सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा ‘मृदगंध’

गुणवत्तापूर्ण बियाण्याचा मृदगंध हा ब्रॅण्ड कंपनीने तयार केला आहे. हे बियाणे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीला चांगलेच उतरले आहे.
seed production plot of soyabean
seed production plot of soyabean

सोलापूर जिल्ह्यात पांगरी (ता.बार्शी) येथील मृदगंध शेतकरी उत्पादक कंपनी चार वर्षांपासून सोयाबीन बीजोत्पादनाचा कार्यक्रम तीस एकरांपुढे राबवत आहे. गुणवत्तापूर्ण बियाण्याचा मृदगंध हा ब्रॅण्ड कंपनीने तयार केला आहे. हे बियाणे सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीला चांगलेच उतरले आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शी-उस्मानाबाद महामार्गावर पांगरी गाव आहे. बालाघाटाच्या कुशीत असलेल्या या गावात पाण्याचा खात्रीशीर स्रोत नाही. विहीर आणि बोअरवर भागातील शेती होते. उपलब्ध पाण्यावर भाजीपाला, कांदा, सोयाबीन, तूर, हरभरा आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. शेतीचे अर्थकारण वाढवण्यासाठी वेगळे काही करण्याचा विचार गावातील प्रयोगशील वृत्तीचे शेतकरी करीत होते. त्यातूनच २००२ मध्ये सतीश जाधव, विजय गरड एकत्र आले. त्यांनी शेतकरी गट स्थापन केला. पुढे काही वर्षे अशीच गेली. त्यानंतर २०१४ मध्ये सहकारी रामलिंग सुरवसे यांच्यासह हे शेतकरी आत्मा विभागाच्या संपर्कात आले. नव्याने गटाची नोंदणी झाली. कंपनीची उभारणी सन २०१५ मध्ये महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत (एमएसीपी) शेतकरी उत्पादक कंपन्यांना अर्थसाह्य देण्यात येत होते. ‘आत्मा’चे तत्कालीन प्रकल्प संचालक दत्तात्रय गावसाने, उपसंचालक विजयकुमार बरबडे,व्यवस्थापक कल्पक चाटी यांनी गटाचे रूपांतर शेतकरी कंपनीमध्ये करण्याचे सुचवले. या पाठबळामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला. ‘मृदगंध’ असे नामकरण करीत बार्शी तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना झाली. पांगरीसह पांढरी, उक्कडगाव, घारी, जहानपूर, चिंचोली, ममदापूर, कारी अशा आठ गावांतील सुमारे ७०० शेतकऱ्यांना सभासद म्हणून घेण्यात आले. पुढे त्यांच्या माध्यमातून ३० गट स्थापन झाले. दहाजणांची निवड संचालक मंडळावर झाली. आश्‍वासक सुरुवात सुरुवातीला पांगरी परिसरातील शेतकऱ्यांकडील भाजीपाला व फळे एकत्र करून सोलापूरसह, नांदेड, पुणे, मुंबई आदी बाजारपेठांत पाठवण्यास सुरुवात झाली. बार्शीसह परिसरात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यातून सोयाबीन बिजोत्पादनाचाही पर्याय समोर आला. त्यावर सर्वांचे एकमत झाले. सुरू झाले बीजोत्पादन बीजोत्पादन कार्यक्रम पद्धतीचा अभ्यास शेतकऱ्यांनी केला. पुणे येथील आघारकर संशोधन संस्थेकडून एमएसीएस-११८८, एमएसीएस-१२८१ या वाणांचे बियाणे मिळवले. पहिल्या वर्षी फारसा अनुभव नसल्याने पुरेसे उत्पादन मिळाले नाही. हळूहळू अभ्यास व अनुभव यातून मग वाण, बियाण्यांची मागणी, क्षेत्र, एकरी उत्पादन, प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष मिळणारे बियाणे हे व्यावहारिक अर्थशास्त्र उमगू लागले. विक्री होऊ लागली. आत्मविश्‍वास वाढला. एकरी १० क्विटंलपर्यंत सोयाबीन उत्पादन मिळते. भांडवल गुंतवणूक

