शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची तयारी पूर्ण : महाएफपीसी

शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची तयारी पूर्ण : महाएफपीसी
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची तयारी पूर्ण : महाएफपीसी

पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी उत्पादक कंपन्यांना संस्थात्मक संरचनेमध्ये सामावून घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, यामुळे उत्पादन क्षेत्रात गाव पातळीवर क्लस्टर स्तरावर कंपन्यांच्या प्रक्षेत्रावर खरेदी केंद्रे सुरू झाले आहेत. याचा फायदा प्रामुख्याने लहान व छोट्या शेतकऱ्यांना होणार आहे, अशी माहिती महाएफपीसीच्या सूत्रांनी दिली. केंद्र व राज्य सरकार शेतकरी उत्पादक कंपन्यांना बळ देत असल्याच्या पार्श्वभूमीवर हमीभाव योजना अंमलबजावणीत कंपन्यांच्या सहभागामुळे आमूलाग्र बदल होत असून, थेट शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याबरोबरच बाजार स्थिर राहण्यास मदत होणार आहे. हमीभाव खरेदीत सुसूत्रता येण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना विक्री केलेल्या मालाचे चुकारे वेळेत मिळण्यासाठी राज्य शासन स्तरावर विशेष निर्णय घेण्यात आले असून, प्रधान सचिव (पणन) श्री. अनुपकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हमीभाव योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी नियोजन सुरू आहे. राज्यस्तरीय हमीभाव खरेदी नोंदणीचा शुभारंभ रविवारी (ता. १५) गोदा फार्मर प्रोड्यूसर कंपनी (हिंगोली) येथे शेतकरी मेळाव्याने होत आहे. बाजारात खरीप हंगामात कापणी झालेल्या मूग व उडदाची आवक सुरू झाली असून, शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा बाजारभाव कमी मिळू नयेत यासाठी हमीभाव खरेदी केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सभासद शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आवश्यक असणारी तयारी केली असल्याची माहिती महाएफपीसीच्या सूत्रांनी दिली. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये नियोजन बैठका घेऊन पीक परिस्थिती, उत्पादकता यांचा आढावा घेऊन खरेदी केंद्र सुरू करण्यास सक्षम असणाऱ्या संस्थांचीदेखील पडताळणी करण्यात आली आहे. पात्रता निकषांमध्ये धान्य, स्वच्छता प्रतवारी सुविधा, व्यवस्थापन, कुशल मनुष्यबळ, सभासद संख्या, गोदामांची व्यवस्था यांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर व पश्चिम महाराष्ट्रामधील ९४ शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून १७ जिल्ह्यांमधील ७२ तालुक्यांमध्ये केंद्रे सुरू होणार आहेत.  हमीभाव खरेदीच्या खरीप व रब्बी हंगामात १ लाख शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट्य महाएफपीसी मार्फत ठेवण्यात आले आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या या सभासद शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्था असल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी कंपनीचे सभासद होऊन हमीभाव खरेदीत सहभाग नोंदविण्यासाठी शिवार स्तरावर शेतकरी मेळावे, घोंगडी बैठका आयोजित करून पीकनिहाय हमीभाव, शेतमालाचा एफएक्यू दर्जा याबाबत जनजागृती सुरू केली असून, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com