बाजारबंद, वेळांच्या निर्बंधांचा भाजीपाला उत्पादकांना फटका 

कोरोनामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक महत्त्वाचे आठवडी बाजार बंद झालेले असून, अकोल्यातील ठोक भाजीपाला मार्केटही यापासून वाचलेली नाही.
brinjal
brinjal

अकोला ः कोरोनामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक महत्त्वाचे आठवडी बाजार बंद झालेले असून, अकोल्यातील ठोक भाजीपाला मार्केटही यापासून वाचलेली नाही. बाजार बंदमुळे अनेकांचा रोजगार तर हिरावलाच शिवाय शेतीमालाचे दरही घसरल्याने या भागातील भाजीपाला उत्पादक कमालीचे अडचणीत सापडले आहेत. 

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करीत कडक अंमलबजावणी सुरू केली. ग्रामीण भागात भरणारे आठवडी बाजार बंद करण्यात आले. शहरातील बाजारपेठेत पहाटे तीन ते सकाळी सहा या तीन तासांत भाजीपाल्याची खरेदी विक्री केली जात आहे. अशा पद्धतीने व्यवहार होत असल्याचा फायदा व्यापारी उचलत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अत्यंत कमी दराने खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांना बाजारपेठेत माल ने-आण करण्याचा खर्चही आता महाग झाला आहे. 

गेल्या वर्षात कोरोनामुळे मार्चपासून शेतकऱ्यांची गोची झाली होती. अनलॉकनंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा श्‍वास घेत उधार, उसनवारी करून टोमॅटो, वांगी व इतर भाजीपाला पिकांची पेरणी केली. या मालाच्या दोन-तीन तोडणीला बाजारपेठेत बऱ्यापैकी दरही मिळाले. परंतु गेल्या आठवड्यापासून आठवडी बाजार बंदचे आदेश धडकले आणि पुन्हा हे शेतकरी अडचणीत सापडला. 

प्रतिक्रिया  आम्ही चांगल्या प्रतीच्या भाजीपाल्याचे उत्पादन करीत आहोत. परंतु कोरोनाच्या नावावर सध्या प्रशासनाने अनेक बाबींवर निर्बंध घातल्याने नुकसान होत आहे. भाजीपाला बाजाराच्या वेळेचे नियोजन चुकलेले आहे. १८ ते २० किलो वजनाची वांग्यांची प्लॅस्टिक बॅग अवघी ५० ते ६० रुपयांना व्यापारी खरेदी करीत आहेत. मेथीची भाजी मातीमोल दराने घेत आहेत. हाच भाजीपाला ग्राहकांना मात्र महाग विकल्या जात आहे. मेथीची चाळीस रुपये किलो, वांगे चाळीस ते साठ रुपये किलोने विकली जात आहेत. यामध्ये शेतकऱ्यालाच मार बसतो आहे. अशा प्रकारचे निर्बंध राहिले, तर यंदाही शेतकऱ्याचे अर्थकारण संपुष्टात येईल.  - दादा टोहरे, भाजीपाला उत्पादक, बेलखेड, जि. अकोला 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com