  • ‘एमएसीपी‘ तसेच आत्मा यांचे मोठे सहकार्य
  • त्यातून पायाभूत सुविधांसाठी १५ लाख रुपयांचे अर्थसाह्य
  • सभासदांचे शेअररुपी जमा झालेले ६ ते ७ लाख रुपये अशी २० ते २२ लाख रुपयांची गुंतवणूक
  • बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण
  • ‘मृदगंध सीडस’ नावाने ब्रॅण्ड बियाणे उद्योगात स्पर्धा मोठी आहे. साहजिकच आपल्याही बियाण्याला बाजारपेठेत नाव मिळवण्याच्या दृष्टीने पांगरीतील या शेतकरी कंपनीने प्रयत्न केले. खास कंपनीच्या नावानेच मृदगंध सीडस नावाचा ब्रॅण्ड व आकर्षक लोगो तयार केला. शेतकऱ्यांची मागणी ओळखून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या एमएयूएस १५८ व १६२ या वाणांचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. यंदा अनेक कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्याबाबत तक्रारी आल्या. मात्र गेल्या चार वर्षांमध्ये आपल्या बियाण्याबाबत उगवणक्षमता वा अन्य कोणत्याही बाबतीत तक्रार आली नसल्याचे कंपनीचे सदस्य सांगतात. प्रमाणीकरणाची सुविधा

  • बीजोत्पादनासाठी कृषी विद्यापीठाकडील बियाण्याचा वापर
  • खरीप हंगामाआधीच क्षेत्रनिश्‍चिती. त्यानुसार मागणी नोंदवली जाते.
  • जिल्हा बीजप्रमाणीकरण अधिकाऱ्यांकडे नोंद
  • पेरणी, फुलोरा, आणि काढणीवेळी प्रमाणीकरण अधिकाऱ्यांची थेट शेतकऱ्याच्या शेतांना भेट
  • कंपनीचा पांगरीनजिक प्रमाणीकरण प्रक्रिया प्रकल्प. क्लिनिंग, ग्रेडिंग आणि पॅकिंग येथे होते.
  • लॅाटचे काही नमुने पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेकडे उगवणक्षमता तपासणीसाठी पाठवण्यात येतात. -त्यानंतर बियाणे विक्रीसाठी योग्य असल्याचे प्रमाणीकरण मिळते.
  • शेतकऱ्यांना २० टक्के जादा दर बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांना त्या त्या कालावधीतील बाजारभावापेक्षा प्रति क्विंटल २० टक्के जादा दर देऊन बियाणे खरेदी केले जाते. त्यामुळे हमीभावासारखा दर मिळतो. शिवाय हमखास बाजारपेठ मिळते. गेल्या चार वर्षात २०१९ चा ३८०० रुपये प्रति क्विंटल दराचा अपवाद वगळता अन्य वर्षांत ४२०० ते ४५०० रुपये दर दिला आहे. बीजोत्पादन विक्री दृष्टिक्षेपात (प्रातिनिधिक)  

    वर्ष क्षेत्र बियाणे विक्री विक्री दर
    २०१६-१७ ३० ११५ २२०० रु.
    २०१८-१९ ८६ १९७ २१५० रू.
    २०१९-२० ८० ३९८ २२०० रु.
    यंदा ९९ -- --

    टीप- क्षेत्र- एकर, विक्री क्विटंलमध्ये व दर प्रति ३० किलो बॅग प्रतिक्रिया सदस्यांचा सक्रिय सहभाग आणि पाठिंब्यामुळेच कंपनी व्यवसायात स्थिरावत आहे. सुरुवातीची वर्षे विषयाचा अभ्यास करण्यातच गेला. बीजोत्पादन क्षेत्र आणि विक्री वाढली की कंपनीच्या सभासदांना लाभांशही देणार आहोत. -सतीश जाधव, ९५५२२२९२२८ (अध्यक्ष, ‘मृदगंध’) सर्वांच्या सहकार्यामुळे बीजोत्पादनाच्या कार्यक्रमात उतरलो. सोयाबीन बीजोत्पादनात कुशल झालो आहोत. यंदा हरभरा बिजोत्पादनही करणार आहोत. - रामलिंग सुरवसे, ८०७५७३२६९१ (सचिव, ‘मृदगंध’)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com