वसाकाच्या ऊसबिलांसाठी शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

वसाकाच्या ऊसबिलांसाठी शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
वसाकाच्या ऊसबिलांसाठी शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

नाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याला चालू गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा केला. मात्र त्याची किमान आधारभूत किंमत थकवल्यामुळे वसाका कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून कारखाना प्रशासनाने पहिल्या टप्प्यातील देयके अजूनही ऊस उत्पादकांना दिलेली नाहीत. याबाबत त्यांनी जिल्हा प्रसासनाकडे धाव घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात कारखाना प्रशासनाबद्दल त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. 

वसाका साखर कारखाना चालू गाळप हंगामासाठी धाराशिव कारखाना प्रशासनाला भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी दिला होता. या प्रशासनाने २१ नोव्हेंबर २०१८ रोजी गळीत हंगाम सुरू केला. तो २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सुरू होता. उत्पादकांनी बिले मिळण्याबाबत वेळोवेळी कारखाना प्रशासन आणि अध्यक्ष अभिजित पाटील यांना संपर्क केला. मात्र कधीही त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. ऊस उत्पादकांच्या हक्काच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केले गेले. उसबिलापोटी काही शेतकऱ्यांना धनादेश दिले होते. मात्र ते ही वटलेले नाहीत. शेतकऱ्यांनी अखेर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. 

अभिजित पाटील यांची चौकशी करावी. ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांचे २३७१ रुपये प्रतिटनप्रमाणे थकीत बिल येत्या ७ दिवसांत अदा करण्यात यावे, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर ऊस उत्पादक संघर्ष समिती, प्रहार शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वसाका कार्यक्षेत्रासह निफाड, चाळीसगाव, कळवण, देवळा, साक्री, नवापूर या तालुक्यांतील शेकडो ऊस उत्पादक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमले होते. या वेळी कसमादे ऊस उत्पादक संघर्ष समीतीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, वसाका कारखान्याचे माजी संचालक यशवंत पाटील, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, कैलास बोरसे, भास्कर निकम, लक्ष्मण बोरसे, दिलीप निकम, ईश्वर निकम, संजय निकम, दादाजी निकम, पोपट निकम आदी शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com