नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) संरक्षित शेतीत वापरल्या जात असलेल्या अनेक घटकांना
ताज्या घडामोडी
पीककर्जासाठी बँकेतच आत्महत्येचा प्रयत्न
पीककर्ज मिळावे यासाठी बँकेत वारंवार पाठपुरावा करूनही मिळत नसल्याच्या नैराश्येतून शेतकऱ्याच्या मुलाने घाटबोरी येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत विषारी औषध घेण्याचा मंगळवारी (ता. १) प्रयत्न केला.
घाटबोरी, जि. बुलडाणा : पीककर्ज मिळावे यासाठी बँकेत वारंवार पाठपुरावा करूनही मिळत नसल्याच्या नैराश्येतून शेतकऱ्याच्या मुलाने घाटबोरी येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत विषारी औषध घेण्याचा मंगळवारी (ता. १) प्रयत्न केला. या प्रकारानंतर तो तेथून निघून गेल्याने एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान, या घटनेनंतर प्राप्त माहितीनुसार तो शेतकरी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.
घाटबोरी येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत गेल्या तीन महिन्यांपासून कायमस्वरूपी बँक व्यवस्थापक नाही. यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांचे पीककर्ज अर्ज बँकेच्या टेबलांवर पडून आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पीककर्ज प्रकरणे प्रलंबित असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
या शाखेअंतर्गत असलेल्या मेहकर तालुक्यामधील मेनजानुरी गावातील शेतकरी अरुण कोंडू पवार यांचे पीककर्ज प्रकरण प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकरी अरुण यांचा मुलगा अशोक व इतर पाच शेतकऱ्यांनी १८ नोव्हेंबरला बँक प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले होते, की गेल्या दोन महिन्यांपासून पीककर्जाचे प्रकरण प्रलंबित आहे.
वारंवार चकरा मारूनसुद्धा बँकेत कायमस्वरूपी व्यवस्थापक नसल्याने सातत्याने उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. बँकेच्या अकोला मुख्यालयातील अधिकारीसुद्धा योग्य उत्तर न देता वेळ मारून नेतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांची अकोल्याला जाऊन भेट घेतली असता त्यांनी अपमानित केले. त्यामुळे निराशेपोटी आम्ही शेतकरी १ डिसेंबरला बँकेत आत्महत्या करणार आहोत, अशी पूर्वसूचना दिली होती. दरम्यानच्या काळात काहीच हालचाल न झाल्याने अखेरीस संबंधित शेतकरी मंगळवारी बँकेत पोहोचले.
या ठिकाणी बँक अधिकारी क्रांतिकुमार व अभिषेक प्रसाद यांच्यासमोर अशोक पवार याने कीटकनाशक प्राशन करण्याचा प्रयत्न केला. परंतु सोबतच्या सहकाऱ्यांनी त्याला रोखल्याने दुर्घटना टळली. या ओढाताणीमध्ये कीटनाशक बँकेत सांडले. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत सामूहिक आत्मदहनाचा इशारा देणाऱ्यांना ताब्यात घेतले.या वेळी अशोक मात्र तेथून निघून गेला होता.
बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार पवार यांच्या पीककर्ज अर्जात काही त्रुटी असल्याने त्यांचा अर्ज परत आला होता. बँक शेतकऱ्यांशी संपर्क करून त्रुटी पूर्ण करून हा अर्ज परत वरिष्ठांकडे पाठवून संबंधित शेतकऱ्यांस कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सांगण्यात आले.
- 1 of 1023
- ››