नगर जिल्ह्यात हमीभावाने शेतीमाल विक्रीसाठी ६४ शेतकऱ्यांची नोंदणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी कमी प्रमाणात केंद्रे सुरू केली जाणार आहेत. त्यावर शेतीमाल विक्रीसाठी अगोदर शासनाकडून शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी केली जाते. आतापर्यंत जिल्ह्यातील सात केद्रांवर मूग, उडीद, सोयाबीन विक्रीसाठी अवघ्या ६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे यंदा आतापर्यंत एकदा नव्हे तर दोनदा यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळावा, यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, बाजारात व्यापारी मालाचा दर्जा नसल्याचे कारण पुढे करत हमीभावापेक्षा कमी भावाने शेतीमाल खरेदी करीत आहेत. हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केल्यावर कारवाई करण्याची तरतूद असली तरी अजून तरी कारवाई कुठेच झालेली नाही. सध्या जिल्ह्यातील कोणत्याच बाजार समितीत मूग, उडीद, सोयाबीन, हरभरा या शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्याची स्थिती आहे.

शेतकऱ्यांकडील सोयाबीन, उडीद, मूग हमीभावाने खरेदी करण्यासाठी राज्यभरात साधारण २७४ खरेदी केंद्रे सुरू करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्याची जबाबदारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे दिलेली आहे. फेडरेशनने हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी बाजार समित्या, संस्थांकडून प्रस्ताव मागितले. आलेल्या प्रस्तावांना वरिष्ठ पातळीवरून मान्यताही दिली. एक नोव्हेंबरपासून या केंद्रांवरून शेतमालाची खरेदी केली जाणार आहे. हमीभावाने खरेदी केंद्रांवर सोयाबीन, उडीद, मुगाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पहिल्या वर्षी नोंदणीला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. मात्र, गेल्यावर्षी नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ज्यांनी नोंदणी केली त्यांनीही केंद्राकडे पाठच फिरवली. खरेदी केंद्रांवर तुरीला पाच हजार ८०० रुपये, उडदासाठी पाच हजार ७०० रुपये, मुगासाठी सात हजार ५० रुपये तर सोयाबीनसाठी तीन हजार ७१० रुपये क्विंटल असा हमीभाव दिला जाणार आहे.

जिल्ह्यात यंदा राहुरी, जामखेड, शेवगाव, कर्जत, पाथर्डी या पाच ठिकाणी हमीभावाने खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र, केंद्रांकडे अजूनही शेतकरी फिरकायला तयार नाहीत. आतापर्यत ऑनलाइन नोंदणीसाठी दोन वेळा मुदत वाढवली आहे. आता ३० ऑक्टोबरपर्यंत मुगाची तर १५ नोव्हेंबरपर्यंत उडीद, सोयाबीनची नोंदणी करता येणार आहे. मात्र, आतापर्यंत मूग विक्रीसाठी १७, उडीद विक्रीसाठी ४२ तर सोयाबीन विक्रीसाठी ५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.   पाथर्डीत नोंदणीच नाही हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू केली खरी, पण त्याकडे शेतकऱ्यांनी का पाठ फिरवली याचे कोडे प्रशासनालाही उलगडले नाही. पाथर्डी येथे केंद्र सुरू होऊनही अजून एकाही शेतकऱ्याने येथे मूग, सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली नसल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com