अकोला : शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन गावांत याद्या जाहीर

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन गावांत याद्या जाहीर
शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन गावांत याद्या जाहीर

अकोला ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सोमवारी (ता.२४) अकोला जिल्ह्यातील दोन गावात कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी पहिल्या टप्प्यात जाहीर झाली आहे.   अकोला तालुक्यातील गोरेगाव आणि बाळापूर तालुक्यातील देगाव येथील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या. या याद्यांनुसार ९२६ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला आहे. त्यानंतर तत्काळ त्यांच्या आधार क्रमांक, बॅंक खाते क्रमांक व कर्ज खात्यातील रक्कम यांची बायोमेट्रीक पडताळणी व प्रमाणिकरण करण्यात आले. कर्जमुक्तीच्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी देगाव आणि गोरेगाव येथे जाऊन भेट दिली. जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे या वेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पापळकर यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांना ऑनलाइन प्राप्त झालेले प्रमाणपत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते व उपस्थितीत वितरित करण्यात आले. गोरेगाव व देगाव येथे याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. लोखंडे यांनी दिली. जिल्ह्यात आत्तापर्यंत १ लाख ११ हजार २४५ शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात आली आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात ९२६ शेतकऱ्यांची यादी आज प्राप्त झाली. त्यातील आज ३१३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण यशस्वी झाले.  पडताळणी न झाल्यास काय कराल? काही शेतकऱ्यांना बायोमेट्रीक पडताळणी होण्यास अडचण निर्माण झाल्यास ( बोटाचे ठसे न जुळणे ) अशा शेतकऱ्यांनी पडताळणीसाठी तहसीलदारांकडे जावे. तर ज्या शेतकऱ्यांना कर्जखात्यातील रकमेबाबत वा बॅंक खात्याबाबत पडताळणी होत नसेल अशांनी मात्र जिल्हास्तरीय समितीकडे जावे, असे जिल्हास्तरीय समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com