चारा छावणी
चारा छावणी

थेट छावणीतून : जित्राबं जगवून कसंतरी संकट टाळायचंय...!

आमच्या भागात दूधधंदा मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक शेतकऱ्यांकडे दुभत्या म्हशी, गाई आहेत. यंदा दुष्काळाने शेतकरी खचले होते. मात्र छावणी सुरू झाली आणि दूधधंदा तरला, जनावरं वाचली. - रामभाऊ धाडगे, शेतकरी

कापूरवाडी ः आतापोतर चार दुष्काळ पाहिले. आधीच्या दुष्काळात शेतं पीकली नाही; पण चारा पाणी होतं. यंदा शेतं तर पिकली नाहीच, पण चारा-पाणीही नाही. लाखमोलाची दुभती जनावरं जगायची चिंता होती. छावण्यांनी आधार दिला. दूध धंदा तरला. अजून दोन महिने जायचेत. जनावरे जगवून कसंतरी संकट टाळायचय. छावणी आता सध्यापुरंत गाव झालय, इथच आमचा राबता असतो, सत्तरी ओलांडलेले शेतकरी दुष्काळाची दाहकता सांगताना छावण्याचे कौतुकही करतात.  नगर जिल्‍ह्यामधील बहुतांश भागात दुष्काळाची दाहकता वरचेवर वाढत आहे. जनावरे जगवणे एवढे एकच काम शेतकऱ्यांसमोर आहे. नगर शहराला लागून असलेल्या तीस किलोमीटर परिसरातील गावांत दूध व्यवसायाला प्राधान्य दिले जाते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या दावणीला कायम दुभत्या, गाई-म्हशी.  यंदाच्या दुष्काळात हे लोक खचले होते. मात्र, बाजार समितीने छावण्या सुरू केल्या आणि दूध व्यवसाय तरला. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीने तालुक्यातील कापुरवाडी, पिंपळगाव माळवी, डोंगरगण, बुऱ्हाणनगर, वाळकी, कोल्हेवाडी, मांडवा या गावांत जनावरांच्या छावण्या सुरू केल्या आहेत. छावण्यात शेतकऱ्यांनी सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी कर्मचारी नियुक्त केले आहेत, असे सभापती विलासराव शिंदे व सचीव अभय भिसे यांनी सांगितले.  कापुरवाडीत प्रत्येक शेतकरी कुटुंबाचा दूधधंदा. पन्नास हजारापासून दीड लाख रुपयाच्या किमती म्हशी दारात. पाच म्हशीपासून पन्नासपर्यंत म्हशी पाळणारे येथे शेतकरी आहेत. साधारण म्हटले तरी गावांत तीन हजारांच्या जवळपास म्हशींची संख्या. इतर जनावरे वेगळीच. तेथून बाजूला असलेले देवगाव, आगडगाव, रतडगाव, बुऱ्हाणनगर, वारुळवाडी, पिंपळगाव उज्जैनी, डोंगरगण येथेही दूधधंदा महत्त्वाचा आहे. यंदाच्या दुष्काळात हे सगळे शेतकरी चिंतेत होते. मात्र, बाजार समितीने छावण्या सुरू करून दिलासा दिलाय. छावणी कसंल, ते गावच आहे. प्रत्येक कुटुंबातील चार-चार माणसांचा तेथे राबता आहे. कापुरवाडीची छावणी या भागातील सर्वांत मोठी. या छावणीत जवळपास दोन हजार जनावरं. त्यात दीड हजारपेक्षा अधिक फक्त म्हशी आहेत. वयाने साठीच्या पुढे सरकलेली माणसं, तरणी आणि सध्या शाळेला सुटी असल्याने शाळकरी, काॅलेजची पोरंही येथेच मुक्कामाला असतात. प्रत्येक कुटुंबानी संसार थाटावा तसंच जनावरे आणि तेथे रात्री विसावण्याची, बसण्याची पाण्याची, चारा ठेवण्याची सोय केलेली.  साऱ्या सकाळपासूनच येथे लोकांचा राबता असतो. सूर्य जरासा माथ्यावर आला की जेवणाचे डब्‍बे घेऊन येणाऱ्यांची लगबग असते. या भागात प्रचंड दुष्काळ आसल्याने पाणी नाही अनं चाराही नाही. भीमा नदीकाठच्या पट्ट्यातून नगरला विक्रीसाठी येणारा दौंड, बारामती, पुणे भागांतील ऊस बाजार समितीतून येथे आणला जातो. सकाळपासूनच कुट्टी केलेल्या चाऱ्याचे वाटप सुरू होते. पोरांपासून महिलांची चारा घेण्यासाठी धावपळ, ओळी करून जनावरं बांधलेली. त्यामुळे चारा भरून बैलगाड्या घेऊन जाता येते. ती जबाबदारी बहुतांश वेळा शाळकरी मुलांवर असल्याचे दिसले. अनेकांचा शेण-पाणी, जनावरांचा चारा करतानाच दिवस निघून जातो. दिवसभर दुपारच्या प्रहरी आणि सायंकाळीही निवांत झाल्यावर गप्पांचा फड रंगतो. त्यात दुष्काळासह गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर रंगत येते.  छावणीतील जुन्या-जाणत्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळची दाहकता यंदा आतापर्यंतच्या सगळ्या दुष्काळापेक्षा भयानक असली तरी शेतकरी आत्मविश्वासाने बोलण्यातही धग वाटत होती. सत्तरी ओलांडलेले भैरू कऱ्हाडे म्हणाले, ‘‘१९७२, त्याआधी १९६५ दुष्काळ होता. मागच्या दहा वर्षांत अनेकवेळा दुष्काळाशी सामना करावा लागला. आतापोतर चारा, पाणी, शेतपीकं यापेक्षा काही तरी असायचं. यंदा यातलं काहीच नाही. आमच्या भागातील दूधधंदा केवळ छावणीमुळे तरला, नाही तर शेतकरी मोडून पडला असता. देखणी जनावरं , वासरं आमच्या दावणीतून कसायच्या दावणीला गेली असती. छावण्या सुरू केल्या, मुके जीव वाचवले, हा दुवा काहीच कमी पडू देणार नाही.’’  छावणीचालकांना चिंता अ नुदानाची दुष्काळात जनावरे जगली ती छावणीमुळे. अन्यथा दावणी रिकाम्या झाल्या असत्या. शेतकरी अभिमानाने सांगत असले तरी छावणीचालकांना मात्र अनुदानाची चिंता सतावत आहे. येथील छावणीवर आतापर्यंत पन्नास लाखापेक्षा अधिक रक्कम छावणीवर खर्च झाली आहे. जवळपास चारा, पाणी उपलब्ध नसल्याने दूरवरून आणावे लागते. दर दिवसाला सव्वा लाखापेक्षा अधिक खर्च येतो. शासनाकडून अनुदान देण्याबाबत हालचाली होताना दिसत नाहीत. त्यात नियमही कडक. त्यामुळे आता छावणी चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे छावणीचालकांनी सांगितले. प्रतिक्रिया बाजार समितीने छावणी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला आहे. या भागात यंदा पाणी, चारा नाही. जर छावण्या सुरू झाल्या नसत्या तर येथील शेतकरी, दूध उत्पादक उद्‌ध्वस्त झाला असता. - कानिफनाथ कासार, ज्येष्ठ नेते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com