agriculture news in Marathi farmers financial condition down due to APMCs closed Maharashtra | Agrowon

नुकसान वाढलेय; बाजार समित्या तातडीने सुरु कराव्यात : शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया

टीम अॅग्रोवन
रविवार, 12 एप्रिल 2020

यावर्षी पाण्याची उपलब्धता असल्याने नेहमीप्रमाणे भाजीपाला, टरबूज, पपई, केळीचे नियोजन केले होते. लॉकडाऊनमुळे रोज निघणारा शेतमाल पूर्णपणे पाठवू शकत नाही. सध्याची स्थिती पाहता बाजार समिती बंद असली पाहिजे. परंतु बाजार समित्या बंद असल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील भाजीपाला व टरबूज सारखी फळपीके थेट विकू शकतो. परंतु केळीबाबत हे शक्य नाही. सरकारने यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे आवश्यक झाले आहे. 
- हेमंत देशमुख, शेतकरी, डोंगरकिन्ही, ता. मालेगाव जि. वाशीम 

पुणेः बाजार समित्या बंद केल्याने शेतमाल विक्रीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित सर्वच मालाची थेट विक्री करणे शक्य नाही, त्यामुळे बाजार समित्या तातडीने सुरु कराव्या. ते करणे शक्य नसल्यास पर्यायी व्यवस्था उभी करावी. सध्या शेतमालाचे मोठे नुकसान होत असून प्रशासनाने बाजार समित्या बंद करून शेतकऱ्यांच्या आर्थिक नाड्याच आवळल्या आहेत, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. 

माझे दीड एकर क्षेत्रातील खरबूज बाजार समिती बंद असल्याने शेतात सडून गेले आहे. थेट शेतमाल विक्रीसाठी मी प्रयत्न केला परंतु खुपच कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मी दोन दिवसांत विक्री बंद केली. सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावरून शेतमाल खरेदी करावा. शेतकऱ्यांना मिळत असलेला दर आणि ग्राहक देत असलेला दर यातील तफावत काढली तर पाचपट ते दहापट फरक आहे. शेतकऱ्यांची फसवणूक आणि ग्राहकांची पिळवणूक होत आहे. 
- केशव होले, प्रगतिशील शेतकरी, बिरोबावाडी, ता. दौंड, जि. पुणे 

माझ्याकडे दहा एकरवर लिंबू आहे. स्थानिक परभणी येथील मार्केट मध्ये तसेच मुंबई येथे तसेच रेल्वेव्दारे पंजाब मधील अमृतसर, लुधियाना येथे देखील पाठवत असतो. रेल्वे बंदचा मोठा फटका बसला. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील काही शेतकरी मिळून मुंबई बाजार समितीत दररोज ४० ते ५० टन लिंबू पाठवत होतो. त्यात माझे स्वतःचे ५ ते ६ टन लिंबू असत. मुंबई बाजार समितीतील खरेदीचे व्यवहार बंद केल्यामुळे माझे वैयक्तिक दररोज तीन ते चार हजाराचे नुकसान होत आहे. लिंबाची थेट विक्रील करण्यासाठी मर्यादा येतात. 
- विनायक गोरे, लिंबू उत्पादक, राधे धामणगाव, ता. सेलू, जि. परभणी. 

टप्याटप्याने २० एकरात टरबूज लागवड केली आहे. सध्या चार एकरातील फळे काढणीला आले आहेत. पण विक्री करायला खूप कसरत करावी लागते आहे. बाहेर राज्यात माल पाठवायचा तर तेथेही भाव मिळत नाही. व्यापारी तीन ते चार रुपये प्रतिकिलोने मागणी करीत आहेत. शिवाय हा माल पोचविण्यासाठी वेळेवर गाडी मिळत नाही. वाहन मिळालेच तर भाडे अव्वाचे सव्वा सांगितले जात आहे. एवढे करूनही माल पाठविल्यास बाजारपेठ बंद राहीली तर नुकसान झेलण्याची तयारी ठेवावी लागत आहे. दरवर्षी आमचा माल दिल्ली, अहमदाबाद, वाशी मार्केटला जात होता. आता सर्वच स्थिती हतबल करणारी आहे. 
- अनंत इंगळे, टरबूज उत्पादक, चितलवाडी, ता. तेल्हारा जि. अकोला 

