लोकसभेच्या रणधुमाळीत दुष्काळ, शेतकरी प्रश्न गायब

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणारे विरोधक, शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या संघटना लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर अचानक अज्ञातवासात गेल्या आहेत. राजकीय पक्षांनी साधारणतः महिनाभरापूर्वी दुष्काळ, पाणीटंचाई, चाराटंचाई, कर्जमाफी या विषयांवरून ज्या आक्रमकतेने आंदोलने उभारण्याची घोषणा केली होती, त्यांनाही विराम मिळाला.  

या वर्षात वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती तयार झालेली आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्हा सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाला सामोरा जात आहे. या जिल्ह्यातील पाणी पातळी खालावल्याने सिंचन कमी झाले आहे. सर्वच प्रकल्प कोरडे पडलेले असल्याने त्यावर आधारित पाणीपुरवठा योजना ठप्प होऊ लागल्या. त्यामुळे मार्चअखेरच या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गेल्या काही वर्षात पहिल्यांदा १०० पेक्षा अधिक टॅंकर धावत आहे. दीड लाख लोकसंख्येला टँकरच्या पाण्याने तहान भागवावी लागते आहे. जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

वऱ्हाडातील शेतकऱ्यांचे तुरीचे, हरभऱ्याचे चुकारे थकलेले आहेत. कर्जमाफीची प्रक्रीया अद्यापही संपलेली नाही. त्यामुळे नवीन हंगामासाठी पीककर्ज कसे मिळेल असा पेच आहे. कर्ज वसुलीसाठी बॅंकांच्या नोटीस यायला लागल्या आहेत. अशा परिस्थितीत सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा घटकच सध्या गायब झालेला आहे. राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त झाले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या संघटनाही यावेळी राजकीय आखाडयात महायुती, महाआघाडीच्या साथीने प्रचारात उतरल्याने कुणाकडेही लक्ष द्यायला वेळ दिसत नाही.  सध्या प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरु झाली आहे. या दोन्ही जिल्हयात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच १८ एप्रिलला मतदान होत आहे. या अनुषंगांने १६ एप्रिलपर्यंत प्रचार करता येणार असल्याने राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते पहाटेपासूनच भेटीगाठी, कॉर्नरसभा, मेळाव्यात व्यस्त झाले आहेत. कुणालाही शेतकरी, सामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा, पाठपुरावा करण्यास सध्या तरी वेळ दिसेनासा झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com