अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : अद्ययावत प्रयोगांच्या माहितीने समाधानी

शेतीविषयक ज्ञान आणि माहिती अद्ययावत करण्यासाठी कृषी प्रदर्शनास आवर्जून भेट देत असतो. ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनामध्ये माती परीक्षण, शेतीपूरक दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, रेशीम शेती, शेती पिके तसेच फळपिकाच्या लागवड तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. ‘अॅग्रोवन’ने शेतकऱ्यांना माहितीचा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. - ज्ञानोबा बंदुके, गुत्ती, ता. उदगीर, जि. लातूर
agriculture exhibition
agriculture exhibition

औरंगाबाद ः ‘‘‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनातून जगभरात सुरू असलेल्या शेतीतील अद्ययावत प्रयोगांची माहिती मिळाली. पिकांच्या नवीन वाणांच्या माहितीमुळे पारंपरिक पिकांना पर्यायही मिळाला. सोबतच शेतीतील अद्ययावत यंत्रे, पूरक व्यवसायांबद्दलची माहिती, शेततळे, फळबाग लागवड याविषयीची माहिती मिळाली. आधुनिक आणि प्रयोगशील शेती करण्यासाठी प्रदर्शनातून ज्ञान मिळाले,’’ अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.   

माझी बारा पैकी सात एकर शेती बागायती आहे. दुग्ध उत्पादनासाठी योग्य पशुआहार, रेशीम शेती, शेततळे निर्मिती आदी माहिती मला निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याने ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनास भेट द्यावी. - गोपाळ पांगरे, चिंचोली, ता. उदगीर, जि. लातूर

‘अॅग्रोवन’मधून कृषी प्रदर्शनाची माहिती मिळाल्यानंतर गावातील मित्रांसोबत प्रदर्शन पाहण्यासाठी आलो. फळबाग लागवड, बैलचलित, स्वयंचलित कृषी अवजारे यांसह आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, याबाबतची माहिती कृषी प्रदर्शनातून मिळाली. - माधव लोंढे, सती पांगरा, ता. वसमत, जि. हिंगोली

आमच्या कुटुंबाची सहा एकर शेती आहे. हळद, ऊस आदी प्रमुख पिकांचे उत्पादन घेत असतो. हळद प्रक्रिया, ट्रॅक्टरचलित कृषी अवजारे, शेतीपूरक विविध उद्योगाची माहिती ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनातून मिळाली.  - प्रशांत दळवी, कुरुंदा, जि. हिंगोली

प्रदर्शन खूपच आवडले, नावीन्यपूर्ण माहिती मिळाली, तसेच आधुनिक तंत्रज्ञान देणाऱ्या मशिनरी पाहता आल्या. त्याशिवाय विविध प्रकारच्या देशी बियाण्यांच्या वाणाची माहिती मिळाली. सीताफळ आणि पेरूसारखे वाणही पाहता आले.  - अतुल कौठुळे, देऊळगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद

मला सेंद्रिय शेतीची माहिती हवी होती. त्याशिवाय ड्रिप तंत्रज्ञानात नवे काय आले आहे, हे पाहायचे होते. बऱ्यापैकी माहिती मिळाली. विशेषतः शेतीपूरक उद्योग आणि यांत्रिकीकरणातील यंत्रेही उपयुक्त अशीच होती. प्रदर्शनात नवीन माहिती आणि तंत्रज्ञान पाहता आले, याचे समाधान वाटले.  - कैलास व्हसनाळे, नरंगल, ता. देगलूर जि. नांदेड

आमची गावाकडे चार एकर शेती आहे. ज्वारी, कांदा अशी पिके घेतो आहोत. पण, आता कमी पाण्यावरील सीताफळ, पेरू यांसारख्या पिकाची लागवड करण्याचा विचार करतो आहोत. त्यासाठी आले होते. सीताफळ, पेरू आणि अंजिराच्या काही वाणांची माहिती मिळाली. त्याशिवाय कमी मनुष्यबळावर काम करणारी विविध उपयुक्त अवजारेही पाहता आली.  - सौ. कल्पना गरड, बाजारठाण, जि. औरंगाबाद

माझी संत्र्याची बाग आहे. त्यासाठी मला रोटाव्हेटर आणि ट्रॅक्टरचलित यंत्रे हवी होती. इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे पाहता आली, अगदी फवारणी पंपापासून कोळपणी, बेड, सरी टाकणारी यंत्रे अशी खूप यंत्रे पाहिली. अनेक अवजारे कमी मनुष्यबळात काम करणारी, सर्वाधिक उपयुक्त ठरणारी आहेत. त्यात सवलतीत ती मिळत असल्याने आमच्यासाठी ही पर्वणीच आहे.  - दशरथराव भीमराव अरबक, चापडगाव, ता. घनसांगवी, जि. जालना

माझी १५ एकर शेती आहे. कांदा, डाळिंब, ढोबळी मिरची उत्पादन घेत असतो. सिंचनासाठी शेततळ्याची सुविधा आहे. आमच्या भागात मजुरांची समस्या आहे. त्यामुळे अन्य ठिकाणाहून मजूर आणावे लागतात. ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशी विविध कृषी अवजारे बघावयास मिळाली. शेततळ्याच्या कापडाबाबत माहिती मिळाली. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनास भेट देणे आवश्यक  आहे. - महेंद्र पाटील, उमराणे, ता. देवळा, जि. नाशिक

मी सध्या पारंपरिक पिकेच घेतो आहे. पण, सध्या पाणी आहे म्हणून उसाची लागवड करायची आहे. त्यासाठी ड्रिप आणि पाइपलाइन करायची आहे. प्रदर्शनात त्याची माहिती मिळाली. खूपच उपयुक्त आणि माहितीपूर्ण असे हे प्रदर्शन होते. निश्चितच माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना हे फायदेशीर ठरेल, असेच प्रदर्शन आहे.  - रघुनाथ शिंदे, विटा, ता. पाथरी, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com