अगोदर माल सुरत बाजारात पाठवला जायचा; मात्र तेथेही मागणी मंदावली आहे. त्यामुळे आता स्थानिक बाजारात जसे मार्केट सापडेल व आहे त्या दराने विक्री सुरू आहे. त्यामुळे ८० टक्के आर्थिक नुकसान आहे. अशा परिस्थितीत मार्केट बंद होत असल्याने सगळे विक्रीचे रस्ते बंद झाले. सरकारने बाजार समित्या सुरू ठेवाव्यात. विक्रेते व व्यापारी याचे व्यवहार टप्प्यात करावे. तरच भाजीपाला मागणी पुरवठा साखळी टिकेल अन्यथा ग्राहकांनासुद्धा भाजीपाला मिळणार नाही. आता अडचणी येत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना थोड्या कमी दराने का होईना माल देऊन विक्रीचा पर्याय ठरविला आहे. 
-शरद गांगुर्डे, भाजीपाला उत्पादक, चिंचावड, जि. नाशिक 

सध्या माझ्याकडे चार एकर पपई, दोन एकर कलिंगड, दोन एकर टोमॅटो आहे. पण सगळं मातीमोल ठरलं आहे. अगदी पंधरवड्यापर्यंत सगळं व्यवस्थित सुरु होतं. पण अचानकपणे आलेल्या आपत्तीमुळे पुरते कोसळून गेलो आहोत, आम्हाला खात्रीची आणि विश्वासाची बाजारपेठ म्हणून बाजार समिती आवश्यक आहे. पण तीच बंद केल्याने अडचण आहे. सध्या पपई जनावरांना खाऊ घालत आहे. दुसरा पर्याय नाही. आज शेतमाल विक्रीची ही साखळी तुटली की, आणखी अवघड होणार आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला थेट विक्रीसाठी बाजार समिती आणि महत्त्वाच्या जागा द्याव्यात. 
- धनंजय देठे, जैनवाडी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर 

सध्या माझ्या शेतातील पाच एकरीवरील केळी उतरावयास आलेली आहे. उत्तर भारत तसेच तेलंगणातील बाजारपेठेत केळी पाठविली जाते. लॅाकडाऊमुळे इतर राज्यातील तसेच स्थानिक मार्केट बंद असल्यामुळे आजवर उतरावयास आलेली केळीच्या पाचशे घडांची झाडावरच नासाडी झाली. त्यामुळे एक ते दीड लाखाचे नुकसान झाले आहे. स्थानिक परिसरातील ग्राहकांकडून मागणी नसल्यामुळे थेट विक्री देखील करता येत नाही. वाहतूक परवाने दिले जात असले तरी व्यापारी खरेदीसाठी धजत नाहीत. त्यामुळे नुकसान सुरुच आहे. बाजार समित्या सुरु राहिल्या तर विक्रीची व्यवस्था होईल. बाजार समित्या बंद राहिल्या तर शेतकऱ्यांच्या नुकसानीत भर पडत जाईल. 
- शिवाजीराव देशमुख, केळी उत्पादक, बारड, जि. नांदेड 

माझी उत्पादित सर्व शेतमाल वाशी, सुरत, औरंगाबादच्या मार्केटमध्ये व्यापारी पर्यंत पोहोचण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. पण बाजार समित्या बंदमुळे सारं ठप्प झालय. माझ्याकडे २५ एकर शेवगा, १० एकर भरताची वांगी, पाच एकर डांगर, तीन एकर टोमॅटो चे क्षेत्र आहे. वाशी मार्केटमध्ये भरताच्या वांग्याला मोठी मागणी असते परंतु आता मार्केटचा बंद असल्याने मोठे नुकसान होतंय. नेमकं आमच्याकडील माल कुणाला हवा हेच आम्हाला माहीत नाही. त्यामुळे मोठ्या बाजारपेठा सुरू असाव्यात शिवाय आमचा शेतमाल आम्हाला त्या बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याची सोय असावी. 
- पदमसिंग शिवसिंग दुलत, ब्राह्मणी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद 

दरवर्षी दोडका, ढोबळी मिरची, टोमॅटो अशी भाजीपाला पिके घेतो. मुख्यत्वे वाशी मार्केटला माल पाठवतो. मात्र अचानक बाजार समित्या बंद झाल्याने शेतमालविक्रीची दिशा राहिली नाही. या परिस्थितीत उत्पादन खर्चही निघत नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता मुंबईचे व्यापारी येत असल्याने हळूहळू माल काढून विक्री सुरू आहे. व्यापारी मनमानी दराने खरेदी करत आहेत. त्यामुळे चालू वर्षात उलाढाल ७० टक्के घटणार आहे. 
- अनिल सोनवणे, भाजीपाला उत्पादक, बेळगाव तऱ्हाळे, जि. नाशिक 

