औषधी वनस्पती लागवडीतून शेतकऱ्यांचा विकास

औषधी वनस्पती लागवडीतून शेतकऱ्यांचा विकास
औषधी वनस्पती लागवडीतून शेतकऱ्यांचा विकास

कोल्हापूर : भारतातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड करण्याची मोठी संधी उपलब्ध  असून, त्याद्वारे त्यांनी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुलुंड (मुंबई) येथील सायंटिफिक रिसर्च सेंटरचे उपसंचालक डॉ. एस. एस. बर्वे यांनी येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाचा वनस्पतिशास्त्र अधिविभाग, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक यांच्या संयुक्त विद्यमाने  ‘औषधी व सुगंधी वनस्पती संवर्धन व प्रक्रिया’ या विषयावर एकदिवसीय जिल्हांतर्गत शेतकरी प्रशिक्षण झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी विभागीय कृषी सहसंचालक डी. डी. तांबाळे प्रमुख उपस्थित होते. तर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते. 

डॉ. बर्वे म्हणाले, औषधी व सुगंधी वनस्पतींच्या क्षेत्रात शेतकऱ्यांना प्रचंड मोठ्या संधी आहेत. जगभरातील औषध, सुगंधी द्रव्य आणि सौंदर्यप्रसाधने निर्माण करणाऱ्या उद्योगांना त्यांची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. नैसर्गिक साधन संपत्तीने भारत अतिशय समृद्ध आहे, तथापि, जागतिक स्तरावर या क्षेत्रातील भारताचा वाटा हा अवघा एक टक्का इतका अत्यल्प आहे. तो आणखी किमान दोन टक्क्यांनी तर आपण सहजरीत्या वाढवू शकतो.

केवळ पश्चिम घाटावर लक्ष केंद्रित केले तरी बराच पल्ला गाठता येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना औषधी व सुगंधी लागवडीची मोठी संधी आहे. केवळ जिरॅनियमच्या लागवडीमधूनही एकरी एक लाख रुपयांपर्यंतचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो, इतकी त्याची मागणी आहे.

 डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आपल्या संशोधनाचा लाभ व्यापक समाजापर्यंत पोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. प्रयोगशाळेकडून शेतीकडे या धोरणाच्या अंगीकारातून विद्यापीठाने शेतकरीवर्गाला जोडण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. औषधी व सुगंधी वनस्पतींच्या संदर्भातही विद्यापीठाने शेतकऱ्यांना सर्वोतोपरी साह्य करण्याचे ठरविले असून, जे शेतकरी अशा वनस्पतींची लागवड करतील, त्यांच्या वनस्पतींपासून तेलनिर्मिती करण्यासाठीचा प्रायोगिक प्रकल्पही विद्यापीठाने उभारण्याचे ठरविले आहे. त्याचा शेतकऱ्यांना निश्चितपणे लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी वनस्पतिशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. डी. के. गायकवाड, डॉ. अकल्पिता अरविंदेकर यांच्यासह वनस्पतिशास्त्र अधिविभागातील शिक्षक, शासकीय अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com