नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून 

मी अनेक वर्षांपासून कापूस उत्पादन घेतो. कापसावरच अनेक आर्थिक बाबी अवलंबून आहेत. यंदा कोरोनामुळे कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शेतीची मशागत करता येत नाही. लवकर खरेदी केंद्र सुरू झाले नाही तर खते, बियाणे घ्यायची अडचण होणार आहे. त्यामुळे कापूस खरेदी केंद्र लवकर सुरू व्हावे. - प्रमोद तांबे, शेतकरी, आधोडी, ता. शेवगाव, जि. नगर
kapus_20gharat
kapus_20gharat

नगरः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर नगर जिल्ह्यात महिनाभरापासून कापूस खरेदी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरात सुमारे पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. कापूस विक्री करायला उशीर होत असल्याने दर्जा घसरत असून वजनातही घट होत आहे. यंदा उत्पादनात घट झाली अन् त्यात विक्रीची अडचण येत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.  नगर यंदा जिल्ह्यात 1 लाख 25 हजार 663 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. त्यातील शेवगाव तालुक्यात 42 हजार, पाथर्डी तालुक्यात 32 हजार, नेवासा तालुक्यात वीस हजार तर कर्जत तालुक्यात आठ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. सुरुवातीला कमी पाऊस आणि दिवाळीच्या काळात जोरदार पावसामुळे कापसाचे नुकसान झाले. कृषी विभागाकडे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात एकरी तीन क्विंटल कापसाचे उत्पादन निघाले आहे. यंदा कापूस खरेदीसाठी राज्य शासनाच्या कापूस पणन महासंघाने शेवगाव तालुक्यातील चापडगाव व कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरु केले. दोन्ही केंद्रावर आत्तापर्यंत जवळपास दीड लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. या भागातून व्यापारीच बहुतांश कापसाची दरवर्षी खरेदी करतात. यंदा मात्र जागतिक स्तरावर कापसाची मागणी नाही.  निर्यात धोरण निश्चित नसल्याने गुजरात, उत्तरप्रदेश, राजस्थानात मागणी नसल्याने व्यापाऱ्यांनी फारसी कापसाची खरेदी केलेली नाही. यंदा आत्तापर्यंत अवघा साधारण दीड लाख क्विंटल कापसाची व्यापाऱ्यांकडून खरेदी झाली असल्याचा अंदाज आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून कापूस खरेदी केंद्रे बंद आहेत. कधी सुरु होणार हे निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्रीची मोठी चिंता सतावत आहे. आजमितीला सुमारे पाच लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस घरात पडून असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कापूस खरेदी लवकर सुरू केली तरच प्रश्न सुटतील असे दुले चांदगाव (ता. पाथर्डी) येथील कापूस उत्पादक शेतकरी संतोष ढोले यांनी सांगितले.  कापूसविषयक स्थिती 

  • नगर जिल्ह्यामधील साधारण पाच तालुक्यात कापसावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. आता खरीप हंगाम दीड महिन्यांवर आला आहे. त्याआधीच खते, खरेदी केली जातात. मात्र कापूस विकला गेला नाही तर आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना खते, बियाणे कशी खरेदी करायची हा प्रश्न सतावत आहे. 
  • काही दिवसात संचारबंदी शिथिल झाली तर कापूस खरेदी सुरु होईल. मात्र जिल्हाबंदी कायम असल्याने शेजारच्या जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रावरही कापूस विकायला न्यायचा झाला तरीही अडचणी येणार ही चिंता सतावत आहे. 
  • सीसीआयच्या (कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया) नियमानुसार एफएक्यु दर्जाचा कापूस खरेदी करावा असे आदेश आहेत. हा कापूस साधारण वेचणीनंतर दोन महिन्यात म्हणजे फेब्रुवारी अखेरपर्यंत खरेदी होणे गरजेचे आहे. आता दीड महिना अधिक उलटला आहे. त्यामुळे दर्जा घसरल्यास दराचाही फटका सोसावा लागण्याची शेतकऱ्यांना चिंता आहे. शिवाय वाढत्या उन्हामुळे वजनातही घट होत आहे. 
  • व्यापारी कापसाची खरेदी करतच नाहीत, जे खरेदी करतात ते कापसाला दर्जा नसल्याचे सांगत अडीच ते तीन हजार रुपये क्विंटलने खरेदी करत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक दुहेरी अडचणीत सापडला आहे. 
  • कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांना थेट बॅंकेत चुकारे दिले जातात. विक्री केलेल्या कापसापैकी सुमारे दहा ते पंधरा टक्के चुकारे राहिलेले आहेत. त्याचे पैसै आलेले असले तरी आधारकार्ड व अन्य बाबी पूर्ण होत नसल्याने खात्यावर जमा करता येत नाहीत. कोरोनामुळे बॅंकेत आधारकार्ड लिंकिंग व अन्य कामे बंद असल्याने पैसे मिळण्याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com