ओतूर (ता. जुन्नर) परिसरातील शेतमाल किरकोळ व्यापारी खरेदी करत आहेत. मात्र या खरेदीचे प्रमाण खुपच कमी आहे. टोमॅटो खरेदीचा उपबाजार सुरू आहे. मात्र पुणे, मुंबई शहरात किरकोळ विक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ पाच ते दहा टक्के मालच खरेदी केला जात आहे. ऑनलाइन विक्री करणाऱ्यांचा पर्याय आहे, मात्र ते खुपच कमी प्रमाणात माल घेतात, आणि तो पोहोच करायला सांगतात. शेतकऱ्याला हे शक्य नाही. यावर उपाय म्हणून शहरात सुरक्षितता बाळगून अधिकृत किरकोळ विक्रेत्यांना भाजीपाला विकायला परवानगी दिली पाहिजे. 
- अजित घोलप, रोहोकडी, ता. जुन्नर, जि. पुणे 

येत्या आठवडाभरात फ्लॉवर काढणीस येणार असून, तो कोठे विकायचा हा प्रश्‍न उभा राहिला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन सुरूच राहिल्यास फ्लॉवर जनावरांना चारावा लागणार आहे. आता अडचणी येत असल्या तरी बाजार समित्या बंद ठेवणे आवश्‍यक आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून पुण्यातील सोसायट्यांमध्ये भाजीपाला दिला जात आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांचा माल जागेवरच आहे. पिके जास्त दिवस राहू शकत नसल्याने नुकसान वाढणार आहे. शेतकरी ग्राहकांपर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे शासनस्तरावर प्रयत्न करून तालुकास्तरावर कृषी आणि पणन विभागाने यंत्रणा उभारून शेतकऱ्यांच्या बांधावर खरेदी करावी. या यंत्रणेने शेतमालाची खेरदी करून विक्री केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे शक्य होणार आहे. 
- नंदा भुजबळ, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे 

सध्या माझ्याकडे साडे सात एकरावर सिमला मिरची, कारले, शेवगा आहे. पहिले दोन दिवस मी थेट विक्रीचा प्रयत्न केला. परंतु बाजार बंद आहे, त्यामुळे थेट विक्री किती करणार, एकतर पावसाने नुकसान केले. त्यात आता बाजार समित्या बंद केल्या आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे ठिक असले तरी शेतकऱ्यांचे भाजीपाला, फळांचे होणारे नुकसान पाहता बाजार समित्या थेट बंद करु नये. बाजार समित्या बंद केल्याने खरेदी-विक्री बंद होऊन संपूर्ण नुकसान होत आहे. गर्दी टाळण्यासाठी छोटे-छोटे पर्यायी बाजार उभे करावेत. 
- किरण चव्हाण, खेडले काजळी, ता. नेवासा, जि. नगर 

माझ्याकडे दोन एकर टोमॅटो आहेत. लॉकडाऊनमुळे विक्रीला सुरवातीपासूनच अडचणी येत आहेत. पहिले दोन तोडे मुंबईला विकल्यानंतर आता पंधरा दिवसापासून तोडणीच केली नाही. स्थानिक पातळीवर विकण्याचा प्रयत्न केला, परंतु दर कमी असल्याने खर्चही निघत नाही. सरकारने कोरोनामुळे अन्य बाबी बंद ठेवल्या तरी बाजार समित्या बंद ठेवू नयेत. बाजार समित्या बंद असल्याने जास्तीचा माल विक्रीचे नियोजन कसे करणार. थेट विक्रीचा प्रयत्न केला तरी विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने लोक तरी किती खरेदी करणार. 
- जालिंदर झोडगे, भाजीपाला उत्पादक, कळस खुर्द, ता. अकोले, जि. नगर 

