हापूस ‘जीआय’ नोंदणीसाठी शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद

हापूस
हापूस

रत्नागिरी : कोकणच्या आंब्याला ‘हापूस’ हे भौगोलिक निर्देशांक (जीआय) जाहीर झाला आहे. याची घोषणा ऐन हंगामाच्या तोंडावर झाल्यामुळे निर्देशांक नोंदणीला शेतकरी बांधवातून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ११२ बागायतदार आणि ४३ प्रक्रिया व्यावसायिक अशा एकूण १५५ जणांनी नोंदणी केली आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांत उत्पादन होणाऱ्या हापूसला ‘जीआय’ मानांकन प्राप्त झाले आहे. हापूसचा टॅग वापरण्यासाठी आंबा उत्पादक, व्यापारी, प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार यांना देखील भौगोलीक निर्देशांकासाठी शुल्क भरून नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न करता हापूस नावाचा वापर केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रार आंब्याच्या लागवडीखाली आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत बागायतदारांची संख्या मोठी असतानादेखील ‘जीआय’साठी अल्प प्रतिसाद मिळतोय. हापूस या नावाने आंबा विक्री करायची असेल त्यांनी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, सातबारासह २६०० रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे. यामध्ये २००० संस्थेचे शुल्क तर ६०० केंद्र सरकारचे शुल्क आहे. या शुल्कामध्ये दहा वर्ष नियंत्रण ठेवणे, आंब्याचा दर्जा पाहणे ही जबाबदारी संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. नोंदणीकृत व्यक्तींना हापूसचा टॅग किंवा बारकोड वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हापूस नावाचा गैरवापर वापर केल्यास कठोर कारवाईची तरतूद आहे. हापूसचा टॅग वापरण्यापूर्वी कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस आंबा विक्रेते सहकारी संस्था, देवगड आंबा उत्पादक संघ, केळशी आंबा उत्पादक संघ यांच्यापैकी कोणा एकाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.  कोकण हापूस आंबा विक्रेते सहकारी संस्थेचे संचालक मुकुंद जोशी म्हणाले, की ‘जीआय’ मानांकनाबाबत शेतकरी अद्याप अनभिज्ञ आहे. त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठ, कोकण हापूस आंबा विक्रेते सहकारी संस्था, देवगड आंबा उत्पादक संघ, केळशी आंबा उत्पादक संघातर्फे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. गेल्या हंगामात नोंदणी न करताच शेतकऱ्यांनी आंबा विक्रीसाठी पाठविला होता. सध्या या संस्थातर्फे दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संपर्क साधून ‘जीआय’ मानांकनासाठी नोंदणी करून घेण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com