विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५ हजार कोटींचे अतिरिक्त उत्पन्न 

ऊस, हरभरा, ज्वारी, भात, कांदा, डाळिंब, लिंबू या वाणांच्या लागवडीमुळे उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना उत्पादनातून सुमारे ९५ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले.
farmers
farmers

नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले वाण व प्रसारित केलेल्या सुधारित वाणांना राज्यासह देशभरात मागणी आहे. गेल्या काही वर्षांची स्थिती पाहता ऊस, हरभरा, ज्वारी, भात, कांदा, डाळिंब, लिंबू या वाणांच्या लागवडीमुळे उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना उत्पादनातून सुमारे ९५ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाले, असा दावा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केला आहे. 

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर नुकतीच कृषी विद्यापीठ व राज्य सरकारच्या कृषी विभागातर्फे संयुक्त कृषी संशोधन व सल्लागार बैठक झाली. कृषी आयुक्त धीरजकुमार, ‘महाबीज’चे व्यवस्थापकीय संचालक राहुल रेखावाल, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, परिषदेचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांचा बैठकीत सहभागी होता. यावेळी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांमुळे शेतकऱ्यांना वाढीव उत्पन्नाची माहिती दिली. 

विद्यापीठाने आतापर्यंत 52 वर्षांमध्ये अन्नधान्य, फळेफुले, चारापिके यांचे २७० वाण विकसित केले असून १५८१ महत्त्वपूर्ण शिफारशी प्रसारित केल्या. उसाच्या फुले २६५ आणि को ८६०३२ वाणांनी ऊस क्षेत्रात क्रांती केली. या वाणांखाली राज्यात ७५ टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे. ऊस उत्पादकांना या वाणांतून ४० हजार २०९ कोटी रुपये मिळाले. 

हरभऱ्याचे १३ वाण विकसित असून एकूण क्षेत्रापैकी ३७ % क्षेत्र या वाणांखाली असून यातून १३ हजार ४२३ कोटी मिळाले. ज्वारीच्या १२ पेक्षा अधिक वाणांखाली २५ टक्के क्षेत्र असून ८ हजार ४८२ कोटी, बाजरीच्या सात वाणांखाली दहा टक्के क्षेत्र आहे, यातून २२० कोटी रुपये मिळाले. भाताचे दहा वाण विकसित केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ७० टक्के क्षेत्र हे विद्यापीठ विकसित केलेल्या इंद्रायणी या वाणाखाली आहे. यातून २५ कोटी ७८९ कोटी रुपये मिळाले. 

कांद्याचे ४० टक्के क्षेत्र फुले समर्थ आणि बसवंत ७८० या वाणाखाली असून यातून आतापर्यंत ७ हजार ५६५ कोटी रुपये मिळाले. डाळिंबात गणेश, मृदुला, आरक्ता, भगवा फुले, भगवा सुपर या वाणाखाली देशातील एकूण ९५ टक्के क्षेत्र आहे. शेतकऱ्यांना यातून २१ कोटी ४२७ कोटी रुपये मिळाले. लिंबू लागवड क्षेत्रापैकी ६५ टक्के क्षेत्र विद्यापीठाच्या वाणांखाली असून त्यातून ९३५ कोटी रुपये अतिरिक्त मिळाले, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी सांगितले.  विद्यापीठाने संकलित केलेल्या माहितीचा कालावधी  बाजरी ः सात वर्ष  लिंबू ः २३ वर्ष  भात ः १५ वर्ष  कांदा ः १५ वर्ष  ज्वारी ः ११ वर्ष  हरभऱा ः ३८ वर्ष  डाळिंब ः १० वर्ष  ऊस ः १५ वर्ष  प्रतिक्रिया  महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांमुळे उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले. मात्र कृषी क्षेत्र अविरत सुरू आहे. चालु वर्षातही चांगले उत्पादन निघेल. आव्हानांना आपण एकत्र सामोरे जाऊ.  - डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com