बीड जिल्ह्यात भाजी, फळे विक्रीत शेतकरी गटांची कोटीची उलाढाल

अंबाजोगाईः लॉकडाउनमुळे शहरातील नागरिकांना भाजीपाला व फळे फिरून विकण्यासाठी शेतकरी गटांना परवाने दिले होते. या संधाचे सोनं करत २० दिवसांतच या गटांनी कोटींची उड्डाने घेतली. १२५ शेतकरी गटांनी या कालावधीत मंगळवार (ता.५) पर्यंत एक कोटी ७ लाख, २० हजार ७८० रुपयांचा व्यवसाय केला आहे.
farmers' groups selling fruits and vegetables of Crores in Beed district
farmers' groups selling fruits and vegetables of Crores in Beed district

अंबाजोगाई ः लॉकडाउनमुळे शहरातील नागरिकांना भाजीपाला व फळे फिरून विकण्यासाठी शेतकरी गटांना परवाने दिले होते. या संधाचे सोनं करत २० दिवसांतच या गटांनी कोटींची उड्डाने घेतली. १२५ शेतकरी गटांनी या कालावधीत मंगळवार (ता.५) पर्यंत एक कोटी ७ लाख, २० हजार ७८० रुपयांचा व्यवसाय केला आहे. त्यात त्यांना अंदाजे ३५ ते ४० टक्के फायदा झाला आहे. या उपक्रमात जिल्ह्यात अंबाजोगाई तालुका सध्या अव्वल राहिला आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात तब्बल १ कोटी रुपयांचा भाजीपाला शेतातून थेट घरपोच विकला आहे. शेती गटांनी विकलेला हा भाजीपाला जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. या योजनेमुळे कोरोनाच्या महाभयंकर संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी येथील कृषी कार्यालयातर्फे शेतकरी गटांना भाजीपाला व फळे विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार अंबाजोगाई तालुक्यातील १२५ शेतकरी गटांना हा परवाना मिळाला. या गटांनी शहरातील १४ प्रभागात फिरून भाजीपाला व फळे विक्री सुरू केली. 

या गटांना विक्रीसाठी काही नियम घालून दिले होते. ते पाळतात की, नाही हे बघण्यासाठी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुधाकर जगताप व तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी चार पथके तयार केली. ठरवून दिलेल्या दरानुसार भाजीपाला व फळांची विक्री करतात की नाही, याची पाहणी दररोज हे पथके करत आहेत. त्याचबरोबर परवाना न घेता अनाधिकृतपणे भाजीपाला व फळांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना नगरपालिकेकडून दंडही आकारण्यात आले. 

नगरपालिका व कृषी कार्यालयाने केलेल्या योग्य नियोजनामुळे अंबाजोगाई तालुक्यातील शेतकरी गटांनी या लॉकडाऊनच्या काळात (मंगळवारपर्यंत) तब्बल एक कोटी पेक्षा जास्त रकमेचा भाजीपाला व फळांची विक्री केली. जिल्हात सर्वात जास्त विक्री करण्याचा हा विक्रम अंबाजोगाई तालुक्यांने केला आहे. 

शेतकरी शिकला मार्केटिंग  

या शेतकरी गटात ज्यांच्याकडे स्वत:चा भाजीपाला आहे, असेच बहुतेक शेतकरी आहेत. ज्या गटातील शेतकऱ्यांकडे भाजीपाला नाही, असे गट इतर शेतकऱ्यांकडून घेऊन भाजीपाला विकतात. तेही शासनाने ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच (उदा.१२ रु प्रमाणे खरेदी केलेले बटाटे २० प्रति किलो विकतात) म्हणजे ३५ ते ४० टक्के फायदा शेतकऱ्यांना होतो आहे. या मार्केटिंग बरोबरच व्यवसाय करण्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांत निर्माण झाला आहे. यातून शेतकरी बाजारपेठेचे गणित शिकला आहे. 

या उपक्रमामुळे ग्राहकांना योग्य दरात व थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला मिळाला, आणि तोही दारात ! यामुळे ग्राहकही खुश आहे. शेतकरीही यातून मार्केटिंग शिकला आहे. त्यांना व्यापाऱ्याला भाजीपाला विकताना येणारी तूट वाढली आहे. लॉकडाउन नंतरही हा उपक्रम सुरू ठेवण्याचा मानस तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी व्यक्त केला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com