माझ्याकडे कोबी, बटाटा यासाहित ओली मिरची आदी भाजीपाला पिके आहेत. सध्या बेळगाव बरोबरच मुंबई पुण्याच्या बाजारपेठा बंद असल्याने आमचे अतोनात नुकसान होत आहे. मी दररोज भाजीपाला काढून शेजारील खेड्यापाड्यात जिथे भाजीपाला नाही तिथे जाऊन किरकोळ विक्री करत आहे. पण इतर वेळी घाऊक प्रमाणात जाणारा भाजीपाला तेवढ्या प्रमाणात विकत नसल्याने नुकसान सोसावे लागत आहे. बाजारसमित्या बंद होणे हा पर्याय नाही. गावोगावी सक्षम पर्याय उपलब्ध करून मगच हा निर्णय घेणे अपेक्षित होते. शासनाने थेट भाजीपाला विक्रीला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावे 
- गोपाळ भोसले, जंगमहट्टी, ता. चंदगड, जि कोल्हापूर 

सध्या शेतात अर्धा-अर्धा एकर कारले, टोमॅटोचे पीक उभे आहे. मागील १२ ते १३ दिवसांपासून तोडणीच केली नाही. सद्यःस्थितीत बाजार समित्या बंद राहणेच योग्य वाटते. मात्र, हे बंद ठेवताना शेतकऱ्याला थेट माल विक्रीची सुविधा द्यायला हवी. शेतकऱ्याला होम-टू-होम विक्रीची सुविधा मिळाली तर तो दोन पैसे कमी घेऊन ग्राहकाला तो माल देईल. व्यापाऱ्याचे कमिशन राहणार नाही. यंदा मी फेब्रुवारीत जी लागवड केली त्यावर अत्यल्प खर्च केला आणि मार्च-एप्रिलमध्ये दरवर्षी जी लागवड करीत असायचो ती थांबवली आहे. परिस्थितीत सुधारणा होईस्तोवर आता पर्याय दिसत नाही. 
- मधुकर शिंगणे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, देऊळगावमही, जि. बुलडाणा 

बाजार समिती बंद करण्याच्या निर्णयामुळे आंबा बागायतदारांनी सध्या झाडावरील आंबे काढणी बंद ठेवली आहे. गेले चार दिवस आंबा काढून पेट्या वाशी, पुण्यात पाठविण्याचे काम सुरु होते. सोसायटीपर्यंत आंबा पोचवण्यासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या तर त्याचा फायदा होईल. दर्जेदार आंब्याला चांगला दर मिळत आहे. तीन दिवस वाशी मार्केट बंद असले तरीही कतार, ओमानला निर्यातीसाठी आंबा दलालांकडे पाठवत आहेत. तसेच परराज्यातून महाराष्ट्रात येणारी आंबा वाहतुक पूर्णतः बंद आहे. शासनाने आंबा बागायतदारांना कर्जमाफी द्यावी. 
- प्रसन्न पेठे, रत्नागिरी 

बागायतदारांनी बाजार समितीवर अवलंबून न राहता थेट विक्रीला प्राधान्य दिल पाहिजे. सध्या कृषी विभाग चांगल्या पद्धतीने काम करत आहे; मात्र आंब्याचा दर ठरवण्याची जबाबदारी शेतकरी आणि ग्राहक यांच्यावर सोपवली पाहिजे. कृषी विभागाने दर जाहीर करु नये. यंदा आंबा कमी आहे, त्यामुळे दर्जानुसार किंमत मिळू शकते. सध्या कोरोनामुळे बाजार समित्यांमधील गर्दी कमी करण्याचे आव्हान आहे. परिस्थितीनुसार शासनाने निर्णय घेणे अपेक्षित आहे 
- सलील दामले, आंबा बागायतदार, कोळंबे, जि. रत्नागिरी. 

बाजार समित्या बंद झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कवडीमोल दरात विक्री करावी लागली किंवा माल फेकून द्यावा लागला. तेव्हा शासनाने बाजार समित्या सुरु कराव्या, किंवा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून भरपाई द्यावी. आम्ही सध्या कृषी खात्याच्या सहकार्याने शहरात ना नफा ना तोटा तत्वावर घरपोच शेतमालाचा पुरवठा करतोय. परंतु बंदमुळे वाहतुकीची व्यवस्था होत नाही, तसेच मजुरी मिळत नाहीत. विक्री व्यवस्थेसाठी शासन स्तरावर तातडीने उपाय योजना राबवल्या पाहिजेत. 
- प्रल्हाद वरे, प्रगतिशील शेतकरी, मळद, ता. बारामती, जि. पुणे 


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...