जळगाव ः दुष्काळी अनुदानापासून शेतकरी वंचित

दुष्काळी अनुदानापासून शेतकरी वंचित
दुष्काळी अनुदानापासून शेतकरी वंचित

जळगाव ः दुष्काळी अनुदान अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले नाही. काही तालुक्‍यांत तहसीलदारांनी बॅंकांकडे निधी वर्ग केला नाही, तर काही तालुक्‍यांत बॅंकांनी या निधीचे वाटपच केले नसल्याची समस्या कायम आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दुष्काळ दौऱ्यानंतरही प्रशासनाने या कामाला गती दिलेली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पालकमंत्री पाटील यांनी चाळीसगाव, पारोळा व अमळनेरात दुष्काळी स्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधल्यानंतर दुष्काळ निधी व पाणीटंचाईचे मुद्दे अनेक शेतकऱ्यांनी उपस्थित केले. हा दौरा आटोपून दोन-तीन दिवस झाले, तरी अद्याप दुष्काळ निधी वितरण संथ गतीनेच सुरू असल्याने शेतकरी संजय चौधरी (खेडी खुर्द, ता. जळगाव) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

अनेक शेतकऱ्यांची बॅंक खाती जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत आहेत. त्यापाठोपाठ शेतकऱ्यांची बॅंक खाती राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये आहेत. जळगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी ३० कोटींचा दुष्काळ निधी बॅंकेत जमा झाल्याचा दावा प्रशासनाने केलेला असला, तरी अपवाद वगळता कुठल्याही शेतकऱ्याला हे अनुदान मिळालेले नाही. अमळनेर तालुक्‍यात ४३ कोटींचा निधी जळगाव जिल्हा बॅंक, स्टेट बॅंकेने विविध बॅंकांकडे वर्ग केला. त्यापैकी केवळ २५ टक्‍केच निधीवाटप झाला. पारोळा तालुक्‍यात ३२ कोटींचा निधी बॅंकांमध्ये वर्ग केला.

एरंडोल, धरणगाव तालुक्‍यांत अनुदानाची मागणी एरंडोल व धरणगाव तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झालेले असतानादेखील दोन्ही तालुक्‍यांत अद्याप दुष्काळ निधी प्राप्त झालेला नाही. याबाबत त्वरित दखल घेऊन दोन्ही तालुक्‍यांना दुष्काळ निधीचे त्वरित वाटप करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान पाटील, माजी उपनगराध्यक्ष शालिग्राम गायकवाड, जगदीश पाटील, सतीश महाजन, सचिन पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष रवींद्र पाटील, महेश पाटील, रवींद्र जाधव, प्रसाद दंडवते, मधुकर पाटील यांच्यासह पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com