महाबीजने शेतकरी, भागधारकांचे हित जोपासावेः शेतकरी

mahabeej
mahabeej

अकोला ः शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या महाबीजने त्यांचे भागधारक, तसेच शेतकऱ्यांचे हित जोपासले पाहिजे, अशी सर्वसाधारण मागणी शुक्रवारी (ता. २७) झालेल्या सर्वसाधारण सभेत व्यक्त करण्यात आली. तर काही भागधारकांना प्रशासनाकडून वाटप झालेल्या बॅग न मिळाल्याने त्यांनी सभेत येऊन प्रशासनाला जाब विचारला. यामुळे सभेत गोंधळ निर्माण झाला होता. 

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले होते. याशिवाय व्यासपीठावर केंद्रीय राज्यमंत्री तथा महाबीजचे माजी संचालक संजय धोत्रे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख यांच्यासह इतर संचालक व अधिकारी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना विविध जिल्ह्यांतील भागधारक शेतकऱ्यांनी महाबीजच्या वतीने खरीप, रब्बी हंगामात केले जाणारे बीजोत्पादन, बियाणे उगवणीचे प्रश्‍न, बियाणे प्रमाणीकरण, महाबीजची प्रशासकीय यंत्रणा व शेतकऱ्यांमधील समन्वय याबाबत असंख्य प्रश्‍न उपस्थित केले. 

हिंगोली जिल्ह्यातील सुरेश देशमुख यांनी महाबीजने शेतकरी व प्रशासनातील समन्वय वाढविण्याची गरज असल्याचे सांगत सर्वसाधारण सभेपूर्वी प्रत्येक विभाग स्तरावर बैठका घेतल्या तर सर्वच विभागातील शेतकऱ्यांना न्याय मिळू शकेल. वार्षिक सभेत सर्व प्रश्‍न सुटत नाहीत. वेगवेगळ्या विभागांचे वेगवेगळे मुद्दे आहेत. त्याला न्याय देता येत नाही, असे सांगत यासाठी मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी विभाग स्तरावर गेले पाहिजे, असे मत मांडले. 

महाबीजचा बीजोत्पादन कार्यक्रम दरवर्षी कमी होत चालला आहे. यातून प्रशासन बीजोत्पादकांचे हित जोपासणार की नाही, असा प्रश्‍न उपस्थित करीत याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली. अन्यथा दरवर्षी हे प्रमाण घटत जाऊन पर्यायाने शेतकरी व महाबीजचे नुकसान होईल. ६० वर्षे वयावरील भागधारकाचे शेअर्स ट्रान्स्फर होत नाहीत. यासाठी सुटसुटीत नियम असावेत. शेतकरी जगावा या दृष्टीने बियाण्याला दर दिले पाहिजेत, असे सांगितले. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याने हरभरा बियाण्याचे प्लॉट फेल गेल्याचे सभेत सांगितले. ज्येष्ठ भागधारक गजानन तात्या कृपाळ यांनी शेतकऱ्याचे बियाणे उगवले नाही आणि याबाबत जर यंत्रणांचा अहवाल असेल शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याबाबत कायदा करावा, अशी मागणी रेटून धरली. सोबतच खुल्या बाजारात जर मूग, उडदाचे दर वाढत असतील, तर बीजोत्पादकाला या दराचा कसा फायदा होईल, हे पाहण्याचीही विनंती केली. 

बॅग न मिळाल्याने गोंधळ  महाबीजची सभा विविध मुद्द्यांवर आधीच गाजत असतानाच, काही भागधारक आम्हाला बॅग का मिळाल्या नाहीत, यावरून सभेत येत गोंधळ करू लागले. आम्ही दीड तास रांगेत उभे होतो. आता बॅग संपल्याचे सांगण्यात आले, असे सांगत शेतकऱ्यांनी एक ताशेरे ओढले. यामुळे कृषी सचिव एकनाथ डवले यांना वारंवार मध्यस्थी करीत बॅग घरपोच दिल्या जातील, असे सांगावे लागले. मात्र श्री. डवले यांनी आश्‍वासन देऊनही शेतकरी महाबीज प्रशासनाविषयी रोष व्यक्त करीत होते. दरवर्षी असे घडत असल्याचे निदर्शनास आणून देत होते.  शेतकऱ्यांच्या मागण्या 

  • बीजोत्पादकांना चांगले बियाणे व दर मिळावा 
  • महाबीज प्रशासनाने शेतकऱ्यांसोबतचा समन्वय वाढवावा 
  • भागधारकांचे प्रश्‍न महिनोमहिने प्रलंबित राहू नयेत 
  • सभेत दिलेले आश्‍वासन तातडीने पाळले जावे 
  • दरवर्षी घटत चाललेल्या बीजोत्पादन कार्यक्रमाबाबत गांभीर्याने विचार व्हावा 
  • बियाण्यांमुळे नुकसान होत असेल तर शेतकऱ्याला मदतीबाबत विचार केला जावा 
  • महाबीजमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत   
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com