प्रसिद्ध भातवाण संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन

प्रसिद्ध भातवाण संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन
प्रसिद्ध भातवाण संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे निधन

चंद्रपूर : प्रसिद्ध भात (धान) वाण संशोधक  दादाराव खोब्रागडे यांचे दीर्घ आजाराने रविवारी (ता.३) निधन झाले. भाताचे (धान) एक- दोन नव्हे, तर तब्बल नऊ वाण विकसित करण्याचा विक्रम करणाऱ्या आणि हजारो हेक्टरवर ज्यांच्या वाणांची लागवड होत आहे. त्यांच्या पश्च्यात मुलगा, सून आणि तीन नातवंडे असा परिवार आहे.

नागभीड तालुक्‍यातील नांदेड हे दादाजी खोब्रागडे यांचे गाव. जेमतेम तिसरीपर्यंत शिक्षण झालेले दादाजी १९८३ मध्ये तांदळाचे संशोधक म्हणून नावारूपास आले. परिस्थितीमुळे त्या वेळी त्यांना शिक्षण घेता आले नव्हते; परंतु त्यांनी कल्पकतेने आपले तांदूळ क्षेत्रातील संशोधन कार्य सुरू ठेवले. एच.एम.टी.सारखा शेतकरीभिमुख वाण त्यांनी विकसित केला. त्यानंतर आजवर त्यांच्या नावे नऊ वाण संशोधनाची नोंद आहे. याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ते तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यापर्यंत साऱ्यांनी त्यांचा सन्मान केला.  ८९ वर्षांच्या दादाजींना २०१५ मध्ये अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांनी आता खाणेपिणेही बंद केले होते. उपचारासाठी पैशाची सोय नसलेल्या धान वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांकडे गुरुवारी (ता. ३१) अकोल्यातील शेतकरी मित्र मंडळासह इतर संघटनांनी १ लाख २१ हजार रुपयांची मदत सोपविली. सरकारकडूनही मदतीची घोषणा झाली होती. नागपुरातील डॉ. सुहास कानफाडे यांच्या रुग्णालयात दादाजींवर उपचार सुरू होते.

फोर्ब्जने घेतली दखल दीड एकर शेतीत संशोधनकार्य करणाऱ्या दादाजी खोब्रागडे यांच्या कार्याची दखल घेत २०१० मध्ये फोर्ब्जने जगातील सर्वोतम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत त्यांना स्थान दिले होते. त्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी ५० हजार रुपये तसेच स्मृतिचिन्ह देऊन गौरविले, तर राज्य सरकारने देखील त्यांचा कृषिभूषण पुरस्काराने सन्मान केला. 

राष्ट्रवादीने दिली पाच एकर शेती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या संशोधकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने त्यांच्या संशोधनकार्यासाठी पाच एकर शेती विकत घेऊन दिली. ही शेतीच त्यांच्या उपजीविकेचे साधन आजवर होती. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी नापिकीचा सामना करावा लागत असल्याचे त्यांचा मुलगा मित्रदीप खोब्रागडे यांनी सांगितले. 

हे वाण केले विकसित एच.एम.टी., विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एच.एम.टी. आणि डीआरके-२ अशाप्रकारचे नऊ तांदूळ वाण त्यांनी विकसित केले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com