परसातील ‘ग्रामप्रिया’ कोंबडीपालन अर्थकारणाला देतेय बळकटी

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील काही गावांमध्ये परसबागेतील कुकूटपालनाला चालना देण्यात आली आहे.नरपक्षांची मांसल म्हणून तर मादीपक्षांच्या अंड्यांची थेट विक्री करू पाहणारे ‘क्लस्टर'' या गावांमधून आकार घेते आहे.
Dr. kishor zhade, Dr, basavraj pisure, Irfan shaikh and Bhikanrav pol in poultry farm
Dr. kishor zhade, Dr, basavraj pisure, Irfan shaikh and Bhikanrav pol in poultry farm

औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील काही गावांमध्ये परसबागेतील कुकूटपालनाला चालना देण्यात आली आहे. यामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने शेतकऱ्यांना ''ग्रामप्रिया'' जातीच्या पक्षांची एक दिवसीय पिल्ले देण्यात आली. आता नरपक्षांची मांसल म्हणून तर मादीपक्षांच्या अंड्यांची थेट विक्री करू पाहणारे ‘क्लस्टर'' या गावांमधून आकार घेते आहे. ग्राहकांकडून या पक्षांना चांगली मागणी असून जागेवरच बाजारपेठ मिळवण्यात शेतकऱ्यांना यश येत आहे. केंद्रीय कोरडवाहू संशोधन केंद्र, हैदराबाद व कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदलावर आधारित राष्ट्रीय कृषी प्रकल्प (निक्रा) राबवण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात  गंगापूर तालुक्यातील शेकटा, बुट्टेवडगाव, शंकरपूर, वजनापूर, गोपाळवाडी आदी गावांचा त्यात समावेश आहे. प्रकल्पांतर्गत विविध उपक्रमांमध्ये परसबागेतील कुकूटपालन अनेक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला आधार देत आहे. सन २०१५ मध्ये शेकटा, २०१७ मध्ये शेकटा व वजनापूर तर यंदाच्या फेब्रुवारीत शेकटाच्या जवळपास १५, बुट्टेवडगावमधील ५ ते ७, शंकरपूरमधील २०, वजनापूरमधील १०, गोपाळवाडीमधील २० अशा शेतकऱ्यांना केव्हीकेकडून प्रति शेतकरी एक दिवसाचे ग्रामप्रिया जातीचे ५०  पक्षी देण्यात आले.   कुकूटपालनाचे प्रशिक्षण  पक्षी वाटपाआधी केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना  तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. यात खाद्य व्यवस्थापन, लसीकरण, पिल्लांचे संगोपन आदी बाबींचा समावेश राहिला.  ग्रामप्रिया कोंबड्यांना मागणी 

  • यंदा मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा व वाहतूक बंद होती. त्याचा फटका ब्रॉयलर कोंबडी विक्रीला बसला. मागणी असूनही ग्रामीण भागात कोंबड्यांचा तुटवडा जाणवत होता. या संधीचा फायदा शंकरपूर, वजनापूर, गोपाळवाडी आदी गावातील शेतकऱ्यांना मिळाला 
  • भिकनराव पोळ म्हणाले की ग्रामप्रिया कोंबडीला चांगली मागणी आहे. सुरवातीला त्यांच्या संगोपनासाठी खोली तयार केली. खाद्य व पाण्याची व्यवस्था केली. तापमान व्यवस्थित राहण्यासाठी विजेचे बल्ब लावले. पिल्लांच्या संगोपनासाठी वेळोवेळी केव्हीकेचे मार्गदर्शन घेतले. त्यामुळे चार महिन्यांपर्यंत चांगले संगोपन करणे शक्य झाले. बहुतांशी कोंबड्यांचे वजन पाच ते साडेपाच महिन्यात सव्वा ते दीड किलोपर्यंत झाले होते.
  • जागेवरून मागणी कोरोना संकटात ग्रामस्थ घरी येऊन कोंबड्या व अंडी खरेदी करू लागले. पाच महिन्यांच्या कालावधीनंतर सहाशे रुपये नगानुसार जागेवरूनच कोंबड्यांची विक्री झाली. दहा रुपये प्रति नग याप्रमाणे अंड्यांची विक्री झाली. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली. अडचणीच्या काळात चांगला आर्थिक आधार मिळाला.   ग्रामप्रिया कोंबडीची वैशिष्ट्ये

