नांदेड जिल्ह्यात शेतकरी शेती शाळा सुरू

नांदेड जिल्ह्यात शेतकरी शेती शाळा सुरू
नांदेड जिल्ह्यात शेतकरी शेती शाळा सुरू

नांदेड ः २०१९ च्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना विविध पिकांच्या लागवड, व्यवस्थापन, काढणी, काढणीपश्चात तंत्रज्ञाबाबत प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यासाठी जिल्ह्यामध्ये ४०० शेतकरी शेती शाळांचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. २५) जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी शाळांची सुरवात करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी माहिती दिली.

शेती शाळांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण खरीप हंगामभर माती परीक्षण, पिकांची निवड, लागवड पद्धती, लागवडीनंतर कीड, रोग, खत, पाणी व्यवस्थापन, काढणी तसेच काढणीपश्चात तंत्रज्ञान या बाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गतवर्षीच्या हंगामात यशस्वी झालेली कपाशीवरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण मोहीम यंदाच्या हंगामात देखील राबविली जाणार आहे.

गतवर्षी या मोहिमेमुळे जिल्ह्यातील कपाशीच्या उत्पादनात प्रतिहेक्टरी सरासरी २ क्विंटल ५० किलोने वाढ झाली. पिकावरील कीड नियंत्रणासाठी पीक संरक्षण मोहीम राबविण्यात आल्यामुळे सोयाबीन, तूर, हळद या पिकांच्या उत्पादनात देखील मोठी वाढ झाली. या वर्षी  रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने लागवड करण्यावर भर देण्यात येणार आहे. शेतीशाळांच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचवले जाणार आहे, असे श्री. चलवदे यांनी सांगितले.

रावणगाव (ता. हदगाव) येथे शेतकरी शेतीशाळेचे उद्‍घाटन करण्यात आले.  या वेळी तालुका कृषी अधिकारी आर. डी. रणवीर, जी. एम. बिलेवाड, एम. बी. तावडे, ए. एच. येकूलवाड, शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी सोयाबीनचे घरचे बियाणे वापरासाठी उगवणशक्ती तपासून पाहावी. बुरशीनाशक, जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. किडीच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्काचा वापर करावा. - आर. डी. रणवीर, तालुका कृषी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com