डाळिंबासाठी एकरी ५० हजारांची मदत द्याः शेतकऱ्यांची कृषीमंत्र्यांकडे मागणी

कृषीमंत्री
कृषीमंत्री

औरंगाबाद: राज्यातील डाळिंब उत्पादकांसमोर दुष्काळ, पडलेले दर व विविध रोगांच्या आक्रमणात बागा वाचविण्याचे संकट आहे. याचा विचार करता एकरी किमान ५० हजार रुपयांची मदत करण्याची मागणी डाळिंब उत्पादकांनी केली आहे. अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघाच्या (पुणे) माध्यमातून कृषिमंत्री अनिल बोंडे यांना याविषयी साकडे घातले आहे.  मराठवाड्यातील औरंगाबाद कृषी विभागाच्या आढावा बैठकीसाठी रविवारी (ता.६) औरंगाबाद येथे आले असता हे निवेदन देण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रात डाळिंबाची लागवड १ लाख ५० हजार हेक्‍टरवर गेली आहे. यामधून १२ लाख टन उत्पादन झाले होते. देशाच्या ७० टक्‍के उत्पादन महाराष्ट्रात होत आहे. भारतात २ लाख हेक्‍टर लागवड क्षेत्रातून १८ लाख टन उत्पादन झाले आहे. यामधून ४७ हजार टन निर्यात झाली. त्याचे मूल्य ५३८ कोटी असून, त्यामुळे तेवढे परकी चलन भारतात आले. यामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.  गत काही महिन्यांत डाळिंबावर नैसर्गिक संकटामुळे डाळिंबाच्या बागा काढून टाकाव्या लागत आहेत. महाराष्ट्रात जवळपास ३० ते ४० हजार हेक्‍टरवरील डाळिंब बागा यंदा पाण्याअभावी संकटात सापडल्या आहेत. या बागा जगविण्याचे संकट डाळिंब उत्पादकांसमोर आहे. एकीकडे दुष्काळाचे संकट आणि दुसरीकडे पडलेले डाळिंबाचे दर यामुळे डाळिंब शेती परवडेनाशी झाली आहे. उत्पादनासाठीचा खर्चही भरून निघाला नाही. संकटे संपली नसून संकटाच्या या स्थितीत डाळिंब निर्यात वाढविण्यासाठी निर्यातक्षम उत्पादनात वाढ, तेलकट डाग, ‘मर’ रोगाच्या निर्मूलनासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादकांना एकरी ५० हजारांची मदत बागा वाचविण्यासाठी देण्याची मागणी करण्यात आली आहे.  डाळिंब उत्पादकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची मागणीही अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ पुणे यांनी केली आहे. कृषिमंत्र्यांना निवेदन देतेवेळी अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक संशोधन संघ पुणेचे सचिव डॉ. सुयोग कुलकर्णी, संचालक भरत मंत्री, विभागीय अध्यक्ष विजय चव्हाण, राजेश कोल्हे, शैलेश बजाज, गणेश गिरी, आबा तावरे आदींची उपस्थिती होती. कृषिमंत्र्यांनी याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍‌वासन दिल्याची माहिती सचिव डॉ. सुयोग कुलकर्णी यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com