वऱ्हाडात ढगाळ वातावरणामुळे उडाली शेतकऱ्यांची झोप

तीन दिवसांपूर्वी वादळ व पावसामुळे तुरीचे पीक जमिनीवर लोळले आहे. पिकाची स्थिती बिकट आहे. या वातावरणामुळे किडीचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपासून शेतात जाणे बंद केले आहे. - लक्ष्मीकांत कौठकर,शेतकरी, अडगाव, जि. अकोला सध्या आभाळाचे वातावरण आहे. काही ठिकाणी तुरीचे पीक फुलोरा व शेंगा अवस्थेत आहे. शेंगा पोखरणारी अळी व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यासाठी ताबडतोब प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. धुक्यामुळे किडीत वाढ होण्याची शक्यता आहे. - डॉ. विनोद खडसे,विस्तार कृषी विद्यावेत्ता, डॉ. पंदेकृवि, अकोला.
Farmers sleep disturb due to cloudy weather in Warhad
Farmers sleep disturb due to cloudy weather in Warhad

अकोला : गेल्या चार ते पाच दिवसांपासून या भागात सातत्याने ढगाळ वातावरण आहे. मध्यंतरी अवकाळी पाऊसही झाला. त्यासोबतच आलेल्या वादळाने सध्या बहरात असलेल्या तुरीच्या पिकाचे मोठे नुकसान केले. या दूषित वातावरणामुळे पिकावर किडींचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. 

मागील चार दिवसांपूर्वी अकोला, बुलडाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यानंतर सातत्याने ढगाळ वातावरण आहे. बुधवारी (ता.१८) तर दुपारपर्यंत धुक्याची चादर होती. अशा वातावरणाचा तुरीच्या पिकावर मोठा परिणाम झाला आहे. कोरडवाहू क्षेत्रातील तुरीचे पीक सध्या फुलोर व शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. 

बागायती क्षेत्रातील तुरीचे दोन बहर आजवर गळून पडले. नुकताच तिसऱ्या बहरातील या पिकावर शेंगा परिपक्व व्हायला सुरुवात झाली आहे. आता ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला. फूलगळती वाढली. शेंगामध्ये पोखरणारी अळीसुद्धा जागोजागी दिसत आहे. पहाटेला पडणारे दव, ढगाळ वातावरण याचा फटका तूर उत्पादकाला झेलावा लागत आहे.

वऱ्हाडात एक लाख हेक्टर तूर  

आधीच खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन ही पिके अतिवृष्टीने हातातून गेली. हंगामातील कापूस व तुरीच्या पिकावर अपेक्षा राहिलेल्या होत्या. परतीच्या पावसाचा तुरीला फायदासुद्धा झाला. ओलीमुळे कोरडवाहू क्षेत्रातील तुरीचे पीकसुद्धा भरघोस दिसत होते. मात्र चार दिवसांपूर्वी सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे हे पीक जमिनीवर झोपले. आता तर किड वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. वऱ्हाडात तुरीचे सुमारे एक लाख हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com