agriculture news in Marathi, farmers in state trouble due to fall army worm, pune, Maharashtra | Agrowon

लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्त
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 जुलै 2019

मक्यावरील या अळीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाची शिफारस केली आहे. विद्यापीठाने काही गावे निवडून तेथे सुमारे १०० ते १५० एकरांवर प्रात्यक्षिक प्लॉटस घेतले आहेत. विद्यापीठाचे कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञसुद्धा यावर काम करीत आहेत. शास्त्रज्ञांना तातडीने दखल घेण्याचीही सूचना केलेली असून शिफारशीनुसार व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे सांगण्यात आलेले आहे. 
- डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंदेकृवि, अकोला

पुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी यंदा जेमतेम पाण्यावर मका पिकाची लागवड केली. मात्र, मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) प्रादुर्भाव वाढल्याने ऐन दुष्काळात तेरावा म्हणण्याची वेळ आली आहे.

सातारा जिल्ह्यात सहा हजार ९१६ मक्याची लागवड झाली आहे. कृषी विभागाकडून करण्यात आलेल्या पाहणीत ११२२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये सर्वाधिक फलटण तालुक्यात ३६० हेक्टर, कऱ्हाड २००, माण २००, पाटण १८५ व खटाव १०५ हेक्टर समावेश आहे. उर्वरित तालुक्यात दोन ते तीन टक्के क्षेत्र बाधित झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात यंदा मका पिकावर सुमारे दहा टक्क्यांपर्यंत म्हणजेच २८० हेक्टरवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या ज्या ठिकाणी मक्याची पेरणी होऊन दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी झाला आहे. या क्षेत्रावर अमेरिकन लष्करी अळी आढळून आली आहे.

मराठवाड्यात सध्या जवळपास ४१ हजार हेक्टरवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. तज्ज्ञांच्या पाहणीनुसार औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर, खुल्ताबाद आदी तालुक्‍यातील २० ते ४० टक्‍के पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. बदनापूर व जालना तालुक्यांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने या तालुक्‍यात १५ ते २० टक्‍के तर भोकरदन, जाफ्राबाद तालुक्‍यांत एकूण क्षेत्राच्या १० ते १२ टक्‍के क्षेत्र प्रादुर्भावग्रस्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खानदेशात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत असून सुमारे १८ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, एरंडोल, चोपडा, रावेर, जळगाव यावल तालुक्यांत आणि धुळ्यात शिरपूर, धुळे भागात, नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व तळोदा तालुक्यांत या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ हजार हेक्टर, धुळ्यात तीन हजार आणि नंदुरबार जिल्ह्यात चार हजार हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात १ लाख ४१ हजार ८७६ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. लष्करी अळीचा प्रादुर्भाव सुरवातीला मक्याच्या क्षेत्रावर ९० टक्क्यांपेक्षा अधिक दिसून आला होता. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी जैविक व रासायनिक फवारण्या केल्या तेथे अळी नियंत्रणात आहे. त्यामुळे नुकसानीची पातळी कमी होऊन ती ३० टक्क्यांवर आली आहे. सध्या ४२ हजार ३०० हेक्टरवर प्रादुर्भाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. नगर जिल्ह्यात बारा हजार हेक्टर क्षेत्रावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यात मक्याची २९ हजार ४३८ हेक्टर म्हणजे ५५.४० टक्के पेरणी झालेली आहे. त्यातून जवळपास १० ते १२ हजार हेक्टर क्षेत्रावर मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील मका पूर्णपणे फस्त करण्यास सुरवात केली आहे. प्रामुख्याने सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, दक्षिण सोलापुरात या अळीचा सर्वाधिक प्रभाव दिसत आहे. जिल्ह्यात जवळपास १८ हजार हेक्टरवर मक्याचे क्षेत्र आहे. त्यापैकी जवळपास १७ हजार हेक्टर क्षेत्रावरील मका लष्करी अळीने फस्त करण्यास सुरवात केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात मोताळा तसेच देऊळगावराजा तालुक्यात अळीचा प्रादुर्भाव काही गावांमध्ये दिसून आलेला आहे. या ठिकाणी कृषी अधिकारी व शास्त्रज्ञांनी तातडीने भेटी देऊन उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे सुरू केले आहे. जिल्ह्यात दोन ते तीन टक्के प्रमाणात ही अळी असावी, असा अंदाज आहे. 
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सुमारे ४५० हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. त्यापैकी अडीचशे हेक्टरवर लष्करी अळीचा ४०-५० टक्के प्रादुर्भाव दिसून आला आहे.

