सोलापुरात ऊसदराच्या आंदोलनाची धग कायम

सोलापुरात ऊसदराच्या आंदोलनाची धग कायम
सोलापुरात ऊसदराच्या आंदोलनाची धग कायम
सोलापूर ः प्रशासन, कारखानदार यांच्याकडून अद्याप कोणताच तोडगा निघत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्‍न वरचेवर पेटतच चालला आहे. सोमवारी (ता.२०) पुन्हा ऊसदराच्या या आंदोलनाची धग कायम राहिली. पंढरपूर, माढा, मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापुरात ठिकठिकाणी शेतकरी संघटनांनी रास्ता-रोको करुन सरकारचा निषेध केला.
 
जनहित शेतकरी संघटनेने आक्रमक होत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या बीबीदारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गव्हाणीवरच ठिय्या मांडल्याने कारखान्याचे गाळप बंद पडले. प्रसंगी वातावरणही तणावपूर्ण झाले.
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह रयत क्रांती संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, जनहित शेतकरी संघटना या आंदोलनात चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसात पंढरपुरात आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोमवारीही अनेक भागात शेतकरी रस्त्यावर आले.
 
पंढरपुरातील कोर्टी, सोनके परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरमधील हवा सोडण्याचे प्रकार घडले. अनेक गाड्यांचे टायरही फोडण्यात आले. रयत क्रांती संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पेनूर (ता.मोहोळ) येथे सकाळी अकराच्या सुमारास रास्ता-रोको केला. दीपक भोसले, मनसेचे दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. 
 
दुसरीकडे बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यावर सकाळी दहा वाजता शेतकऱ्यांनी रस्ता अडवून चक्का जाम आंदोलन केले. वामन उबाळे, हर्षल बागल यांनी त्याचे नेतृत्व केले. याच भागातील म्हैसगाव, भोसरे गटातील शेतकऱ्यांनी ऊसतोड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनामुळे सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा दोन्ही बाजूंनी लागल्या. बार्शी तालुक्‍यातील उस्मानाबाद रस्त्यावरही शेंद्री येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता-रोको आंदोलन केले. याच ठिकाणी शेंद्रीनजीक एक एसटीही  फोडली.
 ऊसदर मी एकटा ठरवू शकत नाही ः सहकारमंत्री
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, नवनाथ माने, चंद्रकांत बागल यांनी गेल्या नऊ दिवसांपासून पंढरपुरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांची प्रकृती वरचेवर खालावतच चालली आहे. रविवारी (ता.१९) दुपारी सहकारमंत्री देशमुख यांनी उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.
 
तसेच ‘‘उसाचा दर मी एकटा ठरवू शकत नाही, कारखानदारांशी बोलून, तो ठरवावा लागेल,'' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे यामध्ये लक्ष घालतील, तसे बोलणे झाले आहे, असेही ते म्हणाले. पण त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. 
   बसेस फोडण्याचे प्रकार वाढले
ऊसदराच्या या आंदोलनामुळे गेल्या दोन-तीन दिवसांत एसटी बसेस फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः पुणे, सातारा मार्गावर या घटना सर्वाधिक घडल्या आहेत. त्यामुळे एस. टी. प्रशासनाने या मार्गावरील सर्व एसटी बसेसची वाहतूक सेवा बंद केली आहे. 
   'उसाला २७०० रुपये दर द्या'
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्वतः या प्रश्‍नावर तोडगा काढण्याची आवश्‍यकता असताना, ते काहीच हालचाल करत नाहीत, जोपर्यंत ऊसाला २७०० रुपयांचा दर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे सांगत जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी थेट बीबीदारफळ येथील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याच्या गव्हाणीवर ठिय्या मारुन कारखान्याचे गाळप बंद पाडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com