पळशीच्या शेतकऱ्यांची थेट द्राक्ष विक्री

जागेवरून विक्री करून वा बाजारात विक्रीला नेऊनही आमच्या द्राक्षाला आम्हाला खर्चाला परवडणारा दर मिळत नव्हता. दुसरीकडे ग्राहकांना मात्र आमच्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दरापेक्षा जास्त दराने द्राक्ष खरेदी करावी लागत असल्याचे आमच्या लक्षात आल्याने आम्ही थेट ग्राहकांना द्राक्ष विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्याला बाजार समितीचेही सहकार्य मिळाले. - नवनाथ काकडे, द्राक्ष उत्पादक, पळशी, जि. औरंगाबाद.
द्राक्ष विक्री
द्राक्ष विक्री

औरंगाबाद : शेतमालाच्या प्रचलीत पद्धतीत खर्च व मिळणाऱ्या दराचा बसत नसलेला ताळमेळ पाहून नव्यानेच द्राक्ष शेतीकडे वळलेल्या पळशी येथील शेतकऱ्यांनी द्राक्षाची थेट स्टॉल लावून विक्री करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच दिवशी काही तासात जवळपास सव्वादोन क्‍विंटल द्राक्षाची विक्री करणाऱ्या या शेतकऱ्यांना त्यांच्या द्राक्षाला ६० रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.  मराठवाड्यात द्राक्षाचे क्षेत्र हळूहळू विस्तारते आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत द्राक्ष बागांचा विस्तार झपाट्याने होताना दिसतो आहे. जालना जिल्ह्यातील कडवंचीलगत औरंगाबाद-नागपूर मार्गावर बसून आपल्या द्राक्षाची थेट विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही शेतकऱ्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्यातील पळशी येथील नव्याने द्राक्ष शेतीत उतरलेल्या शेतकऱ्यांनीही आपले द्राक्ष थेट बाजार समितीच्या आवारात बसून विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला कारणही त्यांना निदर्शनास आलेली दरातील तफावतच कारणीभूत ठरल्याचे शेतकरी सांगतात. औरंगाबाद शहरापासून हाकेच्या अंतरावरील पळशी गावातील काकडे मामा फार्मर प्रोड्यूसर कंपनीअंतर्गत जवळपास सात शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या थेट विक्रीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामध्ये नवनाथ काकडे, कारभारी पळसकर, ज्ञानेश्वर शिंदे, मोतीराम पळसकर, विष्णू काकडे, सोमीनाथ पळसकर, देवराव केरड यांचा समावेश आहे.  दोन वर्षांपासून हे शेतकरी द्राक्ष शेतीकडे वळले आहेत. दोन वर्षांपूर्वीची जवळपास बारा एकर व नव्याने लागवड केलेली मिळून जवळपास वीस एकरांवर या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा उभ्या आहेत. गटातील एका शेतकऱ्याची द्राक्ष बाग थेट जाग्यावरूनच उक्‍ती दिली तर त्या शेतकऱ्याला जवळपास ३९ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. दुसरीकडे बाजारात विक्रीसाठी द्राक्ष नेले तर शेतकरी किमान ५० रुपये प्रतिकिलोची अपेक्षा ठेवून असताना तेवढे दर त्यांना देण्यास कुणी तयार नव्हते. तर ग्राहकांना मात्र शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दरापेक्षा जवळपास दिडपट ते दुप्पट दराने खरेदी करण्याची वेळ असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आले. थेट द्राक्ष विक्री करताना शेतकरी.. पहा Video त्यामुळे आपल्याला व ग्राहकाला परवडेल अशा दराने द्राक्षाची विक्री स्वत: करण्याची तयारी केल्याचे शेतकरी सांगतात. त्यासाठी त्यांनी बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांची भेट घेऊन त्यांना द्राक्ष विक्री स्टॉलसाठी बाजाराच्या आवारात जागा देण्याची मागणी केली. त्यांनी होकार दिल्यानंतर त्यांच्याच हस्ते सोमवारी (ता. ११) शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्राची द्राक्ष विक्रीने सुरवात केली.  या वेळी फळबाग तज्ञ डॉ. भगवानराव कापसे, उपसरपंच रामेश्वर पळसकर आदींची उपस्थिती होती. प्रतिकिलो ६० रुपये दराने विक्री करत ग्राहकांचाही फायदा करणाऱ्या या शेतकऱ्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी बारा वाजेपर्यंत जवळपास सव्वादोन क्‍विंटल द्राक्ष विकले गेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.  प्रतिक्रिया

अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी स्वत:चा माल स्वत: विक्रीसाठी पुढे आणायला हवा. शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या मालाला अपेक्षित दर मिळावा, ग्राहकांनाही माफक दरात माल मिळावा. कितीही शेतकरी आपल्या मालाची विक्री थेट करण्यासाठी पुढे आले तर बाजार समिती सहकार्य करेल.  - राधाकिसन पठाडे, सभापती, बाजार समिती, औरंगाबाद. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com