Farmers cut off electricity; The people's representatives are angry
Farmers cut off electricity; The people's representatives are angry

शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी संतप्त

शेतीपंपाची, पिण्याच्या पाण्याची वीज कापल्याने खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार चिमणराव पाटील, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापतींनी ‘दिशा’ समिती बैठकीत संताप व्यक्त केला.

जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांची वीज न कापण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले असतानाही ग्रामीण भागातील शेतीपंपाची, पिण्याच्या पाण्याची वीज कापल्याने खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार शिरीष चौधरी, आमदार चिमणराव पाटील, नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापतींनी  ‘दिशा’ समिती बैठकीत संताप व्यक्त केला. 

नियोजन भवनात जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती, अर्थात दिशा समितीची बैठक खासदार खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, सीईओ डॉ. पंकज आशिया, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका मीनल कुटे उपस्थित होत्या. राज्य शासनाचे अधिकारी केंद्र शासनाचे आदेश दाखविता, केंद्राचे कर्मचारी राज्याचे आदेश दाखवितात. मंत्री आदेश देतात तर त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. वीज कंपनीने आपला कारभार सुधारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेलवड (ता. बोदवड) येथे एका शेतकऱ्याच्या शेतात विजेचे पोल नाही, मीटर नाही तरी त्याला वीज कंपनीने बिल पाठविल्याची तक्रार करण्यात आली. 

‘बीएसएनएल’ अधिकाऱ्यांकडे माहितीच नाही  केंद्र शासन ‘बीएसएनएल’ विभाग चालविते. मात्र जिल्ह्यात, बीएसएनल विभागाचे किती कनेक्शन आहेत, नागरिकांना कनेक्शन मिळत नाही, बिल भरण्यास बीएसएनएलमध्ये गेले असता कर्मचारी नसतात, आदी तक्रारी होत्या. त्यावर बीएसएनएलच्या महाव्यवस्थापकांना काहीही माहिती देता आली नाही. यामुळे त्यांच्यावरही लोकप्रतिनिधींची संताप व्यक्त केला. यापुढे दिशा बैठकीस येताना सर्व अधिकाऱ्यांनी संबंधित माहिती आणावी, अशा सूचना देण्यात आल्या.

तुम्ही शासनाचे की कंत्राटदाराचे ते सांगा? तरसोद- फागणे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अडीच वर्षांपासून सुरू आहे. ते केवळ ४५ टक्के झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. चौपदरीकरण लवकर होणे अपेक्षीत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कंत्राटदारांना पाठीशी कसे घालतात? तुम्ही कंत्राटदाराकडून पगार घेता की शासनाकडून? असा संताप खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केला. महामार्गाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. कंत्राटदार फसवे आहे असे माहीत असतानाही संबंधितांना काळ्या यादीत का टाकत नाही? आगामी आठ दिवसांत काम प्रगतिपथावर न दिसल्यास तुमची बदली करू, असा इशाराच यावेळी देण्यात आला. त्यावर महामार्गाचे अधिकारी सिन्हा यांनी आगामी सहा महिन्यात तरसोद- फागणे काम बरेच झालेले असेल असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com