उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीन

कांद्याचे दर सुमारे दोन महिन्यांपासून दबावात आहेत. उन्हाळ, रांगडा कांदा लागवड कमी आहे. विहिरींनाही पुरेसे पाणी नाही. उन्हाळ्यात शेतकरी पिके फारशी घेऊ शकणार नाहीत. - नरेंद्र पाटील, कांदा उत्पादक, कापडणे (जि. धुळे)
उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीन
उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी उदासीन

जळगाव : खानदेशात उन्हाळ, रांगडा कांदा लागवडीसंबंधी फारशी गती अजूनही नाही. दुसऱ्या बाजूला रोपे खरेदीसाठी अपेक्षित उठाव नसल्याचे चित्र आहे. रोपांच्या माध्यमातून नफा मिळविण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्नही अयशस्वी होत असल्याची माहिती आहे. 

रांगडा कांदा लागवडीची तयारी ऑक्‍टोबरमध्ये अनेक शेतकऱ्यांनी केली. कारण त्या वेळेस दर बऱ्यापैकी होते. परंतु नोव्हेंबरमध्ये कांद्याचे दर कमी झाले, तशी कांदा लागवडीसंबंधी शेतकऱ्यांनी भूमिका बदलली. कांदा रोपवाटिकांमधील रोपे विक्रीस काढली. कांद्याचे दर दबावात असल्याने त्याच्या लागवडीसाठी अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. धुळे जिल्ह्यात धुळे तालुक्‍यातील कापडणे, न्याहळोद, कुसुंबा, कौठळ आदी भाग कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. शिंदखेडामध्ये चिचवार व परिसरात कांदा असतो. शिरपूरमध्ये सातपुडा पर्वतालगत कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते.

साक्रीमधील पिंपळनेर व परिसर कांदा लागवडीत आघाडीवर आहे. परंतु धुळ्यात कांद्याचे १२०० हेक्‍टर क्षेत्रही नसणार अशी स्थिती दुष्काळामुळे निर्माण झाली आहे. नंदुरबारात शहादा व नवापूर वगळता कुठेही कांद्याची लागवड होत नाही. जळगाव जिल्ह्यात रांगडा कांदा लागवडीत चोपडा तालुक्‍यातील लासूर, चहार्डी, खर्डी, लोणी, माचले, मंगरूळ, आडगाव, गोरगावले, अडावद, धानोरा, तर यावल तालुक्‍यात किनगाव, डांभुर्णी, साकळी, कोरपावली भागात कांदा असतो. जळगाव तालुक्‍यातही तापी काठानजीक काही शेतकरी कांद्याची लागवड करतात. पाचोरा, जामनेरातही कांद्याची लागवड केली जाते. परंतु पाण्याचे संकट वाढणार असल्याने कांदा लागवड जळगाव जिल्ह्यातही कमी होताना दिसत आहे. 

लागवडीचे नियोजन रद्द ज्यांनी कांदा रोपवाटिका तयार केल्या, त्यांनी लागवडीचे नियोजन रद्द करून रोपे विक्रीची तयारी केली. परंतु या रोपांच्या खरेदीला प्रतिसाद नाही. अडीच ते तीन हजारांत तीन किलो कांदा बियाणे वापरून तयार केलेल्या रोपवाटिकेतील पूर्ण रोपे सध्या जळगाव, चोपडा, भडगाव व एरंडोल भागात मिळत आहेत, अशी माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com