  • ग्रामप्रिया कोंबडी कुकूट संशोधन संचालनालय, हैदराबाद यांनी विकसित केली आहे
  • आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या भागांसाठी व भूमिहीन शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय.
  • नर पक्षाचे दीड वर्षात सरासरी ३ ते साडेतीन किलोपर्यंत तर मादीचे वजन २.५ किलोपर्यंत होते.  
  • अंडी देण्याची वार्षिक क्षमता सरासरी १५० ते १७० अंड्याचे वजन सरासरी ४० ते ५५ ग्रॅम चोख व्यवस्थापन ठेवल्यास मरतुकीचे प्रमाण पाच टक्‍क्‍यांपेक्षाही कमी 
  • अंड्यांचा रंग तपकिरी शंकरपूर, वजनापूर, गोपाळवाडी आदी गावांतील शेतकरी मका ,बाजरी, तूर, सोयाबीन, मूग आदींचा भरडा सोबत तांदूळ प्रामुख्याने वापरतात. याशिवाय चिंचेचे पान, गवतवर्गीय वनस्पतींचाही समावेश असतो.
  • ग्रामप्रिया कोंबडीचे अर्थकारण

  • प्रति पक्षी सरासरी खर्च सुमारे ८३६ रुपये (खाद्य व अन्य) येतो. सरासरी उत्पन्न १९५० रुपये मिळते. 
  • साधारण ६०० ते ७०० रुपयांना प्रति पक्षी तर अंड्यांची विक्री १० रुपये प्रति नगाप्रमाणे होते.  
  • मोठी मागणी असल्याने ग्राहक थेट घरी येऊनच खरेदी करतात. त्यामुळे बाजारपेठ उपलब्ध आहे.
  • शहरी भागातही पक्षी व अंड्यांना चांगली मागणी आहे.
  • प्रतिक्रिय़ा सुमारे सात ते आठ महिन्यांपासून ५० पक्षांपासून कुकूटपालन सुरू केले. म्हणता म्हणता ते आजमितीला १२५ पक्षांपर्यंत पोचले आहे. नरपक्षांची विक्री करायची तर मादीपक्षांपासून अंडी उत्पादन असे सूत्र आम्ही ठेवले आहे. दिवसाला ८० ते ९० पर्यंतच्या संख्येने अंड्यांचा खप होतो. तेरा रुपये प्रति नग या दराने  औरंगाबाद शहरातील ‘बीड बायपास'' वरील मूल्याच्या दुकानातून विक्री होते. येत्या काळातहा उद्योग वाढविणार आहोत. - भिकनराव पोळ, ९४२१४११३२३  (शंकरपूर, ता गंगापूर) दोन वर्षांपूर्वी चार ते पाच गावरान कोंबड्या होत्या. त्यास ग्रामप्रिया जातीच्या ५० कोंबड्यांची जोड दिली. गावात माझ्याप्रमाणे पाच ते सात शेतकरी देखील कोंबडीपालन करताहेत. सद्यःस्थितीत पक्षांची संख्या १३० पर्यंत झाली आहेत. ग्राहक दारात येऊन अंडी घेऊन जातात. तीन एकर शेतीला जोड म्हणून या उद्योगाचा विस्तार एक हजार पक्षांपर्यंत करणार आहे. - गणेश पोळ, ९७६७४०७७१२ (शंकरपूर, ता गंगापूर) पन्नास पक्षांपासून मी उद्योगास सुरवात केली. आत्तापर्यंत जवळपास २५ नरपक्षी विकले. सद्यःस्थितीत १३  मादीपक्षी अंडी देत आहेत. जवळपास ८ ते १० अंडी ग्राहक दररोज घरून घेऊन जात आहेत. माझी पाच एकर शेती आहे. मात्र ती कोरडवाहू असल्याने रोजगारासाठी ‘एमआयडीसी’ गाठल्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु कुकूटपालनाने घरीच रोजगार मिळाला. येत्या काळात विस्तार करून त्याला उस्मानाबादी शेळीपालनाची जोड देणार आहे. - इसाक दादाभाई शेख, ९३७३८७१२४३  गोपाळवाडी, ता. गंगापूर  सन २०१५ पासून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून   परसबागेतील कुकूटपालनाचा उपक्रम आम्ही सुरू केला. तीन टप्प्यात दिलेले ग्रामप्रिया पक्षी अल्प, अत्यल्प भूधारक व भूमिहीन लोकांसासाठी आधारभूत ठरत आहेत. शेतीकामे करताना सहज करता येणारा हा व्यवसाय निश्‍चित फायद्याचा आहे.   - डॉ. किशोर झाडे, ९९२१८०८१३८  (कार्यक्रम समन्वयक, केव्हीके, औरंगाबाद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com