उर्वरित बारामती, दौंड या भागातही या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मका पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. सांगली जिल्ह्यात १०२८ हेक्टर क्षेत्रावरील मका बाधित झाला आहे. अनेक भागांतील संपूर्ण क्षेत्र बाधित झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाल आहेत. लष्करी अळीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. 

लष्करी अळीचा फटका

  • राज्यात सर्वत्र किडीचा प्रादुर्भाव
  • पोषक वातावरणामुळे अळीचा प्रसार होण्यास मदत 
  • काही ठिकाणी ९० टक्के क्षेत्र प्रभावित
  • एका महिन्यात चार फरवारण्या
  • खर्चात एकरी पाच ते चार हजांरानी वाढ
  • अनेक ठिकाणी मक्याबरोबर ऊस, ज्वारीही लक्ष्य

प्रतिक्रिया
पाऊस नसल्याने पेरणी केलेल्या मक्यावर तसेच काही प्रमाणात उसावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. दुसऱ्या अवस्थेपर्यंत अळी पानांवर आहे तोपर्यंत प्रादुर्भाव रोखण्याला बऱ्यापैकी यश येते. पोंग्यात गेल्यावर मात्र अडचणी येतात. अळी पोंग्यात जाण्याच्या अवस्थेत प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.  
- डॉ. अशोक चव्हाण, कडधान्य प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 

लष्करी अळीच्या नियंत्रण व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. कीड, रोग, सर्वेक्षण दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत ग्रामीण कृषी कार्यानुभवचे विद्यार्थीदेखील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन लष्करी अळीच्या व्यवस्थापनाबाबत माहिती देत आहेत.
- डाॅ. पी. एस. झंवर, कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

सध्या लष्करी अळीने हैराण केले आहे. यंदा पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. मक्याला चांगला भाव होता. त्यामुळे लागवड केली. मात्र लष्करी अळीने चांगल्या उत्पन्नाच्या आशेवर पाणी पेरले.
- अण्णासाहेब धनगे, शेतकरी, अंदरसुल, ता. येवला, जि. नाशिक

इतर अॅग्रो विशेष
बागलाण तालुक्यात पूर्वहंगामी...नाशिक ः पूर्वहंगामी अर्ली द्राक्ष उत्पादनासाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यात गुलाबी बोंड...परभणी: परभणी, नांदेड जिल्ह्यांतील बीटी कपाशीवरील...
राज्यात पावसाची उघडीपपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार...
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील ऊस...कोल्हापूर : साखर कारखाने म्हटले की सर्वांच्या...
परभणी दुग्धशाळेतील संकलनात सव्वादोन लाख...परभणीः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
मराठवाड्यातील खरिपावर संकटाचे ढग गडदऔरंगाबाद : गेल्या हंगामात दुष्काळाने पिचलेल्या...
दक्षिण महाराष्ट्रात उसाचे वैभव लयालाकोल्हापूर/सांगली : पंचगंगा, कृष्णा, वारणा,...
तीन लाखाची लाच घेताना नाशिक बाजार...नाशिक: नाशिक  कृषी उत्पन्न बाजार...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे ः पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब...
कोल्हापूरमध्ये पुरात घट, धरणातून विसर्ग...कोल्हापूर  : जिल्ह्यातील पुराची परिस्थिती...
ग्लायफोसेट तणनाशक कर्करोगकारक नाही :...वॉश्‍गिंटन : ग्लायफोसेट हे तणनाशक मानवास कर्करोग...
ऑगस्ट महिन्यातही पाणीटंचाई कायम; २ हजार...पुणे : पावसाने दमदार हजेरी लावल्याने कोकण,...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...