`पावसानं यंदा आमची दिवाळी गोड नाय`

पावसामुळे डाळिंब बागेत साठलेले पाणी
पावसामुळे डाळिंब बागेत साठलेले पाणी

सांगली  ः आमच्या दुष्काळग्रस्त पट्ट्यात चांगला पाऊस झाल्यानं आम्हाला आनंद झालाय. पण पावसानं पिकं गेल्याती त्यामुळे खर्चाला पैसा नाय, त्यामुळं आमची यंदाची दिवाळी गोड नाय, अशी व्यथा रावळगुंडवाडी (ता. जत) येथील शेतकरी भीमराव लोहगाव यांनी मांडली.

आमच्याकडं गेल्या चार वर्षांत पावसाचा एक थेंबही पडला नव्हता. यंदा निसर्गानं आमच्यावर कृपादृष्टी केली हाय. मॉन्सूनोत्तर पाऊस चांगला पडलाय. पाणीसाठा वाढल्यानं टंचाई दूर झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. भीमराव लोहगाव म्हणाले, की जे पैसे होते ते अगोदरच द्राक्ष आणि डाळिंबासाठी वापरले आहे. दिवाळीसाठी पैसे मिळतील अशी अपेक्षा होती. पण कडधान्य पिके अगोदरच गेली होती. त्यामुळे कडधान्यातून पैसे मिळाले नाहीत. आता पैसाच नसल्याने काहीच खरेदी करता आले नाही. त्यामुळे आमच्या दिवाळीवर आर्थिक संकट आले आहे. अनेक गावात पीकविमा देखील मिळाला नाही. पीकविम्याची रक्कम मिळाली असती तर दोन पैसे हाती पडले असते. पण शासनाने पीकविमा देण्यास टाळाटाळ केली आहे.  

वास्तविक पाहता दुष्काळग्रस्त पट्टा सोडला तर वाळवा, पलूस, कडेगाव, शिराळा या तालुक्यांतील शेतकरी अजून महापुराच्या सावटाखाली आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे नुकसान भरपाई मिळाली नाही. भरपाई मिळाली असती, तर दौन पैसे हाती लागले असते. त्यामुळे दिवाळी साजरी करता आली असती.  त्यातच सातत्यानं पडत असलेल्या पावसाने शेतातून हाती काहीच मिळाले नाही, तर आता हा पाऊस बिकट परिस्थिती निर्माण करतोय. दिवाळी सण साजरा करण्याची उत्साह राहिला नसल्याचे चित्र दिसते आहे. कपडे खरेदी, सोने खरेदी, शेतीला लागणारी अवजारे खरेदी देखील कमी झाली आहे.

यंदा दिवाळीत उसाचा हप्ता अद्याप एकाही साखर कारखान्याने न काढल्याने शेतकरी अर्थिक अडचणीत आले आहेत. बऱ्यापैकी सर्वच साखर कारखान्यांनी गतवर्षी एफआरपी अधिक २०० चा फॉर्म्युला मान्य करून कारखाने सुरू केले होते. मात्र एफआरपीची रक्कम दोन हप्त्यांत दिली. मात्र अधिक २०० ची रक्कम शेतकऱ्यांना दिली नसल्याने सर्व शेतकरी दिवाळीत कर्जाचा आधार घेत असल्याचे दिसते आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com