`कशाची दिवाळी, सगळं ध्यान तर त्या पावसाकडं`

पिकांची अवस्था सांगताना शेतकरी कुंडलिक भोसकर
पिकांची अवस्था सांगताना शेतकरी कुंडलिक भोसकर

सोलापूर  ः यायचा तवा तो पाऊस आला नाही, रोज आभाळाकडं बघून आमाला बी कंटाळा आला व्हता, आता मात्र त्याला चांगलीच सवड मिळालीय, कशाची दिवाळी अन काय, सगळं ध्यान तर त्याच्याकडंच व्हतं. आवंदा खरिपात काय मिळालं न्हाय, रब्बीत व्हईल काय तर असं वाटतंय. बराय दिवाळीत तर त्यानं हजेरी लावली, नाय तर काय खरं नव्हतं बघा. आता उसणवारीवर का व्हईना दिवाळी व्हतीय, अशा भावना बार्शी तालुक्यातील इर्लेतील शेतकरी कुंडलिक भोसकर यांनी व्यक्त केल्या. 

भोसकर यांची वैराग-माढा महामार्गावर इर्लेत अगदी रस्त्यालगतच दोन एकर कोरडवाहू शेती आहे. सगळं गणित पावसावरं. यंदा जिल्ह्यात पावसाने पावसाळी हंगामात चांगलीच हुलकावणी दिली आणि आता मात्र तो रोज अधून-मधून बरसतो आहे. आधी थोडंबहुत पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांना नुकसानीची झळ बसते आहे. पावसासाठी आसुसलेल्यांना एकीकडे अशा दिलाशाचे चित्र आहे. पावसासाठी व्यथित झालेले कुंडलिक भोसकर हे त्यापैकी एक शेतकरी. रोज पडणाऱ्या पावसामुळे शेतात तण वाढलयं, सध्या हे तण गोळा करण्याचे काम ते करतायेत. शेतात त्यांना ज्वारी पेरायची आहे. वर उनाचा तडाखा बसतो आहे. पण आता पावसाने काहीशी उसंत दिलीय, तोवर तण काढून रान मोकळं करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. आता महिनाभर उशिराने ज्वारीची पेरणी होईल, पण ठीक आहे, त्यातून काही तरी मिळेल, याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे.

पण दिवाळीच्या सणापेक्षाही पाऊस पडल्याचा सर्वाधिक आनंद त्यांना आहे. पत्नी, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असे नऊ जणांचं भोसकर यांचं एकत्र कुटुंब आहे. एक मुलगा चहाची टपरी चालवतोय, एक मजुरी करतोय. स्वतः कुंडलिकही शेती बघत मजुरी करत होते, पण आता तब्येत साथ देत नाही. त्यामुळे मजुरी थांबवलीय, आता शेतावरच काय ते, असं ते म्हणाले. 

दिवाळीची तयारी काय केली, यावर भोसकर म्हणाले, की कशाची दिवाळी अन काय पाऊसच लवकर पडला न्हाई, खरिपात दरवर्षी सोयाबीन, तूर घेतो, यंदा ते काईच घेता आलं न्हाई. दरवरसाला १० कट्टे सोयाबीन, ५-६ कट्टे तूर व्हतेय, ३० ते ४० हजाराचं उत्पन्न मिळतंय, पण आवंदा हे काहीच न्हाई. आता पाऊस पडला, हीच आमची दिवाळी. रब्बीच्या ज्वारीवर काय तरी व्हईल, अशी आशा हाय, त्याच जिवावर उसणवारी करुन दिवाळीचं भागवायचं, दुसरं काय, असं म्हणत, वेळ न दवडता, ते पुन्हा तण काढायच्या कामाला लागले. एकूणच दिवाळी हा वर्षाचा सण असूनही त्यांना त्याचं काहीच अप्रुप नाही, पण उशिरा का होईना पडलेला पाउस आणि त्यावर काही तरी पेरणी करता येणार, याचंच सर्वाधिक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर अधिक दिसत होतं. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com