तीन लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी : ऊर्जामंत्री डॉ. राऊत

ऑक्टोबर २०२०मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून राज्यात ३ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ३१२ कोटी ४१ लाख रुपये भरले आहे.
Nitin Raut
Nitin Raut

मुंबई : नवीन कृषिपंप वीज धोरणास शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ऑक्टोबर २०२०मध्ये जाहीर झालेल्या या योजनेत थकबाकी भरण्यासाठी विविध सवलती जाहीर झाल्यापासून राज्यात ३ लाख ४२ हजार शेतकऱ्यांनी थकबाकीपोटी ३१२ कोटी ४१ लाख रुपये भरले आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. योजनेला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल राऊत यांनी शेतकऱ्यांचे आभारही मानले आहेत.  राऊत म्हणाले, ‘‘सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हावे. या योजनेअंतर्गत राज्य शासनाने शेतकऱ्यांकडील सुमारे १५ हजार कोटींची थकबाकी माफ करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ही योजना तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्या कृषिपंप ग्राहकांच्या सप्टेंबर, २०२० अखेरच्या सुधारित मूळ थकबाकीवर ५० टक्के सवलत मिळणार असून, व्याज व विलंब आकार पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. अशा प्रकारे पहिल्या वर्षी संपूर्ण थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना जवळपास ६६ टक्के सवलत मिळणार आहे. दोन वर्षांत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या सुधारित मूळ थकबाकीवर ३० टक्के तर तीन वर्षांत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांच्या मूळ थकबाकीवर २० टक्के सवलत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे सप्टेंबर २०१५ पूर्वीच्या थकबाकीवरील सर्व व्याज व विलंब आकार माफ होणार आहे. तसेच सप्टेंबर २०१५ नंतरच्या थकबाकीवरील विलंब आकार पूर्णपणे माफ होणार आहे. महावितरणने घेतलेल्या कर्जावरील व्याजाच्या सरासरी दराने थकबाकीवर व्याज आकारण्यात येणार आहे.’’  शेतीला दिवसा आठ तास वीजपुरवठ्याचे लक्ष  गावातून वसूल झालेल्या थकबाकीपैकी ३३ टक्के रक्कम त्याच गावच्या वीज पुरवठा विषयक पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे. अधिक गावांचा समावेश असलेल्या मंडळामध्ये होणाऱ्या थकबाकी वसुलीपैकी ३३ टक्के रक्कम त्याच मंडलच्या वीजपुरवठा विषयक पायाभूत सुविधांवर खर्च करण्याची अतिशय महत्त्वपूर्ण तरतूद या धोरणात आहे. पुढील तीन वर्षांत शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे, अशी माहिती ही राऊत यांनी दिली. 

महावितरणची प्रादेशिक विभागनिहाय वसुली 

  • पुणे : १३८ कोटी ९१ लाख रुपये 
  • कोकण : ९५ कोटी ७३ लाख रुपये 
  • औरंगाबाद : ५९ कोटी ३७ लाख रुपये 
  • नागपूर : १८ कोटी ३९ लाख रुपये   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com