार

Farmers choose low water, period crops: Basavaraj Birajdar
Farmers choose low water, period crops: Basavaraj Birajdar

सोलापूर : ‘‘सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती अडचणीत येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी कमी पाण्यावरील आणि कमी कालावधीतील पिकांची निवड करणे आवश्यक आहे’’, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी गुरुवारी  (ता. १९) मोहोळ येथे सांगितले. 

मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषी तंत्रज्ञान महोत्सवाचे उद्‌घाटन बिराजदार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॅा. विजय अमृतसागर होते. मोहोळचे पशुसंवर्धन विभागाचे सहायक उपआयुक्त डॉ. धनंजय जगदाळे, मोहोळ कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डी. डी. कदम, माळशिरसचे कृषी पर्यवेक्षक राजेंद्र पिंगळे, मोहोळचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी भागवत मोरे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक डॉ. तानाजी वळकुंडे उपस्थित होते.

बिराजदार म्हणाले, ‘‘नैसर्गिक आपत्तीसमोर आपण कोणीच काही करू शकत नाही, पण त्याला तोंड देणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठानेही अनेक वाण प्रसारित केले आहेत. जे दुष्काळ आणि आपत्तीच्या काळात उपयुक्त ठरतील. त्याचा विचार करावा. शेतीपूरक उद्योग करावे. यामध्ये महिलांना अधिक संधी आहेत. छोट्या-छोट्या उद्योगातून शेतीला चांगला जोडधंदा मिळू शकतो.’’ डॉ. अमृतसागर म्हणाले,‘‘ शेतकरी आणि महिलांनी स्वतःमधील ताकद ओळखून व्यवसाय निवडावा. ’’ 

डॉ. वळकुंडे यांनी महोत्सवाच्या आयोजनामागचा उद्देश सांगितला. डॉ. धनंजय जगदाळे यांनी ‘शेळीपालन व कुक्कुटपालन’, राजेंद्र पिंगळे यांनी ‘सेंद्रिय शेती’, डॉ. वळकुंडे यांनी ‘दुग्ध व्यवसाय व्यवस्थापणात महिलांचा सहभाग’ या विषयांवर मार्गदर्शन केले.

शेतकऱ्यांसाठी शिवारफेरी

या महोत्सवाच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले. या दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना ज्वारी, हरभरा, करडई, चारापिके, पिकांचे विविध वाण व लागवड तंत्रज्ञान आदींबाबत माहिती देण्यात आली. प्रामुख्याने विषय विशेषज्ञ डॉ. शरद जाधव, अजय दिघे, दिनेश क्षीरसागर यांनी ही माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com