लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची यशस्वी निर्यात 

गेल्या वर्षीच्या १ एप्रिल ते १९ मे दरम्यान झालेली निर्यात आणि यंदाच्या वर्षी याच काळात झालेल्या निर्यातीची तुलना केली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ७ टक्क्यांची घट झाली आहे.
agri export
agri export

पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यानंतरही निर्यात मात्र सुरळीत ठेवण्यात पणन मंडळाला यश आले आहे. गेल्या वर्षीच्या १ एप्रिल ते १९ मे दरम्यान झालेली निर्यात आणि यंदाच्या वर्षी याच काळात झालेल्या निर्यातीची तुलना केली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ ७ टक्क्यांची घट झाली आहे. कोरोनाच्या संकटात देखील शेतकऱ्यांनी निर्यात केल्याने शेतमालाचे निर्याती अभावी होणारे नुकसान कमी करण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत. तर गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी केळी, लिंबु, मिरची, आणि आल्याच्या निर्यातीत वाढ झाली आहे. 

कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्या बंद, देशांतर्गत वाहतुक बंदी या कारणांनी पुरवठा साखळी काही प्रमाणात खंडीत आणि विस्कळीत झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र राज्य कृषी पणन मंडळाने निर्यातीला अडचणी येऊ नयेत म्हणुन शेतमाल निर्यात निंयंत्रण कक्षाची स्थापना केली होती. या केंद्राद्वारे विविध प्रमाणपत्रे तातडीने देण्याच्या व्यवस्थे बरोबरच शेतकरी आणि निर्यातदारांचा समन्वय साधत निर्यात सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि मुंबईचे विमानतळ मार्गे समुद्र आणि हवाईमार्गे मालवाहु विमानांव्दारे निर्यात सुरु आहे. यामध्ये कंटेनर आणि ट्रेलरसाठी वाहनचालकांची कमतरता असतानाही तसेच वाहतुकीच्या वेळी रस्त्यांवर कोणत्याही जेवणाच्या तसेच वाहन दुरुस्तीच्या सुविधा नसतांनाही समुद्रमार्गे निर्यात सुरु आहे.

आंबा निर्यातीत हापूसचा वाटा मोठा  गेल्या वर्षी १ एप्रिल ते १९ मे २०१९ मध्ये १६ हजार ७४६ टन निर्यात झाली होती. यामध्ये हापूससह विविध जातींचा समावेश होता. इतर जातींचा आंबा परराज्यांमधुन पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई विमानतळावरुन निर्यात होतो. मात्र यंदा वाहतुक ठप्प झाल्याने इतर वाणांच्या आंब्याची तुलनेने कमी वाहतुक आणि निर्यात झाली. यामुळे कोकणातुन तुलनेने हापूसला जास्त प्रमाणात उपलब्ध झाल्याने हापूसची निर्यात जास्त झाली. एकुण झालेल्या ८ हजार ६४० टन निर्यातीमध्ये ५२% टक्के हापूसचा वाटा होता.  केळीच्या निर्यातीत दिडपटीने वाढ  गेल्यावर्षी १ एप्रिल ते १९ मे दरम्यान २३ हजार ४५६ टन निर्यात झाली होती. हिच निर्यात यावर्षी ३३ हजार ९४८ टन झाली आहे. म्हणजेच कोरोना टाळेबंदीतही केळीची निर्यात सुमारे दिडपट झाली आहे.  लिंबाच्या निर्यातीत वाढ  गेल्या वर्षी लिंबाची निर्यात २८३ टन होती ती ६५३ टन झाली आहे.  इतर भाजीपाल्यांमध्ये ७ टक्के घट  इतर फळे व भाजीपाल्याच्या निर्यातीत फारसा फरक दिसत नसून गेल्यावर्षी इतर फळे व भाजीपाल्याची निर्यात १८ हजार ३८९ टन होती. यावर्षी १७ हजार ५१ टन झाली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त ७ टक्के घट आहे.  शेतमाल निर्यातीची तुलनात्म स्थिती (टनांत) 

शेतमाल २०१९ २०२० 
केळी २३४५६ ३३९४८ 
कांदा २६३९८९ २२५६८६ 
द्राक्षे १२१३७ ९५०९ 
आंबा १६७४६ ८६४० 
डाळिंब ३२७१ १७७३ 
लिंबु २८३ ६५३
मिरची १४०९ १५२२ 
आले ८४६ ११६८ 
इतर १८३८९ १७०५११ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com