थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर !

विलास पतंगे -देशमुख या तरुण शेतकऱ्याने स्वतःच थेट विक्री करण्याचा पर्याय निवडला. त्यांनी नैसर्गिकरित्या पिकवलेली १० टन पपई वाहनाद्वारे परभणीमध्ये विविध ठिकाणी विकली. यातून मार्केटमधील दरांच्या तुलनेत तीनपट अधिक दर मिळवल्याचे त्यांनी सांगितले.
परभणी ः शहरातील वसमत रस्त्यावर स्वतः पपईची विक्री करतांना विलास पतंगे.
परभणी ः शहरातील वसमत रस्त्यावर स्वतः पपईची विक्री करतांना विलास पतंगे.

परभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चालू बंद राहत होते. पर्यायाने पपईचे दर घसरले. इतक्या कमी दरामध्ये विकल्यामुळे उत्पादन खर्चही हाती येत नव्हता. त्याचवेळी किरकोळ बाजारामध्ये विक्रेते अधिक दराने विक्री करत असल्याचे लक्षात आल्यानंतर विलास पतंगे -देशमुख या तरुण शेतकऱ्याने स्वतःच थेट विक्री करण्याचा पर्याय निवडला. त्यांनी नैसर्गिकरित्या पिकवलेली १० टन पपई वाहनाद्वारे परभणीमध्ये विविध ठिकाणी विकली. यातून मार्केटमधील दरांच्या तुलनेत तीनपट अधिक दर मिळवल्याचे त्यांनी सांगितले.  विलास सुभाषराव पतंगे यांच्या कुटुंबीयांची परभणी येथून १२ किलोमीटरवरील तट्टूजवळा (ता. जि.परभणी) या गावच्या शिवारात ३० एकर शेती आहे. जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात असल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असते. पतंगे यांनी लिंबू,  केशर आंबा या फळपिकांची लागवड केलेली आहे. हळद, आले या मसाला वर्गीय पिकांचे उत्पादन देखील ते घेतात. त्यांचे वडील सुभाषराव हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले असून, आता पूर्णवेळ शेतीत लक्ष देतात. वाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्या विलास यांनी गेल्या वर्षी प्रथमच पपईची दीड एकर क्षेत्रावर लागवड केली होती. उत्पादन सुरु झाल्यानंतर पंजाब, दिल्ली, इंदोर येथील व्यापाऱ्यांना थेट शेतामधून पपईची विक्री केली. त्यावेळी त्यांना प्रतिकिलो सरासरी १२ ते २८ रुपये असे दर मिळाले. थेट शेतातून ४५ टन पपईची विक्री केली. मात्र, मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे अन्य राज्यातील वाहतूक बंद झाली. पतंगे यांनी परभणी येथील मार्केटमध्ये पपई विक्रीसाठी नेली. पपईला जेमतेम ७ रुपये किलोपर्यंत दर देऊ केला. त्यावेळी किरकोळ व्यापारी मात्र ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री करत होते.  केले थेट विक्रीचे प्रथमच धाडस लॉकडाऊनमध्ये त्यांचा अॅटोमोबाईल व्यवसायही बंदच होता. अशा वेळी विलास वडिलांशी चर्चा करून पपई पिकवून स्वतः विक्री करण्याचा निर्णय घेतला. शेतातून कच्ची पपई घरी आणून रद्दी पेपर गुंडाळून पिकवली. दरम्यान संचारबंदीदरम्यान शेतीमाल विक्रीसाठीचे आवश्यक परवाने मिळवले. तीन मालवाहू अॅटोरिक्षा भाडेतत्त्वावर घेऊन विलास यांनी परभणी येथील वसमत रस्ता, कारेगाव रस्ता, जिंतूर रस्ता या परिसरात पपईची विक्री केली. नैसर्गिकरित्या पिकविलेल्या पपईला चोखंदळ ग्राहकांनी पसंती दिली. दररोज ४ ते ५ क्विंटल असे मार्च ते एप्रिल या दीड महिन्यात १० टन पपईची प्रति किलो २० रुपये दराने विक्री केली. मार्केटमधील ठोक विक्रीच्या तुलनेत तीनपट अधिक दर मिळाला. शहरातील संचारबंदी कडक केल्यामुळे उर्वरित ५ टन पपई स्थानिक व्यापाऱ्यांना थेट शेतातून विक्री केली, असे विलास यांनी सांगितले.  लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये पतंगे यांच्या पपईला केवळ सात रुपये प्रति किलो असा दर देऊ केला. मात्र स्वतः थेट ग्राहकांना विक्री केल्यामुळे तिप्पट दर मिळाला. परिणामी १.४ लाख रुपये अधिक उत्पन्न हाती आले. यातून स्वतः विक्री करण्याचा एक आत्मविश्वास मिळाला आहे.  - विलास पतंगे- देशमुख, ९८५०८६७७८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com